स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Sunday, May 17, 2009

सोमवारी शेअर बाजार उसळणार!

विलास महाजन /सकाळ/१६.०५.२००९

सोमवारी निफ्टी ३७५० कदाचित ३८०० अंशांची पातळीही ओलांडणार. सेन्सेक्‍स १२ हजार पाचशे अंशांना धडक मारणार. युतीच्या बाजूने मतदारांचा कौल पडल्याचे शनिवारी स्पष्ट झाले आणि गुंतवणूक क्षेत्राने सोमवारची सुरवात तेजीने होण्याची गणिते बांधले आहेत. मंदीवाल्यांची नाकाबंदी होऊन तेजीचा वेग वाढणार असल्याची दलाल स्ट्रीटवर हवा निर्माण झाली आहे. ही तेजी टिकाऊ ठरते का, आठवड्यात उत्तर मिळायला हवे. बाजाराला आधीच अंदाज गुरुवारी वेगवेगळ्या वाहिन्यांनी युतीकडे झुकलेले निवडणूक निकालांचे अंदाज जाहीर केले, तेव्हाच तेजीकडे बाजार झुकला. त्यालाधरून शुक्रवारी सेन्सेक्‍स दिवसभरात तीनशे अंशांहून अधिक अंसांनी वाढला. त्याअगोदर तेजी-मंदीच्या उलट-सुलट प्रभावात बाजार गटांगळ्या खात होता. मात्र निफ्टी ३५५० (सेन्सेक्‍स अकरा हजार) खऱ्या अर्थाने तुटलेला नाही. परकी गुंतवणूकदारांनी आठवड्याच्या सुरवातीलाच आक्रमक खरेदी करून स्थिर सरकार येण्याचा अंदाज बांधला होता. त्याचा अनुकूल परिणाम झाला. आठवड्यात सेन्सेक्‍स अडीच टक्‍क्‍यांनी आणि निफ्टी दीड टक्‍क्‍यांनी वाढले. सेन्सेक्‍स बारा हजार अंशांच्या पुढे बारा हजार १७३ अंशांवर बंद झाला. निफ्टी ३७०० अंशांच्या उंबरठ्यावर ३६७१ अंशांवर आहे. बॅंक शेअरला मागणी बॅंकिंग उद्योग अलिकडे बाजाराचा लाडका आहे. बीएसई बॅंक निर्देशांकाने आठवड्यात सहा टक्‍क्‍यांनी वाढ दाखविली. येस बॅंक आणि कोटक बॅंक १८ टक्के, आयसीआयसीआय बॅंक साडेदहा टक्के आणि एचडीएफसी बॅंक बारा टक्‍क्‍यांनी वर गेले. बराक ओबामा आऊटसोर्सिंगच्या विरोधाच्या हाकाटीकडे काणाडोळा करीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानेही तेजीचा पवित्रा घेतला. विप्रो साडेसहा टक्के, इन्फोसिस पाच टक्के आणि पटणी कॉम्प्युटर्स तब्बल २२ टक्‍क्‍यांनी वर गेले. माहिती तंत्रज्ञान उद्योगाकडे नव्या मोठ्या ऑर्डर्स येत असल्याचा फायदा त्या क्षेत्राला मिळतो आहे. डॉल्फिन ऑफशोअर आणि ऍबन ऑफशोअरने आठवड्यात ३४ टक्के वाढ दाखविली. त्यापाठोपाठ एस्सार शिपिंगही २२ टक्‍के वाढला. कच्च्या तेलाची मागणी वाढण्याची आणि त्यामधून उत्खनन व्यवसाय दोर धरण्याची बाजाराची अपेक्षा त्यामुळे स्पष्ट होते. पण, त्याचवेळी केर्न आणि ओएनजीसी आठवड्यात सुमारे आठ टक्के पडले. जिंदाल सॉ पाइप्स १८ टक्के, नाल्को १५ टक्के, रणबक्षी १३ टक्के, सिमेन्स साडेदहा टक्के हे या आठवड्यात नवी खरेदी बघणारे शेअर. निर्यात घटूनही तेजी आठवड्याच्या वाटचालीचा एकूण विचार करता, बाजारातला आत्मविश्‍वास वाढतो आहे. त्या मानसिकतेत प्रतिकूल घटनातही सकारात्मक भविष्य बघण्याचा सध्याचा कल आहे. औद्योगिक उत्पादनातही गेल्या १६ वर्षांतील वेगवान पडझड मार्च २००९ मध्ये बघायला मिळाली. ओळीने सात महिन्यांत निर्यात खालावते आहे. मंगळवारी हे जाहीर झाल्यानंतर सेन्सेक्‍सने त्या दिवशी ४७५ अंशांची झेप घेतली. सट्टेबाजी आघात पचविणार? बाजारातला एक मोठा वर्ग राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सर्थक होता. भारतीय जनात पक्षाच्या नेतृत्त्वाखालचे सरकार येणार नाही त्याचा राग काढण्यासाठीही येत्या आठवड्यात त्यांच्या कडून बाजार पडण्याचा प्रयत्न होतो आहे का, ते बघायचे. तरीही बाजारातली उभी सट्टेबाजी बघता बाजार त्या विक्रीला पचवू शकेल असाच रंग दिसतो. युतीलाच पुढची पाच वर्षे मिळणार असल्याने संधीचीच धोरणे यापुढेही कायम राहतील. त्यामुळे नव्या अपेक्षांचे पाठबळ बाजाराला मिळणार नाही. या पार्श्‍वभूमीवर बाजार १० हजार ५०० ते तेरा हजार अंशांच्या दरम्यान पुढच्या काही दिवसांत घुटमळत राहील. उत्तर लवकरच मिळणार निवडणूकीची अनिश्‍चितता इतिहास जमा झाल्यावर आता बाजार अर्थसंकल्पातून नवे संकेत शोधेल. नव्या सरकराच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था वाढीच्या दृष्टीने धोरणे राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारात तेजीचा वरचष्मा कायम राहणार आहे. अनेकवेळा भविष्याकडे आश्‍वासक नजरेतून बघण्याचा समर्पक विचार वाटेमधल्या अडथळ्यांवर मात करायला उपयोगी पडतो. सध्याच्या जागतिक मंदीतून बाहेर येण्यासाठी त्याचा उपयोग होणार का? पुढच्या काही दिवसांत त्याचे उत्तर मिळणार आहे. एकूणच चित्र प्रत्येक वेळी भाव पडल्यावर नव्या खरेदीच्या संधी शोधण्याचा आहे. बाजाराला वास्तवाची जाणीव होण्याअगोदर कमाई करण्याची वेळ शोधून फायदा कसा वाढवता येईल हीच या परिस्थितीत गुंतवणूक नीती उपयोग पडणार आहे. चहा शेअरवर लक्ष द्या चहाचे भाव बाजारात वाढताहेत. त्याचा फायदा चहा उद्योगातल्या शेअरचे भाव चढे राहण्यात होईल. मॅकलऑड रसल (९०.०५) आणि टाटा टीमध्ये (६८२.६०) खालच्या भावात खरेदी केल्यावर चांगला फायदा थोड्या दिवसांत मिळू शकतो. महिन्याभरात शाळा सुरू होतील. शालेपयोगी वस्तूंची मागणी जूनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. नवनीत पब्लिकेश (५४.४५) आणि कॅमलिन (१८.८२) त्यामुळे वाढायला हवेत. पुढच्या चार महिन्यांत विधासभा निडणूक आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठीही राज्य सरकारच्या मदतीचा हात पुढे येऊ शकतो. शुक्रवारी बॉम्बे डाइंगने आघाडी घेण्यामागे ते महत्त्वाचे कारण होते. एचडीआयएलचे मुंबईतले बस्तान बघता येत्या काळात त्या शेअरकडून अपेक्षा बाळगण्यासारख्या आहेत. साखर शेअर महत्त्वाचे? मायावतींना उत्तर प्रदेशात बसलेला झटका साखर उद्योगासाठी आनंदाची बातमी ठरावी. बजाज हिंदुस्तान आणि बलरामपूर चिनी परत वरती उसळी मारण्याची चिन्हे दिसतात/ गेल्या आठवड्यात मंदीच्या चक्रातही बजाज हिंदुस्तान शंभरच्या खाली तुटत नव्हता, बलरामपूर चिनीने ७५ पकडून ठेवला हे लक्षात घेण्यासारखे आहे. बॅंकिंग शेअरने गेल्या आठवड्यात घेतलेली झेप आणि एकूण परिस्थिती बघता येत्या आठवड्यात मंदीच्या सट्टेबाजांची गळचेपी करून बॅंकिंग शेअर विशेषकरून सट्ट्याचे मोठे सौदे होणाऱ्या खासगी क्षेत्रातले बॅंकिंग शेअर जोरदार मुसंडी मारण्याची शक्‍यता जाणवते. बाजार वास्तवाकडे पाठ फिरवून स्वतःच्या चालीने चालतो, तेव्हा फार पुढचा विचार करून हातल्या संधी गमाविणारे यशस्वी गुंतवणूकदाराचे लक्षण नाही. भविष्याची जाणीव बाजाराला होती तेव्हा बघता येईल. तोपर्यंत सुगिचा हंगाम आहे. त्याचा फायदा घेऊन कमाई वाढवत नेणे हेच यशस्वी गुंतवणूक तंत्र. फायदा हाच बाजाराचा आत्मा. त्याच्याशी नाते जुळवता आपलाही नफा आहे.

साभार-विलास महाजन /सकाळ/१६.०५.२००९

सोमवारी शेअर बाजार उसळणार!SocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment