स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Friday, May 29, 2009

शोध भुगर्भातील पाण्याचा-४

साभार-अँग्रोवन/२९.०५.२००९

पर्यावरणाच्या निरीक्षणातून पाणीसाठ्याचा शोध...

आचार्य वराहमिहीर यांची ओळख, इतिहास यांची माहिती आपण यापूर्वीच्या भागांतून घेतली. निसर्ग किंवा पर्यावरणाच्या अत्यंत जवळ जाऊन त्यातील रहस्ये उलगडणे, त्यावरून भुजलातील पाण्याचे स्रोत शोधणे या विषयात वराहमिहीर यांच्या असलेल्या गाढ्या अभ्यासावरून त्यांची विद्वत्ता किती उत्तुंग पातळीवरील होती हे सिद्ध होते. त्यांनी सुचवलेल्या लक्षणांची माहितीही आपण सध्या घेत आहोत. या भागातही आपण काही लक्षणे अभ्यासूया.
एखाद्या निर्जल किंवा निष्कंटक प्रदेशात गवताळ पट्टा किंवा कंटकमय विभाग किंवा याउलट तृणमय व कंटकमय प्रदेश निस्तृण किंवा निष्कंटक विभाग आढळला तर त्याखाली साडेचार हातावर किंवा पश्‍चिम दिशेला तीन हातावर व तीन पुरुष खोलीवर पाणी किंवा धन सापडते.

भूमीवर पाय आपटल्यानंतर जर गंभीर व कर्णसह्य ध्वनी आला तर त्याखाली तीन पुरुष अंतरावर पाण्याचा साठा आढळतो.

एखाद्या वृक्षाची फांदी निस्तेज किंवा खाली लोंबणारी असेल तर त्या वृक्षाखाली पंधरा हातांवर पाणी मिळते.

एखाद्या वृक्षाची फळे, फुले व पाने वाजवीपेक्षा जास्त तेजस्वी दिसत असतील, तर त्याच्या पूर्वेला तीन हातावर व वीस हात खोलीवर पाणी मिळेल. खोदताना प्रथम एक दगड व पिवळी माती मिळते.

जर कंटकारी झाडाला काटे नसतील व पांढरी फुले आली असतील तर भूमीखाली साडेतीन पुरुष खोलीवर पाणी मिळते.

जर निर्जल प्रदेशातील खजुराच्या झाडाला दोन शेंडे आले असतील तर त्याच्या पश्‍चिमेला दोन हातावर तीन पुरुष खोलीवर पाणी सापडते.

कर्णिकार किंवा/आणि पळस वृक्षांना लाल रंगाऐवजी पांढऱ्या रंगाची फुले आली, तर दहा हात खोलीवर पाण्याचा प्रचंड साठा असतो.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर आतून वाफ बाहेर येताना आढळली, तर दहा हात खोलीवर पाण्याचा प्रचंड साठा असतो.

शेतातील वाढलेले पीक वरून पाणी घालूनही आपोआप जळून गेले किंवा त्याची पाने वाजवीपेक्षा जास्त स्निग्ध व चमकदार झाली, तर तेथे दोन पुरुष खोलीवर पाणी मिळते.

ही सर्व लक्षणे जंगलाच्या किंवा माळरानाच्या प्रदेशात लागू पडतात. जेथे मरूभूमी किंवा वाळवंट आहे तेथे पाणी शोधून काढण्यासाठी वेगळी लक्षणे आहेत. वराहमिहिर म्हणतो, की वाळवंटी प्रदेशातील भूगर्भांतर्गत जलशिरा उंटाच्या पाठीसारख्याच वाकड्या असतात. त्या सरळ वाहत नाहीत, तसेच त्या फार खोलीवर असून थोड्या पाण्याच्या व मध्ये खंडित झालेल्या असतात. ज्या वाळवंटी प्रदेशात भूगर्भात जलशिरा आहेत, त्या ठिकाणी भूपृष्ठावर खालील लक्षणे दिसतात ः

पिलू नावाच्या वनस्पतीच्या ईशान्य दिशेला जर एखादे वारूळ असेल, तर पश्‍चिम दिशेला साडेचार हातावर पाच पुरुष खोलीवर पाणी सापडते. खोदताना पहिल्या पुरुष खोलीवर एक बेडूक, नंतर तपकिरी माती, त्याखाली हिरवट रंगाची माती व त्याखाली पाणी मिळते.

पिलू वृक्षाच्या पूर्वेला वारूळ आढळते, तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हातावर सात पुरुष खोलीवर पाणी मिळते. पहिल्या चार हातावर एक काळा व एक पांढरा, हातभर लांब सर्प दिसतो. त्याच्या दक्षिणेला क्षारयुक्त पाण्याची मोठी शीर दिसते.

करीर वृक्षाच्या उत्तरेला जर वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हात अंतरावर दहा पुरुष खोलीवर पाणी मिळते. खोदताना पाच हातावर एक पिवळा बेडूक सापडतो.

रोहितक वृक्षाच्या पश्‍चिमेला वारूळ असल्यास त्याच्या दक्षिणेला तीन हातावर व बारा पुरुष खोलीवर खाऱ्या पाण्याचा पश्‍चिमाभिमुख जलस्रोत भूगर्भात असतो.

सुवर्णक झाडाच्या उत्तरेला वारूळ आढळते, तर त्याच्या दक्षिणेला दोन हातावर पंधरा पुरुष खोलीवर क्षारयुक्त जलवाहिनी आढळते. खोदताना अडीच हातावर एक मुंगूस, नंतर तांब्याच्या रंगाचा दगड, नंतर लाल माती व शेवटी दक्षिणवाहिनी जलशिरा मिळते.




रोहित वृक्ष व बोरीचे झाड जवळ असून त्यांच्यामध्ये वारूळ असेल (असल्यास उत्तम, नसले तरी चालेल) तर त्यांच्या पश्‍चिमेला तीन हात अंतरावर सोळा पुरुष खोलीवर गोड्या पाण्याची जलशिरा मिळते. प्रथम दक्षिणवाहिनी व नंतर उत्तरवाहिनी होणारी ही जलशिरा असते. खोदताना पिठासारखा पांढरा दगड, नंतर पांढरी माती व अडीच हातांवर विंचू लागतो.

इंद्रवृक्षाच्या पूर्वेला वारूळ असल्यास पश्‍चिमेला एका हातावर १४ पुरुष पाणी लागते. पाच हात खोदल्यावर एक पिवळा सरडा सापडतो.

बोरीचे झाड व करीर वृक्ष एकमेकात गुंतले असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला तीन हातावर अठरा पुरुष खोलीवर पाणी लागते.
बोरी व पिलू वृक्ष जवळ जवळ आढळल्यास पूर्वेला तीन हातांवर वीस पुरुष खोलीवर खाऱ्या पाण्याचा अखंड झरा आढळतो.

जर करीर व ककुभवृक्ष किंवा बिल्व आणि ककुभवृक्ष जवळ जवळ असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला दोन हातावर पंचवीस पुरुष खोलीवर पाणी सापडते.

जर दुर्वा पांढऱ्या रंगाच्या असतील, तर त्या ठिकाणी २१ पुरुष खोलीवर पाणी मिळते, तेथे विहीर खोदावी.

कदंब वृक्षांनी भरलेल्या भूभागात जर दुर्वा आढळल्या तर कदंबाच्या दक्षिणेला दोन हातावर आणि २५ पुरुष खोलीवर पाणी आढळते.

तीन वारुळांतून उगवलेल्या तीन प्रकारच्या झाडामुळे जर रोहित वृक्षांशी त्रिकोण होत असेल तर उत्तरेला साडेचार हातावर व दोनशे फूट खोलीवर पाणी मिळेल. तळाशी मोठा खडक व त्याखाली पाणी असेल.

गाठी असलेल्या शमीच्या उत्तरेला जर वारूळ आढळले तर पश्‍चिमेला पाच हातावर व पन्नास पुरुष खोलीवर पाणी असते.

जर एकाच ठिकाणी पाच वारुळे आढळली व त्यातील मध्य वारूळ जर श्‍वेतरंगाचे असेल, तर त्या मध्य वारुळाच्या खाली ५५ पुरुष खोलीवर जलशिरा असते.

पळस व शमी एकमेकांजवळ वाढून, एकमेकांत गुंतले असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला पाच हातावर साठ पुरुष खोलीवर पाणी सापडते. अडीच हात खोदल्यावर एक सर्प व नंतर वाळूमिश्रित माती असते, त्याखाली पाणी असते.

जर श्‍वेतरोहित वृक्ष वारुळांनी वेढला गेला असेल तर पूर्वेला एका हातावर सत्तर पुरुष खोलीवर पाणी मिळते.

काटेरी शमीच्या दक्षिणेला एका हातावर ७७ पुरुष खोलीवर पाणी सापडते. अडीच हात खणल्यावर एक साप दिसतो.

वालुकामय प्रदेशातील लक्षणे कमी पाण्याच्या प्रदेशाला लागू पडत नाहीत. जर जांभूळवृक्ष व वेत वालुकामय प्रदेशात आढळले तर मात्र वर सांगितलेल्या खोलीच्या दुप्पट खोलीवर पाणी मिळते.

एखाद्या वारुळावर जांभळाचे झाड व त्यावर किंवा जवळच त्रिवृत्ता, मौर्वी, शिशुमारी, सारिवा, शिवा, श्‍यामा, वाराही, ज्योतिष्मती, गरुडवेगा, सूकरिता, माषपर्णी आणि व्याध्रपदा यापैकी एखादी वेल उगवलेली आढळली, तर वारुळाच्या उत्तरेला तीन हातावर तीन पुरुष खोलीवर पाणी आढळते. जर वालुकामय प्रदेशात अशी स्थिती आढळली तर २५ किंवा ३५ हात खोलीवर पाणी मिळते.
                                                                                                                                                                          क्रमश:

- डॉ. सौ. रजनी जोशी, बार्शी, जि. सोलापूर ९९२१०७७६२३, (संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)



नाशिक जिल्ह्यातील सर्व  विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना  जाहीर आवाहन....



जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६""नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
१. ११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
२. ११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
३. ११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
४. ११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
५. ११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
६. ११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
७. ११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
८. ११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
९. ११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१०. १२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
११. १२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२. १२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१३. १२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१४. १२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१५. १२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१६. १२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१७. १२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१८. १२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१९. १२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा

शोध भुगर्भातील पाण्याचा-४SocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment