साभार- अँग्रोवन/०३.०६.२००९
गिरिपुष्प हे झाड छोटे, मध्यम उंचीचे व पानांचा हिरवा गडद रंग असलेले आहे. हे झाड तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, ओरिसा, आसाम आणि पश्चिम बंगाल या भागांत अधिक प्रमाणात आढळून येते, परंतु शेतक-यांना या झाडाचा सेंद्रिय अथवा हिरवळीच्या खतासाठी उपयोग होतो याबाबत ज्ञान नाही.

या झाडाची लागवड दोन प्रकारे करतात. पहिल्या पद्धतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० सें.मी. लांब, २ ते ३ सें. मी. जाडीची दोन छाट कलमे निवडावीत आणि पावसाळ्याच्या सुरवातीस ३०x३०x३० सें.मी. वर खड्डा करून बांधावर लागवड करावी. दुसऱ्या पद्धतीने बिया पेरून लागवड करता येते. त्यासाठी वाफे करून त्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात बिया सारख्या प्रमाणात पेरून, रोपे पाच आठवड्यांची झाली असताना पावसाच्या सुरवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत. पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून, दुसऱ्या वर्षापासून पुढे प्रत्येक झाडापासून प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा पाला मिळू शकतो. एका झाडापासून वर्षाला सुमारे ८० ते १०० कि. ग्रॅ. हिरवा पाला मिळतो. या झाडाच्या फांद्यांची वरचेवर छाटणी करूनही या झाडांना नवीन फूट येते आणि त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते.
ताग आणि धैंचा यांच्या तुलनेत या झाडांच्या पानामध्ये सर्वाधिक म्हणजे २.७३ टक्के नत्र असते.
गिरिपुष्पाची पाने (पाला) फळझाडांच्या आळ्यामध्ये, तसेच इतर पिकांत ओळीमध्ये आच्छादन म्हणून पसरून दिल्यास त्याचा फायदा होतो. आळ्यामध्ये तण वाढत नाही. पाण्याच्या पाळ्या कमी लागतात. कुजल्यानंतर अन्नद्रव्ये मिळतात; तसेच गिरिपुष्पाच्या पाल्यापासून उत्तमप्रकारे कंपोस्टखतसुद्धा बनविता येते.
गिरिपुष्पाची वैशिष्ट्ये:
गिरिपुष्पाची हिरवी पाने व कोवळ्या फांद्या उभ्या पिकासाठी वापरता येतात. भात पिकासाठी हेक्टरी दहा टन गिरिपुष्पाच्या फांद्यांचा वापर करून, नत्र खताच्या मात्रेत ५० टक्के बचत होते, असे संशोधनात्मक निष्कर्ष डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठात घेतलेल्या प्रयोगाने सिद्ध झाले आहे.
भात पिकासाठी शेणखत, कंपोस्टखत यांसारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसल्यास गिरिपुष्पाचा पाला हिरवळीचे खत म्हणून चांगल्याप्रकारे वापरता येऊ शकतो. गिरिपुष्पाच्या वापरामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारले जातात.
भातशेतीत शेतकरी सेंद्रिय पदार्थांचा वापर फारच कमी प्रमाणात करतात. शेणखत, कंपोस्टखत यांसारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे गिरिपुष्पाचा हिरवळीचे खत म्हणून चांगल्याप्रकारे वापर करता येऊ शकतो
चारसूत्री भातलागवड पद्धतीत दोन टन भात पेंड्यासोबत तीन टन गिरिपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळी गाडण्याची शिफारस केली आहे, त्यामुळे नत्र खतांच्या मात्रेत १२ ते १५ किलो बचत होते. गिरिपुष्पाच्या वापरामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारले जातात. जमिनीची घनता कमी होते. सच्छिद्रता वाढते, निचरा योग्य होऊन जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमिनीत जिवाणूंची संख्या वाढते. जमिनीत स्थिर झालेल्या स्फुरदाची उपलब्धता वाढते. सर्वसाधारणपणे हिरवळीच्या खतांसाठी निवडलेल्या पिकांची वाढ जलद होणारी असावी, म्हणजे कमी कालावधीत भरपूर हिरवा पाला मिळू शकतो.
ही पिके द्विदल वर्गातील असावीत, त्यामुळे हवेतील नत्र जमिनीत साठविण्यास मदत होऊन जमिनीची सुपीकता वाढेल. या पिकाची मुळे जमिनीत खोल जाणारी व तंतुमय असावीत म्हणजे ती जमिनीच्या वरच्या थरात मिसळली जातील. हिरवळीच्या खतासाठी वापरली जाणारी पिके लुसलुशीत असावीत, म्हणजे ती जमिनीत गाडल्यानंतर लवकर कुजतील. हलक्या जमिनीतसुद्धा या पिकांची वाढ बऱ्यापैकी होणारी असावी. गिरीपुष्प या वनस्पतीमध्ये अशी सर्व वैशिष्ट्ये आढळून येतात, म्हणून या वनस्पतीला हिरवळीच्या खताचा कारखाना म्हटले आहे.
गिरीपुष्प वापराचे इतर फायदे:
1) गिरीपुष्प जमिनीत मुख्य अन्नद्रव्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्येही पुरविते.
2) जमिनीची धूप कमी होते.
3) निचरा वाढल्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी होते.
4) गिरीपुष्प जमिनीत कुजताना जी उष्णता निर्माण होते, त्या उष्णतेने जमिनीतील उपद्रवी किडींचा नायनाट होतो.
5) जमिनीत स्थिर झालेल्या स्फुरदाची उपलब्धता वाढते.
अशा पद्धतीने गिरीपुष्प ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. ताग व धैंचा यापेक्षा त्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. सेंद्रिय खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन या झाडांची डोंगर-उतारावर पडीक जमिनीत किंवा शेताच्या बांधावर प्रति 1.80 मि. अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी तीन टन हिरवळीचे पर्यायी खत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकते.
संपर्क - ०२५५३-२४४०१३
योगेश पाटील (९४२१८८६४७४)
(लेखक विभागीय कृषी संशोधन केंद्र, पश्चिम घाट विभाग, इगतपुरी, जि. नाशिक येथे कार्यरत आहेत.)
नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....
No comments:
Post a Comment