स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Saturday, May 23, 2009

सेन्सेक्स व इतर निर्देशांक


सेन्सेक्स हे सेन्सिटिव्ह इंडेक्स या शब्दप्रयोगाचे लघुरुप आहे. त्याचा मराठीतील अर्थ म्हणजे संवेदी निर्देशांक.
हा निर्देशांक भारतीय शेअर बाजारातील एक प्रमाणभूत निर्देशांक आहे.

आता निर्देशांक म्हणजे काय हे समजावण्यासाठी या निर्देशांकाचे काय काम आहे ते जाणून घेऊ.

निर्देशांकाचे काम एकच आणि ते म्हणजे किंमतीमधील चढउतार सूचित करणे. मग जर एखादा निर्देशांक समभागाधारित असेल तर तो समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. या उलट एखादा निर्देशांक बाँड्स वर आधारित असेल तर तो बाँडच्या किमतीमधील चढउतार सूचित करतो.

सेन्सेक्स हा निर्देशांक मुंबई बाजारातील समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. जेव्हा आपण सेन्सेक्स वर गेला असे म्हणतो तेव्हा शेअरबाजारामधील शेअर्सच्या किमती वाढलेल्या असतात. समभागांच्या किमती या नेहमीच त्या कंपनीच्या भविष्यातील कामगिरीचे द्योतक असतात असे म्हटले जाते. त्यामुळे समभागाची वाढणारी किंमत म्हणजे कंपनीच्या भविष्यातील कामगिरीची खात्री असे समीकरण मांडले जाते. यावरुन सेन्सेक्स वाढतो तेव्हा एकंदर कंपन्यांच्या भविष्यातील कामगिरीबाबत बाजाराची खात्री आणि एकूण अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र आहे असे मानले जाते.

सेन्सेक्स म्हणजे ३० शेअर्स. होय! फक्त ३० शेअर्स तुम्हाला बाजाराची एकूण दिशा सांगतात.
तुम्ही म्हणाल केवळ ३० शेअर्स संपूर्ण बाजाराची दिशा कसे सांगतील?
तर त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे.
हे शेअर्स हे बाजारातील सर्वाधिक उलाढाली होणारे शेअर्स असतात. मुंबई बाजारातील निम्म्याहून अधिक भांडवल हे या शेअर्समध्ये असते. शिवाय हे शेअर्स १३ हून अधिक सेक्टर्सचेही प्रतिनिधित्व करतात.

निर्देशांकातील शेअर्स निवडण्यासाठी साधारण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे:
समभागामध्ये कामाच्या प्रत्येक दिवशी व्यवहार होणे आवश्यक आहे.
गेल्या एक वर्षात सरासरी उलाढालींच्या संख्येमध्ये तसेच व्यवहाराच्या किंमतीमध्ये (विक्री किंवा खरेदी) हा समभाग पहिल्या १५० कंपन्यांमध्ये असणे गरजेचे आहे.
मुंबई शेअर बाजारात हा समभाग व्यवहारासाठी किमान एक वर्षापूर्वी नोंदणी झालेला असावा.

याचप्रमाणे निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक असून त्यामध्ये ५० समभागांच्या किमतीचे चढउतार निर्देशित होतात. नॅशनल + फिफ्टी = निफ्टी असे सूत्र आहे.

याच धर्तीवर
बीएसई १००, बीएसई ५०० असे सर्वसमावेशक निर्देशांक तर
बँकेक्स, बीएसई आयटी हे सेक्टोरल निर्देशांक आणि
मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक हे भांडवलावर आधारित निर्देशांक आहेत.

सेन्सेक्सविषयी अधिक माहिती येथे वाचता येईल.
निफ्टीविषयी अधिक माहिती येथे वाचता येईल.

भारतातील सेन्सेक्स व निफ्टी प्रमाणेच अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल ऍवरेज, जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँग सेंग, सिंगापूरचा स्ट्रेट टाईम्स इंडेक्स, कोरीयाचा कोस्पी इंडेक्स ह्या लोकप्रिय निर्देशांकांवर लक्ष ठेवले जाते.

ब्रोकरेज
आपली व्यवहाराची क्षमता व तयारी यानुसार ब्रोकरेज आकारणी केली जाते. खरेदी केलेले शेअर्स तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुमच्या डीमॅट खात्यात हवे असतील (डिलिव्हरी) तर साधारण व्यवहाराच्या ०.५% ते ०.८% पर्यंत ब्रोकरेज द्यावे लागते. लिया-दिया प्रकाराच्या सट्टेबाजी व्यवहारामध्ये (ट्रेडिंग) एकूण किंमतीऐवजी "उक्ते" (लंपसम) ब्रोकरेज उदा. एका व्यवहाराला समजा ५ रुपये असे ब्रोकरेज आकारले जाते.
या क्षेत्रात नव्याने उतरलेल्या रिलायन्स मनी सारख्या कंपन्या जम बसवण्यासाठी २०० रुपये ब्रोकरेजमध्ये कितीही व्यवहार करा अशा पद्धतीच्या आकर्षक योजना आणतात.
किती ब्रोकरेज द्यायचे असा काही नियम नसला तरी वर उल्लेख केलेल्या डिलिवरी प्रकारामध्ये ब्रोकरेज + सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मिळून १ टक्क्यापर्यंत खर्च अपेक्षित धरावा.

म्हणजे १०० रुपये व्यवहारावर (खरेदी किंवा विक्री) ब्रोकरेज + सेक्युरिटी टॅक्स + सर्विस टॅक्स असा १ रुपये खर्च होईल असे समजावे.

ऑनलाईन ब्रोकर्स उदा. इंडिया इंफोलाईन, आयसीआयसीआय डायरेक्ट, कोटक व शेरखान सारख्या कंपन्यांचे ब्रोकरेज हे थोडेसे जास्त असते. कारण तुम्हाला देण्यात येणारी व्यवहाराची सुलभता. याउलट कागदोपत्री व्यवहार करणार्‍या स्थानिक ब्रोकर्सचे ब्रोकरेज कमी असते.

पोर्टफोलिओ

आपला पोर्टफोलिओ बनवताना नेहमी दोन गोष्टींचा विचार करावा:

१. जोखीम घेण्याची क्षमता-ताकद (कपॅसिटी)
२. जोखीम सहन करण्याची तयारी (टॉलरन्स)

जोखीम घेण्याची क्षमता ही तुमच्या वयावर, तुम्ही कौटुंबिक, वैयक्तिक आयुष्यात पार पाडत असलेल्या जबाबदारीवर, तुमच्या आर्थिक आरोग्यावर अवलंबून असते तर जोखीम सहन करण्याची तयारी ही एक मानसिक वृत्ती आहे.
या दोन्हींच्या संयोगाचा तुमच्या पोर्टफोलिओवर अतिशय प्रभाव पडतो.
प्रत्येक व्यक्तीसाठी हे दोन गुणधर्म वेगळे असल्यामुळे एका व्यक्तीसाठी उत्तम असलेली गुंतवणूक ही दुसर्‍या व्यक्तीसाठी उत्तम असेलच असे नाही.

हे दोन्ही गुणधर्म जर तुमच्या बाजूने असतील उदा. जोखीम घेण्याची अधिक क्षमता व पैसे गेले तरी चालतील अशी मानसिक वृत्ती तर अधिक जोखीम व पर्यायाने अधिक परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. याउलट असेल तर कमी जोखीम व त्यामुळे कमी परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करावी लागते.

तुम्ही अतिशय मुलभूत प्रश्न विचारल्यामुळे सावधानताचा इशारा म्हणून येथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळतोच मिळतो असे नाही. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळण्याची शक्यता फक्त वाढते.

पोर्टफोलिओ तयार करताना वर दिलेला "क्षमता" हा गुणधर्म ज्या गोष्टींवर अवलंबून असतो त्याचा विचार करावा. जर तुम्ही अविवाहित, तरुण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असाल व पुढील काही वर्षे तरी शिल्लकीत टाकत असलेले पैसे वापरण्याची काहीही गरज नाही असे वाटत असेल तर समभाग किंवा त्यापेक्षा उत्तम म्हणजे समभागाधारित म्युच्युअल फंडांमध्ये अधिक गुंतवणूक करावी. याउलट जर पैशाची निकड नजीकच्या भविष्यात लागेल असे वाटत असेल तर बाँड/डेट आधारित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी.

थेट समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्यास आधी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहात त्या क्षेत्राचा थोडासा अभ्यास करावा.
सध्या तेजीत असलेल्या क्षेत्रामधील वाईट कंपन्याही चांगला परतावा देतात तर सध्या साडेसाती असलेल्या क्षेत्रामधील अतिशय चांगल्या कंपन्या लाखाचे बारा हजार करु शकतात हे ध्यानात ठेवावे.
उदा. सध्या रुपया तेजीत असल्यामुळे डॉलरच्या विनिमयदरावर फायदा आधारित असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्राचे बूच लागलेले आहे. त्यामुळे इन्फोसिस सदृश कंपन्या ह्या कितीही चांगल्या असल्या तरी क्षेत्राला चांगले दिवस नाहीत. याउलट क्यापिटल गुड्स, ऊर्जा क्षेत्राला सरकारी सवलती मिळत असल्यामुळे तसेच बांधकामे करणार्‍या क्षेत्रालाही चांगले दिवस असल्यामुळे ही क्षेत्रे चांगली आहेत. बांधकाम करणार्‍या क्षेत्रावर अवलंबून असेलेले सीमेंट क्षेत्रही चांगले वाटेल. मात्र सीमेंटच्या किमती नियंत्रित करण्याच्या सरकारच्या धरसोड धोरणामुळे तेथे काहीही होऊ शकते. साखरेचीही तशीच गत आहे. अशा प्रकारचा जुजबी अभ्यास प्रत्येक क्षेत्राबद्दल ठेवावा.

एकदा कोणती क्षेत्रे निवडायची हे ठरले की त्यात्या क्षेत्रामधील अग्रगण्य व फायदेशीर कंपन्या शोधून त्यांचा थोडासा अभ्यास करावा. गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांनी किती फायदा कमावला आहे. पुढे कितपत फायदा कमावतील याबाबत त्यांची दिशा कशी आहे हे पहावे. एकाच क्षेत्रातील दोन कंपन्यांचे फायदे व शेअरची किंमत यांचे गुणोत्तर तपासून कोणती कंपनी घेण्यास स्वस्त आहे हे पहावे.

सर्किट ब्रेकर्स
सर्किट ब्रेकर्स हा सेबीने गुंतवणुकदारांचे पैसे वाचवण्यासाठी आणलेला उत्तम मार्ग आहे.
१७ मे २००४ चा काळदिवस आठवा. भाजपाचे सरकार पडल्यामुळे बाजारातील खेळाडुंनी मार्केट जोरदार सटकवले होते. किंवा परदेशी गुंतवणूकदारांनाही कर द्यावा लागेल अशी पुडी अर्थमंत्र्यानी सोडल्यामुळेही गेल्या वर्षी मार्केट आपटले होते. अशा प्रसंगी हे सर्किट ब्रेकर्स मदतीला येतात.

बाजारात प्रमुख घटक हा मनुष्य असल्यामुळे मनुष्यस्वभावाचे मुख्य पैलू - लोभ आणि भीती येथे पाहायला मिळतात. वर सांगितलेल्या प्रसंगांसारख्या घटना घडल्या की अर्थशास्त्राचे मूलभूत नियम विसरुन भावनांवर स्वार झालेले खेळाडू मग जोरदार खरेदी किंवा विक्री सुरु करतात आणि पर्यायाने बाजार भरमसाट वधारतो किंवा सपशेल आपटतो. अशा प्रसंगी थोडा वेळ व्यवहार बंद करुन शांत डोक्याने विचार करण्यातच शहाणपणा असतो हे सूत्र आहे. त्यामुळे अशी असाधारण वाढ किंवा घट दिसली की सर्किट ब्रेकर्स लागतात.

बाजारात दोन प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत.

१. संपूर्ण बाजार/सेन्सेक्स/निफ्टी सर्किट ब्रेकर
२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर

संपूर्ण बाजाराचा सर्किट ब्रेकर हा उपरोल्लिखित घटनांमध्ये वापरला गेला आहे. तो लागू होण्याचे नियम साधारणतः असे.

. निर्देशांकामध्ये १० टक्क्याची वाढ किंवा घट.
    दुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : १ तास व्यवहार बंद
    दुपारी १ ते २.३० मध्ये झाल्यास : अर्धा तास व्यवहार बंद
    २.३० नंतर झाल्यास: : व्यवहार सुरु राहतात.

. निर्देशांकामध्ये १५ टक्क्याची वाढ किंवा घट.
    दुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : २ तास व्यवहार बंद
    दुपारी १ ते २.०० मध्ये झाल्यास : १ तास व्यवहार बंद
    २.०० नंतर झाल्यास : व्यवहार दिवसभरासाठी बंद.

. निर्देशांकामध्ये २० टक्क्याची वाढ किंवा घट.
    दिवसभरात केव्हाही : व्यवहार दिवसभरासाठी बंद

२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर:
यामध्ये प्रत्येक शेअरच्या किमतीच्या चढ-उताराची मर्यादा निश्चित केली जाते. याला अपवाद म्हणजे सेन्सेक्स मध्ये अंतर्भूत असलेल्या ३० शेअर्सना व निफ्टीमधील ५० शेअर्सना कोणताही स्वतंत्र सर्किट ब्रेकर नाही. मात्र इतर सर्व शेअर्सना स्वतंत्र/वैयक्तिक सर्किट ब्रेकर आहे.

शेअरचा सर्किट ब्रेकर या प्रत्येक दिवशी बाजारामध्ये जाहीर केला जातो. साधारण २%, ५%, १०% २०% अशा प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत. शेअर बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळांवर व्यवहाराच्या दिवशी प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर समजू शकतो.


ता.क.
१८ मे २००९ सोमवारी डाव्या पक्षांचा 'लगाम' नसलेले, डॉ. मनमोहन सिंग यांना 'फ्री हॅण्ड' असलेले यूपीए सरकार पुन्हा सत्तेवर आल्याने शेअर बाजाराने अभूतपूर्व २१११ अंशांची उसळी घेत या सरकारला विक्रमी सलामी दिली. 
एकाच दिवशी दोन हजारांनी सेन्सेक्स उंचावण्याची तसेच सौदे सुरू होताच अप्पर सकिर्ट ब्रेकर लागून ते थांबवले जाण्याची शेअर बाजाराच्या इतिहासातील हि पहिलीच वेळ होती.
या दिवशी सेन्सेक्समध्ये २१११ अंशांनी वाढ होऊन तो १४,२८४ वर बंद झाला तर एनएसईच्या निफ्टीत ६५१ अंशांची भर पडून तो ४३२३ वर स्थिरावला. सकिर्ट बेकर लावून तेजीला चाप लावण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्याने दुपारी १२ नंतर सौदे थांबवण्यात आले. यापूर्वी २५ जानेवारी २००८ रोजी सेन्सेक्स ११३९ अंशांनी वाढला होता.






नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....



जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६""नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा

सेन्सेक्स व इतर निर्देशांकSocialTwist Tell-a-Friend

1 comment: