स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Tuesday, May 26, 2009

शोध भुगर्भातील पाण्याचा-१


भूगर्भातील पाणी शोधणारा प्राचीन ऋषी वराहमिहीर

पावसाचा थेंब न्‌ थेंब कसा साठवता येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल, या विषयाकडे आता गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. पाचव्या शतकात वराहमिहीर नावाचा प्रकांड ज्योतिषी व पर्यावरणशास्त्रज्ञ होऊन गेला. भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्याविषयी त्याने स्वतः संशोधन केलेच, शिवाय अन्य ऋषींचे संशोधनही आपल्या "बृहत्‌संहिता' या ग्रंथात संस्कृत भाषेत लिहून ठेवले आहे.
बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील अधिव्याख्याता सौ. रजनी जोशी यांना हे संशोधन शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले. आजच्या काळाला त्याची सुसंगत जोड देता येईल किंवा सध्याच्या संशोधनाला त्यातील काही सिद्धांतांचा, नियमांचा उपयोग होऊ शकेल, असा त्यांना विश्‍वास आहे. त्या दृष्टीने त्यांनी आपले लेखन "ऍग्रोवन"च्या वाचकांसमोर ठेवले आहे. आजपासून दररोज मालिकास्वरूपात हे लेखन उपलब्ध करीत आहोत.

पाण्याला संस्कृतमध्ये "जीवन' असे नाव आहे. पावसाचे पाणी पृथ्वीवर पडल्यावर ते चहूवाटांनी इतस्ततः वाहू लागते. ते तसेच वाहू दिल्यास एक तर ते सरळ समुद्रात वाहून जाईल किंवा पृथ्वीच्या गर्भात जिरून जाईल. जिरून गेलेले हे पाणी कसे शोधून काढावे हा मोठा गहन प्रश्‍न आपल्या समोर उभा राहतो. भूगर्भांतर्गत पाणी शोधून काढण्यासाठी काही निरीक्षणे नियम, सिद्धांत, शास्त्रे तयार करावी लागतात. जमिनीत कुठे किंवा कसे खोदावे याचे काही नियम आहेत. भूमीच्या अंतर्भागात असणारे पाण्याचे साठे शोधून काढणे हे मोठे आव्हान भूगर्भशास्त्रज्ञांसमोर पूर्वीही होते, आताही आहे. त्यासाठी बुद्धीची व ज्ञानाची कसोटी लागते. भारत हे प्राचीन राष्ट्र आहे व त्याने एक संस्कृती निर्माण केली आहे. या संस्कृतीचे माध्यम असणारी संस्कृत हीदेखील प्राचीन भाषा आहे. त्यामध्ये आधुनिक विज्ञानाची अनेक बीजे लपलेली आहेत. संस्कृतातील विज्ञान सर्व जगाला थक्क करून सोडणारे आहे.

या भारतभूमीत पाचव्या शतकात एक प्रकांड ज्योतिषी व पर्यावरण शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचे नाव वराहमिहीर. त्याने त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या ज्योतिष शास्त्रज्ञांचे निष्कर्ष सूत्ररूपाने आपल्या "बृहत्‌संहिता' नामक संस्कृत ग्रंथात ग्रथित करून ठेवले आहेत. वराहमिहिराच्या पूर्वीचे ग्रंथवाङ्‌मय आज उपलब्ध नाही, त्यामुळे वराहमिहिराच्या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वराहमिहिराच्या बृहत्‌संहितेत "दकार्गल' नावाचा अध्याय असून, त्यात भूमीवरील लक्षणांवरून भूगर्भांतर्गत पाण्याचा साठा कसा शोधून काढावा याविषयी अत्यंत उद्‌बोधक व शास्त्रीय माहिती दिली आहे. वराहमिहिराच्या प्रत्येक विधानाला शास्त्राचा व सत्याचा पाया आहे. अल्‌-बिरौनी नावाचा अरब शास्त्रज्ञ व प्रवासी म्हणतो,
"Varahamihira has already reveal hismself to us as a man who accurataly knows the shape of the earth. His foot stands firmly on the basis of truth and he clearly speaks out the truth.''

भिन्न-भिन्न प्रदेशात भूगर्भांतर्गत पाणी शोधण्यासाठी भिन्न-भिन्न पद्धती अवलंबाव्या लागतात. वराहमिहिराच्या सिद्धांतांची उपयुक्तता १९८१ मध्ये उन्हाळ्यात आंध्रमध्ये चित्तूर जिल्ह्यात ज्या वेळी पाण्याचा दुष्काळ पडला त्या वेळी दिसून आली. त्या वेळी तिरुपतीच्या श्री. वेंकटेश्‍वर विद्यापीठाने इस्रो (Indian Space Research Organisation) आणि विद्यापीठ अनुदान मंडळ (University Grants Commission) यांच्या मदतीने एक जलसंशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत बोअरवेल खोदल्या होत्या. एकूण १५० विहिरी खोदल्या व प्रत्येक विहिरीला पाणी लागले. या कामासाठी त्यांनी वराहमिहिराने दिलेल्या लक्षणांची मदत घेतली व पाणी शोधून काढले. श्री. वेंकटेश्‍वर विद्यापीठाच्या आवारात विहिरी खोदतानादेखील वराहमिहिराच्या सिद्धांतांचीच मदत घेतली गेली. यावरून आपल्या कटिबंधापुरती तरी वराहमिहिराची योग्यता मोठी ठरते. Science and the Vedas या पुस्तकात लिहिलेल्या Ground Water Science-Need for Reorientaion या आपल्या लेखात (पान ८४) या विषयातील गाढे शास्त्रज्ञ डॉ. ई. व्ही. ए. प्रसाद हा संदर्भ सांगून लिहितात.

"These bore-weels provide two lakh gallons of water per day. These and several other field operations have proved, beyond doubt, the excellence and efficacy of Varahamihira's Methods for rapidly and successfully locating ground water resources.''

वराहमिहिराच्या "दकार्गल' या अध्यायाचा अभ्यास करून मी पुणे येथील वाडिया महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विषयाचे प्रमुख डॉ. उदय कुलकर्णी, त्याच विभागातील डॉ. आय. ए. खान, डॉ. अजित वर्तक आदी तज्ज्ञांची मदत घेतली. त्याआधारे Rejestivity पद्धतीने वराहमिहिराच्या दकार्गलमधील जलसंशोधन पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील पाण्याची पाच स्थाने (स्पॉट) पाहिली व वराहमिहिराच्या जलसंशोधन पद्धतीची यशस्विता अनुभवता आली. हे करीत असतांना त्याने सांगितलेले खडकांचे, तसेच मातीचे प्रकार, वृक्षवनस्पती, वारुळे या सर्वांचा विचार केला.

सोलापूर जिल्ह्यात बार्शी-सोलापूर कारंबा रोडवरील येथे दोन स्पॉट, कासारवाडी येथील एक स्पॉट, उस्मानाबाद जिल्ह्यातील माणकेश्‍वर व गुरुकुल येडशी येथील दोन स्पॉट अशा एकूण पाच स्पॉटमध्ये वराहमिहिर पद्धतीने यशस्वी जलसंशोधन करता आले. आजच्या विज्ञानयुगात पाचव्या शतकातील वराहमिहिराचे सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येणे शक्‍य आहे, हे मी माझ्या छोट्या प्रयत्नांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.

वराहमिहिराच्या "दकार्गल' अध्यायाचे यश हे या सिद्धतेच्या रूपात लपले आहे असे मला वाटते. या कामी पुणे येथील डॉ. मनोहर देवकृष्ण पंडित यांच्या प्राचीन भारतीय जलशास्त्र व मुंबईच्या कॅप्टन आनंद बोडस यांच्या चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचे प्रणेते आचार्य वराहमिहीर या पुस्तकांचा, तसेच डॉ. ए. व्ही. प्रसाद यांच्या संशोधनाचा फार उपयोग झाला. श्री. शिवाजी महाविद्यालयाचे (बार्शी) प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांच्याकडून प्रथम प्रेरणा मिळून संशोधनाचे हे काम पूर्ण करता आले. या प्रयत्नात डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. वर्तक, डॉ. खान यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. याशिवाय माझे पती रा. वा. जोशी, कुटुंबीय तसेच अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे.

ओळख वराहमिहिराची
पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजेच इ. सनाच्या सहाव्या शतकाच्या आरंभी अवंति या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशावर सम्राट विक्रमादित्याची सत्ता होती. या प्रदेशाची राजधानी उज्जयिनी म्हणजे आज उज्जैन नावाने प्रसिद्ध असलेले शहर होय. हे शहर इंदूरच्या उत्तरेला आहे. अवंती प्रदेशात त्या काळात कांपिल्लक नावाचे गाव होते. ते आता काल्पि अथवा कायथा नावाने ओळखले जाते. या कांपिल्लक गावात सूर्योपासनेसाठी प्रसिद्ध असलेल्या कुटुंबात आचार्य वराहमिहीर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आदित्यदास होते. आदित्यदास हे वेद-शास्त्रांचे जाणकार पंडित होते. वेदाभ्यास, शास्त्राभ्यास, ज्ञानार्जन आणि अध्यापन ही त्यांची जीवनवृत्ती होती. आदित्यदासांनी आपल्या मुलाचे नाव "वराहमिहीर' ठेवले. वराहमिहीर हे सूर्यदेवतेचे नाव आहे.

आचार्यांच्या ग्रंथात स्वतः आचार्यच आपण आदित्यदासाचे पुत्र वराह-मिहीर असल्याचे सांगतात. "वराह' या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. श्रेष्ठ मिहीर देदीप्यमान व भगवान विष्णू या अर्थापैकी श्रेष्ठ व देदीप्यमान या अर्थाने वराह शब्द मिहीर (सूर्य) या नावाला लावून आचार्यांच्या वडिलांनी वराहमिहीर असे आपल्या मुलाचे नामकरण केले.

त्यांचा जन्म चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी या दिवशी शके ४२७ मध्ये झाला. हा जन्मदिन तारीख २० मार्च ५०५ (इ.स.) असा लिहिता येतो. त्यांच्या जन्माविषयी थोडे फार मतभेद असले तरी, बहुतांश भाष्यकारांनी व अभ्यासकांनी इ.स. ५०५ हेच वर्ष स्वीकारले आहे. वराहमिहिरांचे घराणे परंपरेने सूर्योपासक होते. त्यांचे वडील आदित्यदास हे त्यांचे ज्ञानगुरू होते. घराण्यामध्ये परंपरेने चालत आलेल्या सूर्योपासनेला तत्कालीन शिक्षण पद्धतीप्रमाणे केलेल्या ऋग्वेदाच्या अध्ययनामुळे तात्त्विक व शास्त्रशुद्ध आधार मिळाला असावा. ऋग्वेदात सूर्याला आदर्श देवता मानले असून, त्याच्यावर अनेक सूत्रे रचली गेली आहेत. गायत्री मंत्र हा तर सूर्योपासनेचा अद्वितीय मंत्र आहे. प्राचीन काळी उदयाला आलेली भारतातील खगोलशास्त्र व फलज्योतिषशास्त्रही सूर्याला विश्‍वाचे केंद्र व विश्‍वातील घडामोडींचे आद्यकारण मानतात. साहजिकच सूर्योपासक वराहमिहिराचे या दोन शास्त्रांच्या अध्ययानाकडे लक्ष वेधले गेले. वराहमिहिराने या अध्ययनाला आपले जिवितकार्य मानले व इ.स. ५८७ मध्ये मृत्यू येईपर्यंत ते अविरतपणे चालू ठेवले. त्यांचा बृहत्संहिता हा ग्रंथ त्यांच्या या प्रदीर्घ, सखोल व व्यासंगपूर्ण अध्ययनाचा एक अमोल ठेवाच आहे.

वराहमिहिराची ग्रंथसंपदा
निसर्गातील प्रत्येक घटकाचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. निसर्गाच्या भूतकाळातील, तसेच वर्तमानकाळातील स्थितीचा अभ्यास, निरीक्षण केल्यास मानवी जीवनाचा वेध घेता येतो. त्याच अनुषंगाने आचार्य वराहमिहिरांनी या क्षेत्रात केलेले कार्य अचंबित करणारे आहे. खगोलशास्त्र, वनस्पतिशास्त्र, भूगर्भशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हवामानशास्त्र, प्राणिशास्त्र, जलशास्त्र या व अन्य शास्त्रांचा परस्परसंबंध आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास व विवेचन आचार्य वराहमिहिरांनी त्यांच्या ग्रंथात केलेले आहे.

आचार्य वहारमिहिरांची ग्रंथसंपत्ती विपुल आहे. वराहमिहिराने ग्रहांप्रमाणेच भू- गोलाची, तेथील प्राणी, वनस्पती, पर्जन्य, वास्तू आदी विषयांवर चिंतन केले आहे. वराहमिहिराच्या पूर्वसुरींनी व स्वतः त्यांनी पाण्याविषयी संशोधन करून जे शास्त्रीय सिद्धांत आपल्या बृहत्संहितेत ग्रंथित केले त्यांचा विचार आधुनिक काळात उपयुक्त आहे.

"पाणी' या विषयावर बृहत्‌संहितेत विस्ताराने विचार आला आहे. त्यात मेघवर्णन, मघोपत्ती, जलगर्भधारणा, पर्जन्यवृष्टी, तिचा काळ व प्रकार, पृथ्वीवर पडलेले पाणी, जमिनीच्या अंतर्भागात जिरून गेल्यावर तो कसे व कोणत्या साधनांनी आणि लक्षणांनी शोधून काढून मानवास जीवनासाठी उपलब्ध करून द्यावे. पाणी कसे साठवावे व शुद्ध राखावे इ. पाण्यासंबंध सर्व सिद्ध दिलेले आहेत. बृहत्संहितेत पाण्याविषयी असलेले अध्याय खालीलप्रमाणे आहेत - १) गर्भलक्षणाध्याय, २) गर्भधारणाध्याय, ३) प्रवर्षणाध्याय, ४) दकार्गलाध्याय.

आकाशात जे पाणी तयार होते, त्याविषयी बलदेव, गर्ग, कश्‍यप व देवल हे ऋषी तज्ज्ञ मानले गेले. भूगर्भातून पाणी कसे शोधून काढावे याविषयी सारस्वत व मनू हे ऋषी प्रमाणभूत मानले गेले. त्यांच्यानंतर उत्पल नावाच्या ऋषीने या शास्त्रशाखेत खूपच प्रगती केली. वराहमिहिराने हे सर्व सिद्धांत बृहत्संहितेत एकत्रित केले.

बृहत्‌संहिता - विशाल ज्ञानसागरच!
वराहमिहिराचा बृहत्‌संहिता हा ग्रंथ छंदोबद्ध असून, त्याची भाषा सुंदर व काव्यमय आहे. वराहमिहिराने जागोजागी विविध ऋषींचे संदर्भ दिले आहेत. ग्रंथातील "दकार्गल' हा अध्याय पाणी या विषयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जमिनीतील पाणी कसे शोधावे याचा सांगोपांग अभ्यास त्यात केला आहे. पाणी शोधत असताना भूगर्भातील जलशिरांचा विशेष अभ्यास या अध्यायात दिसून येतो.
                                                                                                                                                                          क्रमश:
संपर्क - डॉ. सौ. रजनी जोशी
९९२१०७७६२३ (संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)


डॉ. सौ. रजनी जोशी या बार्शी (जि. सोलापूर) येथील श्री. शिवाजी महाविद्यालयात संस्कृत विषयात अधिव्याख्याता पदावर कार्यरत आहेत. एम.ए. पदवी घेतलेल्या सौ. जोशी यांनी "महाभारतातील सांख्यदर्शन विचार' या विषयातून डॉ. ए. एच. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आहे. त्यांनी आपल्या विषयात विविध प्रावीण्ये व शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत. "राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ' तिरुपती (आंध्र प्रदेश) यांच्याकडून जानेवारी १९९९ मध्ये त्या मानचिन्हाने सन्मानित झाल्या आहेत.
under ground water of varahamihiras brahtsanhita या विषयावरील संशोधन प्रकल्पाला विद्यापीठ निधी अनुदानाकडून (यूजीसी) मान्यता मिळाली आहे. पूर्वीच्या ऋषींनी संस्कृत भाषेत ज्ञानाचे मोठे भांडार लिहून ठेवले आहे, त्यात विज्ञान आणि शास्त्रांची रहस्ये दडली आहेत, ती मराठी भाषेत आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. वराहमिहिराचे संशोधन हा त्यातीलच एक प्रयत्न. या विषयावर काम करताना त्यांनी विज्ञान विषयातील संबंधित शास्त्रज्ञांची मदत घेतली आहे. अनेक शोधनिबंधांबरोबरच जगन्नाथ संस्कृत विश्‍वविद्यालय (पुरी), ओरिसा येथील राष्ट्रीय परिषदेत "वराहमिहिराचे भूगर्भस्थ जलसंशोधन' या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला आहे.

शोध भुगर्भातील पाण्याचा-१SocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment