स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Sunday, May 24, 2009

लोकशाहीचे तरुण आधारस्तंभ

साभार-लोकरंग/लोकसत्ता/२४.०५.२००९


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २६ ते ४० वयोगटातील ८१ खासदार निवडून आले आहेत. पंधराव्या लोकसभेतील १५ टक्के आसने त्यांनी व्यापलेली असतील. बहुतांश तरुण खासदार उच्चविद्याविभूषित आहेत. लोकशाहीच्या या तरुण आधारस्तंभांची ओळख-
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सव्वाशे वर्षांची ‘बुढिया’ म्हणून काँग्रेसची टर उडवित होते. पण या वृद्ध पक्षाचे तरुण उमेदवार, भाजपचे ८२ वर्षीय नेते लालकृष्ण अडवाणी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न धुळीस मिळवतील, अशी शंका अतिआत्मविश्वासाने प्रचार करणाऱ्या मोदींच्या मनात डोकावलीही नसेल. १६ मे रोजी निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा अनपेक्षितपणे २०५ जागाजिंकणा-या काँग्रेसच्या यशात
तरुण खासदारांनी मोलाचा वाटा उचलला होता. दुसरीकडे उग्र हिंदूत्ववादी नरेंद्र मोदींची जागा घेऊ पाहणाऱ्या युवा वरुण गांधींची अतिआक्रमकता या निवडणुकांमध्ये भाजपला चांगलीच भोवली, असा ठपका आता भाजप-रालोआचे नेते ठेवू लागले आहेत. त्यामुळे पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयात आणि भाजपच्या पराभवात तरुण रक्ताची भूमिका निर्णायक ठरली, असाही निष्कर्ष काढता येईल.
धाडसी निर्णय घेऊन समाजकारण आणि राजकारणातील प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देण्याची क्षमता तरुण नेतृत्वाने नेहमीच सिद्ध केली आहे. यंदाच्या लोकसभेत ३९ वर्षीय राहुल गांधी यांच्या आक्रमकतेतून ती दिसून आली. राहुल गांधींनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेसला स्वबळावर लढण्यास भाग पाडले नसते आणि पंजाबमध्ये अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन नव्या रक्ताचे उमेदवार उतरविले नसते, तर आज पंधराव्या लोकसभेत काँग्रेस पक्ष सुस्थितीत पोहोचला नसता. अर्जुन सिंह, प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग यांच्यामुळे वार्धक्याकडे झुकलेल्या काँग्रेसमध्ये तरुणाईची सळसळ निर्माण करण्यासाठी यंदा लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी स्वत: पुढाकार घेत तरुण उमेदवारांना संधी दिली. त्यांनी एनएसयुआय आणि युवक काँग्रेसच्या १० पदाधिका-यांना निवडणुकांच्या रिंगणात उतरविले आणि आठ जणांचा विजय निश्चित केला.
देशातील जनतेलाही तरुण नेतृत्वाची आस लागलेली आहे, हे २६ ते ४० वयोगटातील ८१ खासदार निवडून आल्यामुळे अधोरेखित झाले आहे. बहुतांश तरुण खासदार उच्चविद्याविभूषित आहेत. सामान्य पार्श्वभूमी असलेल्या आणि तळागाळातून संघर्ष करीत तरुण वयात लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर पोहोचणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. भारतीय लोकशाहीवरील राजकीय घराण्यांचे वर्चस्वच त्यातून दिसून येते.
अर्थात ही राजकीय पुण्याई घराण्यांचा वारसा चालविणा-या सर्वच तरुण नेत्यांचा वाट्याला सहजासहजी आलेली नाही. दिवंगत केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे पुत्र मोहम्मद हमदुल्ला सईद यांनी लक्षद्वीपमधून २००४ साली आपल्या पित्याने गमावलेली जागा यंदा खेचून आणली. उत्तर माल्डामध्ये दिवंगत ए. बी.ए. गनीखान चौधरींच्या पुतण्या मौसम बेनझीर नूर यांनी प्रतिस्पर्धी डाव्या आघाडीबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांचा विरोध मोडून काढत विजय मिळविला. पंजाबच्या आनंदपूर साहिब मतदारसंघात दिवंगत मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आणि पंजाब युवक काँग्रेसचे पहिलेवहिले निर्वाचित अध्यक्ष रवनीतसिंग बिट्टू यांनी अकाली दलाच्या उमेदवाराला धूळ चारत पंधरावी लोकसभा गाठली. राजस्थानच्या मारवाड भागात दिवंगत नाथुराम मिर्धा यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी त्यांची ३६ वर्षीय नात डॉ. ज्योती मिर्धांनी नागौर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळविला. आजोबा बन्सीलाल आणि पिता सुरींदर सिंह यांचे छत्र गमावलेल्या श्रुती चौधरींनी हरियाणाच्या भिवानी-महेंद्रगढ मतदारसंघात संघर्ष करून विजय मिळविला. दिवंगत केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांच्या मतदारसंघातून प्रिया दत्त दुस-यांदा संघर्ष करीत लोकसभेवर पोहोचल्या. काँग्रेसचे आक्रमक नेते दिवंगत राजेश पायलट यांचे पुत्र सचिन पायलट यांच्यावर तर मतदारसंघ पुनर्रचनेत दौसा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर अजमेरच्या आश्रयाला जाण्याची वेळ आली होती. अजमेर हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ आणि विरोधात किरण माहेश्वरी यांच्यासारख्या प्रबळ प्रतिस्पर्धी असूनही सचिन पायलट दुसऱ्यांदा लोकसभेवर पोहोचण्यात यशस्वी ठरले. हीच कथा युपीए सरकारच्या शेवटच्या वर्षांत केंद्रीय राज्यमंत्री बनलेले दिवंगत जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र जितीन प्रसाद यांची. मतदारसंघ पुनर्रचनेत शाहजहानपूर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर जितीन प्रसाद यांना शेजारच्या धौरहरा मतदारसंघातून निवडणूक लढणे आणि विजय मिळविणे क्रमप्राप्त ठरले. या सर्वांना विजयासाठी कमालीचा संघर्ष करावा लागला.
माता-पित्याच्या पुण्याईवर लोकसभेत एकदा संधी मिळाल्यावर दुस-यांदा विजय मिळवून आपला जनाधार भक्कम करणाऱ्या तरुण खासदारांमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित, हरयाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांचे पुत्र दीपेंद्रसिंग हुड्डा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांचे पुत्र अनुरागसिंह ठाकूर, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांचे पुत्र दुष्यंत सिंह, माजी लोकसभा अध्यक्ष पूर्णो संगमा यांच्या कन्या अगाथा संगमा यांचा समावेश होतो. गेल्या लोकसभेत त्यांच्यापैकी संदीप दीक्षित यांनी आपली छाप पाडली होती. काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेशसिंह यादव यांनी चाळीशीच्या आतच तिस-यांदा लोकसभा गाठून अनुभवाच्या बाबतीत तरुण खासदारांमध्ये आघाडी घेतली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे उद्योगपती पुत्र वाय. एस. जगन मोहन रेड्डी हेही कडप्पा मतदारसंघात विजय मिळवून लोकसभेवर पोहोचले आहेत. चौधरी चरण सिंह यांचा राजकीय चालविण्यासाठी त्यांचे नातू व चौधरी अजित सिंह यांचे पुत्र जयंत चौधरी मथुरा मतदारसंघातून सज्ज झाले आहेत. राजस्थान विधानसभेचे दोनदा सदस्य राहिलेले अल्वरचे तरुण महाराजा, ३८ वर्षीय भंवर जितेंद्रसिंह आता लोकसभेवर निवडून आले आहेत. ते राहुल गांधी यांचे निकटचे सहकारी आहेत. पण चाळिशीच्या आत लोकसभेत पोहोचलेल्या या ८१ खासदारांपैकी किती जणांना भविष्यातील नेते मानता येईल? महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून आलेल्या तरुण खासदारांची येथे चर्चा करणार नाही. कारण महाराष्ट्रात त्यांच्या क्षमतांविषयी यापूर्वी भरपूर चर्चा झालेली आहे.
वरुण गांधी
मागे वळून पाहताना पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिंदूत्वाचा मुद्दा उग्रपणे मांडून भाजप आणि रालोआविरोधातील मतांचे ध्रुवीकरण केल्याचा ठपका वरुण गांधींवर भाजपचे नेते खासगीत आणि रालोआचे नेते उघडपणे ठेवत आहेत. प्रक्षोभक भाषणामुळे भाजपचे नुकसान झाले असले तरी पिलीभीतमध्ये मोठय़ा अंतराने विजय मिळवून वरुण गांधी आता लोकसभा गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत. खासदार म्हणून वरुणची सुरुवात स्फोटक होणार यात शंका नसली तरी ‘बाहेरचा’ असा लेबल लागल्यामुळे भाजप-संघ परिवारात ते कितपत सामावले जातात याबाबत शंकाच आहे. त्यांची राजकीय वाटचाल भाजपमध्ये निर्माण होणा-या नेतृत्वाच्या पोकळीवर अवलंबून असेल.
अखिलेशसिंह यादव
मुलायमसिंह यादव यांच्या मुशीत तयार होत तिसऱ्यांदा लोकसभेवर पोहोचलेले अखिलेशसिंह यादव यांना उत्तर प्रदेशसारख्या राज्यात पित्याच्या राजकीय संघर्षांला पुढे नेताना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल. एकीकडे बसपच्या सर्वेसर्वा मायावती, दुसरीकडे राहुल गांधी यांचा वाढता प्रभाव आणि भाजपचे आक्रमक राजकारण यातून अखिलेशसिंह यांना मार्ग शोधावा लागणार आहे.
सचिन पायलट
लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सचिन पायलट यांच्याऐवजी केंद्रीय मंत्रिमंडळात जितीन प्रसाद यांना पसंती देण्यात आली. त्यावेळी पक्षसंघटनेच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास सचिन पायलट यांना सांगण्यात आले होते. आता अजमेरसारख्या भाजपच्या गडातून विजयी झाल्यानंतर पायलट यांना हवा तो ‘ब्रेक’ मिळण्याची शक्यता आहे. सचिनचे मेहुणे ओमर अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत. राजकारण आणि प्रशासनाविषयी ठाम व रोखठोक मते बाळगणाऱ्या राहुल गांधींचे खंदे समर्थक व सहकारी व्हायचे की पक्षांतर्गत स्पर्धक व्हायचे; यावर सचिन पायलट यांची भविष्यातील वाटचाल अवलंबून असेल.
ज्योतिरादित्य शिंदे
तिस-यांदा लोकसभेवर निवडून आलेले ज्योतिरादित्य हे तरुण खासदारांमधील बुजुर्ग आहेत. त्यांचा रुबाब, कुठल्याही मुद्यावर बोलतानाचा आवेश, इंग्रजी आणि हिंदी भाषांवरील हुकमत यामुळे ते लोकसभेत रंगणा-या चर्चेत कुणालाही सहजासहजी हार जात नाहीत. त्याची चुणूक त्यांनी लालकृष्ण अडवाणींच्या युक्तिवादाची चिरफाड करताना दाखवून दिली आहे. ‘बापसे बेटा सवाई’ अशी अल्पावधीत प्रतिमा तयार करणारे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात भविष्यात राहुल गांधी यांना गंभीर आव्हान देण्याची क्षमता आहे. तसे प्रयत्न दिल्लीतील काही नेतेमंडळी आतापासूनच करायला लागले आहेत. त्यात यश आले नाही तर भविष्यात मध्य प्रदेशचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना समाधान मानावे लागेल.
जितीन प्रसाद
ज्योतिरादित्य शिंदेंच्या बरोबरीने केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेले जितीन प्रसाद हे सध्या राहुल गांधींचे विश्वासू सहकारी मानले जातात. दिवंगत पिता जितेंद्र प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बंडखोरी करून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. अशा प्रकाराची पुनरावृत्ती टाळल्यास उत्तर प्रदेशच्या राजकारणात जितीन प्रसाद यांना ब्राह्मण असण्याचा मोठा फायदा मिळू शकतो आणि राष्ट्रीय राजकारणातही त्यांना आपली उंची वाढविण्याची संधी असेल.
अनुरागसिंह ठाकूर
केवळ पित्याच्या जोरावर दोनदा लोकसभेवर निवडून आलेलो नाही, हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांचे पुत्र अनुरागसिंह सहज सिद्ध करू शकतात. त्यांनी अल्पावधीत आपली छाप पाडून भविष्याविषयी आशा पल्लवित केल्या आहेत. भाजपच्या बाकांवरील मोजक्याच तरुण नेत्यांमध्ये त्यांना आघाडी प्रस्थापित करता येणे शक्य आहे. पण आता वरुण गांधी यांचे आगमन झाल्यामुळे एक संयमी आणि परिपक्व तरुण नेता अशी प्रतिमा त्यांना घडवावी लागेल. तोपर्यंत हमीरपूरमधील जनाधार संपूर्ण हिमाचल प्रदेशात विस्तारून आपली ताकद वाढविण्यावर त्यांना भर द्यावा लागणार आहे.
संदीप दीक्षित
स्वयंसेवी संघटनांशी जवळचा संबंध असल्यामुळे राजकारणात वावरताना पारदर्शीपणाची झलक संदीप दीक्षित यांच्या वागण्यात दिसते. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे राजकीय वारस म्हणून त्यांनी दिल्लीच्या राजकारणावर आपली पकड घट्ट बसविली आहे. स्पष्टवक्तेपणा आणि सामाजिक मुद्यांविषयी वाटणारी तळमळ यामुळे संदीप दीक्षित यांच्याविषयी शहरी भागात आकर्षण आहे. पूर्व दिल्ली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी या भागामध्ये विकासाच्या अनेक कामांचा धडाका लावला आहे. राहुल गांधींपेक्षा वयाने मोठे असूनही ते संयमाने वाटचाल करीत आहेत. भविष्यात ते दिल्लीतील काँग्रेसचे आशास्थान ठरू शकतात.

लोकशाहीचे तरुण आधारस्तंभSocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment