स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Sunday, November 22, 2009

यशवंतराव पंतप्रधान का होवू शकले नाहीत?

साभार- लोकप्रभा/२७ नोव्हेंबर २००९ / इतिहास/ प्रा. मो. नि. ठोके

येत्या २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून गौरविला जाणारा हा द्रष्टा नेता पंतप्रधानपदाची खुर्ची भूषवण्यासाठी योग्य मानला जात होता. पंतप्रधानपदाने त्यांना नेमकी कशी हुलकावणी दिली त्याचा एक ऐतिहासिक धांडोळा.
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात लो. टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण हे महान नेते होऊन गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय अशीच झाली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल यांच्या हयातीतच पं. नेहरूंनंतर कोण? राजकारणातील या नाजूक प्रश्नाची चर्चा होऊ लागली, तेव्हा त्यावेळी संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत असलेले यशवंतराव चव्हाण यांच्याच नावाची चर्चा होती.

‘आफ्टर नेहरू व्हू?’ या ग्रंथाचे लेखक वेल्स हेंगेन यानी नेहरू यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण हे योग्य असल्याचे म्हटले होते. तसेच अनेक राजनीतिज्ञ, विचारवंत, संपादक यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेतले होते. सन १९६७ च्या सुमारास जयप्रकाश नारायण यांनीही यशवंतराव चव्हाण यांची पंतप्रधान म्हणून निवड व्हावी; ते या पदास योग्य नेते आहेत असे मुंबईतील एका कार्यक्रमात म्हटले होते. फ्रँक मोराईस, एन. जे. नानपोरिया या संपादकांनी नेहरू यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण हे पंतप्रधान होण्यास लायक आहेत आणि ते चव्हाण यांना शक्यही होईल असे म्हटले होते.मात्र पं. नेहरू यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान झाले आणि लालबहादूर शास्त्री यांच्या दीड वर्षांच्या अल्प कारकीर्दीनंतर श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यानी आपल्या अमर्याद धाडसी वृत्तीने आणि काहीशा सूड वृत्तीने तत्कालीन काँग्रेसमधील बडय़ा नेत्यांना नेस्तनाबूत केले. यशवंतराव चव्हाणही त्यांच्या राजनीतीसमोर निष्प्रभ झाले आणि ते पंतप्रधान कधीच झाले नाहीत. उलट त्यांचा राजकीय शेवट शोकांत झाला. क्लेशदायक झाला!

यशवंतराव चव्हाण यांचे नाव पं. नेहरूंच्या हयातीतच पंतप्रधान म्हणून तत्कालीन मोरारजीभाई देसाई, स. का. पाटील, निजलिंगप्पा, के. कामराज, जगजीवन राम, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी या सर्व काँग्रेस नेत्यांमध्ये आघाडीवर होते. असे असताना ते पंतप्रधान का होऊ शकले नाहीत, हे पाहणे गरजेचे वाटते.




यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत नेतृत्वासंबंधी अत्यंत आदर बाळगूनही असे म्हणावेसे वाटते की, त्यांचे प्रथमपासूनचे राजकारण तडजोडवादी, हिशेबी दिसते. राजकारणात झोकून देणे, धोका पत्करणे असा त्यांचा पिंड दिसत नाही.

सन १९४६ साली मुंबई राज्य विधानसभेची निवडणूक झाली. काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कृपेने बाळासाहेब खेर यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. दे. भ. केशवराव जेधे हे महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते. तरीही मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी मंत्रिमंडळ बनविताना त्यांना विश्वासात घेतले नाही आणि बहुजन समाजातील निवडून आलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. प्रत्यक्ष राज्यकारभार सुरू झाल्यानंतर शेतकरी-कामगार यांच्या हिताच्या विरोधी धोरणे राबविण्यात येऊ लागली. भांडवलदारांना अनुकूल धोरणे राबविण्यात येऊ लागली. त्यामुळे दे. भ. केशवराव जेधे, भाऊसाहेब राऊत, तुळसीदास जाधव, काकासाहेब वाघ, पी. के. सावंत, शंकरराव मोरे इ. बहुजन समाजाचे नेते नाराज झाले. या नाराज नेत्यांनी ११ सप्टेंबर १९४६ रोजी पुणे येथे बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसअंतर्गत शेतकरी कामगार संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. या पहिल्या बैठकीला यशवंतराव चव्हाण हजर होते. एकूण ४० आमदार हजर होते. ११ जानेवारी १९४७ रोजी भाऊसाहेब राऊत यांच्या मुंबई येथील घरी बैठक झाली. या आमदारांच्या बैठकीला यशवंतराव चव्हाण यांनी हजर राहून शेतकरी-कामगार संघ स्थापन करण्याची जरुरी नाही अशी भूमिका मांडली आणि त्यांनी काढता पाय घेतला.

यशवंतराव चव्हाण यावेळी बाळासाहेब खेरांच्या मंत्रिमंडळात मोरारजीभाई देसाई यांचे पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. त्यांना मंत्रीपद पाहिजे होते, मात्र त्यांना ते न मिळाल्याने ते नाराज झाले होते. तरीही त्यांनी काँग्रेस पक्षात राहणे पसंत केले. कारण शे.का. पक्षात तुळसीदास जाधव, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब राऊत, क्रांतिसिंह नाना पाटील, पी. के. सावंत, रा. ना. शिंदे, व्यंकटराव पवार, के. डी. पाटील, रामभाऊ नलावडे हे बहुजन समाजातील मातब्बर नेते गेले होते. या पाश्र्वभूमीवर आपण बहुजन समाजातील नेते म्हणून आपणास काँग्रेस पक्षात महत्त्व प्राप्त होईल, असा हिशेब करून यशवंतराव काँग्रेस पक्षातच राहिले. यशवंतरावांचा हा मुत्सद्दीपणा होता की चाणाक्षपणा होता की दूरदृष्टीचा विचार होता हे सांगणे अवघड वाटते. शे. का. पक्ष हा शेतकरी आणि कामगार यांचे हित जपण्यासाठी स्थापन झाला होता. आणि स्वत: यशवंतराव हे एका गरीब शेतकरी कुटुंबातील होते. पुढे सन १९५२ साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांत शे. का. पक्षाचा दारुण पराभव झाला. काँग्रेस पक्षाला प्रचंड यश मिळाले. या निवडणुकीत मोरारजीभाई देसाई यांचा पराभव होऊनही ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले. यामागे भाऊसाहेब हिरे यांची पुण्याई होती. भाऊसाहेब हिरे हे महसूल व शेती या खात्याचे मंत्री होते. मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई आणि भाऊसाहेब हिरे यांच्यात पहिल्याच अंदाजपत्रकातील महसुलातील उपकर व विक्रीकर वाढविण्यावरून मतभेद झाले. मोरारजीभाईंना हे कर वाढवायचे होते आणि हिरे यांचा कर वाढविण्याला विरोध होता. यामुळे या दोघांत बेबनाव निर्माण झाला. भाऊसाहेब हिरे महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्षही होते. मुख्यमंत्री आणि अध्यक्ष यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. या संघर्षांत यशवंतराव यांनी ठाम अशी भूमिका घेतली नाही.


या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात सुरू होती. मुंबईसह सारा महाराष्ट्र या चळवळीने ढवळून निघत होता. अशांत होता! धुमसत होता! २९ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात अनेक माणसं ठार झाली होती. मोरारजींच्या काळात १०५ माणसं ठार झाली होती. संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता यानी हौतात्म्य पत्करले होते. २३ जानेवारी १९५६ रोजी भाऊसाहेब हिरे यानी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मोरारजी देसाई यांच्याशी झालेल्या संघर्षांची ही परिणती होती. १ नोव्हेंबर १९५६ रोजी विशाल द्वैभाषिक राज्याची स्थापना झाली. मोरारजी देसाई अमानुष गोळीबारामुळे आणि हेकेखोर स्वभावामुळे बदनाम झाले होते. ते द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होणे अशक्य होते. हिरे-देसाई वादात यशवंतराव, मोरारजीभाई यांच्याजवळ गेले होते. १६ ऑक्टोबर १९५६ रोजी मुख्यमंत्रीपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत मोरारजी देसाई यांनी आपले वजन यशवंतरावांच्या पारडय़ात टाकले आणि भाऊसाहेब हिरे यांचा पराभव करून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. पुढे पाच-सहा महिन्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांत महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. संपूर्ण विशाल द्वैभाषिक मुंबई राज्यात काँग्रेसला कसेतरी बहुमत मिळाले आणि यशवंतराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड बसविली. त्यांनी अभ्यासपूर्ण आणि कार्यक्षमतेने कारभार सुरू केला. पुरोगामी धोरणाची खंबीरपणे अंमलबजावणी केली. कृषी-औद्योगिक, समाजरचना हे धोरण अंमलात आणले. सहकार, शिक्षण, साहित्य वाङ्मय, कला, क्रीडा आदी सर्व क्षेत्रात आधुनिक-लोकोपयोगी धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी जनतेचे स्वप्न साकार झाले. बेरजेचे राजकारण करून तुळसीदास जाधव, शंकरराव मोरे, यशवंतराव मोहिते, आनंदराव जाधव, शिवाजीराव पाटील यांना यशवंतरावांनी काँग्रेस पक्षात आणले आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष अगदी मजबुतीने उभा केला. सन १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. यशवंतरावांची आणि काँग्रेसची प्रतिमा/ लौकिक उजळला.

चीनने ऑक्टोबर १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले. भारताची लष्करी तयारी पुरेशी नव्हती. संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि भ्रष्टाचारामुळे भारताचा पराभव झाला. पंतप्रधान पं. नेहरू हादरून गेले. कृष्णमेनन यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली. नेहरूंनी नाईलाजाने कृष्णमेनन यांचा राजीनामा घेतला आणि यशवंतराव चव्हाण यांची संरक्षणमंत्री म्हणून नेहरूंनी नियुक्ती केली. यशवंतरावांचा दिमाख्याने राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. आपल्या चिकाटीने आणि अभ्यासपूर्ण कामगिरीने त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली. लष्करात ते लोकप्रिय झाले! देशात त्यांचा लौकिक वाढू लागला. पं. नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री करण्याचे ठरविले, त्या वेळी मोरारजी देसाई, टी. टी. कृष्णम्माचारी यांनी विरोध केला होता. संरक्षणमंत्री या नात्याने यशवंतरावांची कामगिरी देशपातळीवर लक्षवेधक ठरली. त्यांच्यासंबंधी देशात अपेक्षा वाढल्या. मात्र देशपातळीवरील काँग्रेसमधील नेते मोरारजी देसाई, स. का. पाटील, विजू पटनाईक, डी. पी. मिश्रा यशवंतरावांच्या विरोधी बोलू लागले. यशवंतराव हे प्रांतीय नेते आहेत. बेभरवशाचे आहेत. तडजोडवादी आहेत. तात्त्विक राजकारणावर ठाम भूमिका घेत नाहीत. ते तत्त्वशून्य आहेत. अशी टीका यशवंतरावांवर होऊ लागली. संयमी यशवंतरावांनी या टीकेकडे दुर्लक्ष केले.

सिंडिकेट-इंडिकेटसंबंधी यशवंतरावांची भूमिका नडली :

३ मे १९६९ रोजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे अचानक निधन झाले आणि नवीन राष्ट्रपती कोण असावा यावरून काँग्रेसमध्ये सत्तास्पर्धेचे जोरदार राजकारण सुरू झाले. मोरारजी देसाई, स. का. पाटील, निजलिंगप्पा, के. कामराज, अत्युल्य घोष या उजव्या विचारांच्या नेत्यांचा सिंडिकेट गट आणि श्रीमती इंदिरा गांधी, फक्रुद्दिन अली अहमद, जगजीवन राम, दिनेशसिंग या डाव्या विचाराच्या नेत्यांचा इंडिकेट गट यांच्यात आपल्या विचाराचाच राष्ट्रपती असावा म्हणून डावपेच सुरू झाले. काँग्रेस कार्यकारिणीत सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डींना पाठिंबा दिला. यशवंतरावांनी रेड्डींना आपले मत दिले. रेड्डींना बहुमत मिळाले. यशवंतरावांनी रेड्डींना मत दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांना विचारले तर ते नाईक यांना म्हणाले, ‘‘माझी कमिटमेंट झाली आहे.’’ काय कमिटमेंट झाली आहे हे मात्र चव्हाणांनी नाईक यांना सांगितले नाही. सिंडिकेटने यशवंतरावांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. म्हणूनच यशवंतरावांनी सिंडिकेटला पाठिंबा दिला. यशवंतरावांची हीच भूमिका वादळी ठरली आणि पंतप्रधानपद त्यांच्यापासून दूर गेले.

जुलै १९६९ मध्ये बंगलोर येथे काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करण्यात येणार होता. बंगलोर येथे श्रीमती इंदिरा गांधी, फक्रुद्दिन अली अहमद, जगजीवन राम आणि यशवंतराव चव्हाण यांच्या झालेल्या बैठकीत महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षांत जगजीवन राम यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी फक्रुद्दिन अहमद यांनी पुढे आणावयाचे आणि त्याला यशवंतरावांनी पाठिंबा द्यावयाचा असे चर्चेत बोलले गेले. तेव्हा यशवंतराव म्हणाले की, माझी कमिटमेंट झाली आहे. त्यावर श्रीमती इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘‘पॉलिटिक्समें बहुतसी कमिटमेंट होती हैं।’’ यावर यशवंतराव हसले. गांधींना वाटले चव्हाणांनी आपल्याला पाठिंबा दिला. कमिटमेंटसंबंधी प्रत्यक्ष चर्चा झाली नाही. यानंतर झालेल्या काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत यशवंतरावांनी जगजीवन राम यांना पाठिंबा दिला नाही. एकमताने निर्णय होत नाही हे पाहून काँग्रेस अध्यक्ष निजलिंगप्पा यांनी मतदान घेतले. रेड्डींना पाच मते आणि जगजीवन राम यांना चार मते पडली. या वेळेपासून यशवंतराव हे इंदिरा गांधींच्या मनातून साफ उतरले. दोघा नेत्यांत बेबनाव निर्माण झाला. तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही. व्ही. गिरींना श्रीमती इंदिरा गांधींनी रेड्डींच्या विरोधात उभे करून आपली सर्व प्रकारची राजकीय ताकद वापरून राष्ट्रपती म्हणून निवडून आणले. (ऑगस्ट १९६९) राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल लागला. सिंडिकेटचा दारुण पराभव झाला. १७ ऑगस्ट १९६९ रोजी के. कामराज यशवंतरावांना भेटले आणि आपला पाठिंबा आम्हास कायम ठेवा. आम्ही आपणास दिलेला शब्द पाळू असे सांगितले. मात्र यशवंतराव राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सिंडिकेटचा पराभव झाल्यानंतर इंडिकेट गटात सामील झाले. येथेही पुन्हा धरसोड वृत्ती चव्हाणांनी अवलंबिली. मोरारजी देसाई आणि यशवंतराव यांच्यात गुप्त समझोता झाला होता. सन १९६९ पासून १९७२ पर्यंत मोरारजींनी पंतप्रधान राहावयाचे आणि १९७२ नंतर यशवंतरावांनी पंतप्रधान व्हावयाचे. हा गुप्त समझोता इंदिरा गांधींना समजला होता. काँग्रेस फुटली होती. त्यामुळे लोकसभेत काँग्रेसला फक्त २१ चे बहुमत राहिले होते. महाराष्ट्रात यशवंतरावांना मानणारे काँग्रेसचे ४५ खासदार होते. या ४५ खासदारांचा पाठिंबा इंदिरा गांधींना लोकसभेत अत्यंत गरजेचा होता. म्हणून इंदिरा गांधींनी यशवंतरावांना १९७२ नंतर पंतप्रधानपदाचे आश्वासन दिले. गांधींनी राष्ट्रपती निवडणुकीत विजय हस्तगत केला होता. त्यांचे पारडे जड झाले होते. म्हणूनच यशवंतरावांनी गट बदलला. सिंडिकेटमधून इंडिकेटमध्ये गेले.

यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेसंदर्भात ‘चव्हाण अॅण्ड द ट्रबल्ड टू डिकेड’ या पुस्तकात म्हटले आहे की, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या यशवंतराव चव्हाण यांनी रेड्डींना पाठिंबा दिल्यामुळे अत्यंत रागावल्या होत्या. त्या यशवंतरावांना मंत्रिमंडळातूनच काढणार होत्या. मात्र यशवंतरावांकडे महाराष्ट्रातील ४५ खासदार असल्याने त्यांची भूमिका लोकसभेत निर्णायक ठरणार होती. द्वारकाप्रसाद मिश्रा यांनी इंदिरा गांधींना सांगितले की, यशवंतरावांना आपल्या बाजूला घेतले की आपला लोकसभेत विजय होईल. त्या बदल्यात त्यांना मंत्रिमंडळातून काढू नये. हा विचार इंदिरा गांधींना पटला आणि त्यांनी यशवंतरावांना मंत्रिमंडळातून काढण्याचा विचार सोडून दिला.

सन १९७०-७१ साली बांगलादेशची निर्मिती पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या अतुलनीय धाडसामुळे- मुत्सद्देगिरीमुळे झाली. पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. त्यामुळे देशात आणि परदेशात श्रीमती गांधींचा मोठा दबदबा निर्माण झाला. त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. या पाश्र्वभूमीवर धूर्त श्रीमती इंदिरा गांधींनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका १९७१ मध्ये घेतल्या. ‘गरिबी हटाओ’चा नारा त्यांनी दिला आणि या निवडणुकीत त्यांना प्रचंड यश मिळाले. त्यांना यशवंतरावांची गरज उरली नाही. त्यामुळे यशवंतरावांना पंतप्रधानपद देण्याचा प्रश्न राहिला नाही. पात्रता-योग्यता, लोकशाही मूल्यावर अविचल निष्ठा असूनही यशवंतराव पंतप्रधान झाले नाहीत, याचेच खूप वाईट वाटते. ठाम-खंबीर भूमिकेच्या अभावामुळे चव्हाणसाहेब पंतप्रधान झाले नाहीत. धरसोड वृत्ती नडली आणि महाराष्ट्र एका सोनेरी इतिहासाला मुकला. चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत, अभ्यासू, कार्यक्षम अशा यशवंतराव चव्हाण यांची २५ नोव्हेंबर २००९ रोजी २५ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांच्या पुण्य स्मृतींना नम्र अभिवादन!

lokprabha@expressindia.com

यशवंतराव पंतप्रधान का होवू शकले नाहीत?SocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment