निवडक शेअरमध्येच खरेदी इष्ट! - डॉ. वसंत पटवर्धन (सा.सकाळ १३मे२००९)
गुंतवणूक करताना सावधानता आवश्यक-
निर्देशांक आता कित्येक दिवस 11000 वर राहिला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापेक्षा तो 38 टक्क्यांनी वर आहे; पण काही शेअर या कालावधीत 40 ते 60 टक्के वाढले आहेत. लार्सन टुब्रोत 56 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 58, रिलायन्स पेट्रो 48 तर स्टेट बॅंकेच्या शेअरमध्ये 45 टक्के वाढ दिसली. शिववाणी ऑईल थ्री आय इंफो, टाटा स्टील, ऑर्बिट कॉर्पोरेशन, युनिटेक, एचडीआयएल या शेअरमध्ये ज्यांनी अल्पमुदतीत विक्री केली असेल त्यांना निदान 35 टक्के फायदा झाला असेल. अनेक विश्लेषक जरी याला बेअरमार्केट रॅली म्हणत असले तरी अंदाज चुकल्यामुळे त्यावर पांघरूण घालण्यासाठीचे हे शब्द आहेत.
ज्या कंपन्यांचे मूलभूत स्थैर्य चांगले आहे, त्यांचे भाव आता सतत वर जात राहतील. कारण इथे ठराविक क्षेत्रात भरपूर ऑर्डर आहेत. मागणी नसल्याने मंदी निर्माण व्हायचे इथे अनेक वर्षे कारण असणार नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर लार्सन टुब्रोला गेल्या दोन-अडीच महिन्यात मिळालेल्या कामांची यादी अशी आहे ः 1245 कोटी रुपयांचे काम भूतान हायड्रो पॉवर प्रोजेक्टसाठी, 1344 कोटी रुपयांचे काम मंगलोर रिफायनरीकडून, 1436 कोटी रुपयांचे काम आखाती देशातून, 1143 कोटी रुपयांचे काम टाटा स्टीलतर्फे, 1100 कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन विभागातून, 345 कोटी रुपयांचे काम अणुऊर्जा प्रकल्पांच्या क्रिटिकल इक्विपमेंटसाठी, 162 कोटी रुपयांचे काम निवासिका व कारखाने उभारण्यासाठी, 605 कोटी रुपयांचे कंत्राट जल व पोलाद क्षेत्रांतून, अशी एकूण 52000 कोटी रुपयांची कामे लार्सन टुब्रोकडे आहेत. लॅंको इन्फ्रा, इरा इन्फ्रा, युनिटी इन्फ्रा, रिलायन्स इन्फ्रा, जीएमआर इन्फ्रा या कंपन्यांनाही लहान-मोठी कामे मिळतच आहेत.
सॉफ्टवेअर क्षेत्रातही इन्फोसिसने संकेत दिले आहेत तितकी मंदी नाही. थ्री आय इंफोने आपले मार्च 09 वर्षाचे संगठित आकडे प्रसिद्ध केले आहेत, ते चांगले आहेत. पूर्ण वर्षाची विक्री 2285.64 कोटी रुपये झाली व त्यावरील करोत्तर नफा 292.38 कोटी रुपये झाला. शेअरगणिक उपार्जन 19.02 रुपये होते. सप्टेंबर 08 नंतर मंदी आली, असे म्हटले तरी डिसेंबर 08 व मार्च तिमाहीची विक्री व नफा कमी झालेला नाही. मार्च 09 तिमाहीची विक्री 606 कोटी रुपये होती व नफा 90 कोटी रुपये होता. अन्य सहयोगी कंपन्यांचा 30 कोटी रुपयांचा नफा वजा करूनही नफा 60 कोटी रुपये होता व तिमाही शेअरगणिक उपार्जन 4.80 रुपये होते.
थ्री आय इंफोचा भाव मध्ये 28 रुपयांवरून 48 रुपयांवर गेला होता; पण नंतर तो 42 रुपयांपर्यंत खाली आला होता. याही भावाला किं/ उ. गुणोत्तर फक्त 2.22 पट इतके कमी आहे. शेअरमध्ये जसजशी तेजी वाढेल तसतसे गुणोत्तर वाढत राहील. त्यामुळे वर्षभरात या शेअरमध्ये चांगला नफा मिळावा. पूर्वी या शेअरमध्ये फार व्यवहार दिसायचे नाहीत; पण आता अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष तिकडे गेले असल्याने व्यवहार वाढत आहेत व भाव पूर्वीचा 160 रुपये, अशा कमाल भावाइतका होणे शक्य नसले तरी तो 80 रुपयांपर्यंत सहज जावा, असे वाटते. थ्री आय इंफो हा डेरिव्हेटिव्ह व्यवहारांच्या यादीतून सेबीने जूनपासून कमी केला आहे. त्यामुळे त्यात आता सट्टेबाजी न होता, खरे निवेशन होईल.
अजून 50 शेअर डेरिव्हेटिव्ह व्यवहारासाठी जूनपासून कमी केले आहेत. त्यात ऍमटेक ऑटो, बाटा इंडस्ट्रीज, बॉम्बे डाईंग, बिर्ला कॉर्पोरेशन, सेंट्रल बॅंक, डीसीबी, गीतांजली, एस्कॉर्टस, हॅवेल्स, एचसीएल इंफो, गुजरात नर्मदा फर्टिलायझर्स, गेटवे डिस्ट्रिपार्कस, हिंदुस्थान ऑईल एक्स्प्लोरेशन, केएसके एनर्जी, लक्ष्मी मशिन वर्क्स, कर्नाटक बॅंक, महिंद्र लाइफ स्पेस डेव्हलपर्स, नवभारत व्हेंचर्स, मोनेट इस्पात, एनडीटीव्ही, एनआयआयटी, पेनिन्शुला लॅंड, राजेश एक्स्पोर्टस, रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फ्रा, थर्मेक्स, स्टाईल अर्कोलॅब, एसआरएफ, युटीव्ही, वॉकहार्ड फार्मा, टॉरेंट पॉवर यांचा समावेश आहे.
शेअर पंधरा ते पंचवीस टक्के भाव खाली-वर नेऊन, सामान्य निवेशकांना झुलवायचा खेळ खेळला. तो आता कमी होईल व कंपन्यांच्या मूलभूत शक्तीवरच आता त्यांचे मूल्यमापन होईल. या यादीतील शेअरचे मार्चचे आकडे बघितल्यानंतर त्यातील काही कंपन्यांचा गुंतवणुकीसाठी विचार करता येईल.
पुढील दोन आठवड्यांनंतर निवडणुकांचे निकाल येतील तेव्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार आहे. नवीन मंत्रिमंडळ कसे असेल, अर्थमंत्री कोण होईल, नवीन अर्थसंकल्प विकासाभिमुख असेल का, त्याची दिशा कशी असेल, हे बघण्यावर बाजाराचा कल बदलत राहील.
सर्व बॅंकांचे नफ्याचे आकडे वाढते आहेत व ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स त्याला अपवाद नाही. मार्च 09 तिमाहीसाठी तिचा नक्त नफा 195.92 कोटी रुपये आहे. मार्च 08 तिमाहीमध्ये तिला 99 कोटी रुपयांचा तोटा होता. सध्या शेअरचा भाव 317 रुपयांच्या आसपास आहे आणि या तिमाहीचा नफा व उपार्जन वार्षिकीकृत केले तर किं/उ. गुणोत्तर 4.1 पट पडते. पूर्ण वर्षाचा मार्च 09 साठी 905 कोटी रुपये आहे. सध्या भाव 136 रु. आहे. बॅंकेचे भाग भांडवल 250.54 कोटी रुपये आहे. तिची नक्त अनार्जित कर्जे फक्त 0.65 टक्का एवढी कमी आहेत. या वर्षी 73 टक्के लाभांश (शेअरवर 7.30 रुपये) जाहीर झाला आहे. केंद्र शासनाचे या बॅंकेत 51.09 टक्के भांडवल आहे.
बॅंक ऑफ बडोदाला यंदा 2227 कोटी रुपये नक्त नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या 1775 कोटी रुपयांपेक्षा तो 55 टक्के जास्त आहे. तिची अनार्जित नक्त कर्जे 1.27 टक्के आहेत. बॅंकेचे भागभांडवल 367 कोटी रुपये आहे. सध्याचा भाव 317 रुपये आहे व पूर्ण वर्षाचे शेअरगणिक उपार्जन 60 रुपये पडते. त्यामुळे किं/उ. गुणोत्तर 5.3 पट पडते. फक्त काही महिन्यांपूर्वीच शेअरचा भाव 181 रुपये होता. त्यामुळे सध्या या शेअरची खरेदी न करता, पुन्हा जेव्हा भाव सुमारे 225 रुपयांपर्यंत येईल, तेव्हा निवेशनाचा विचार करावा. सध्या सर्वच शेअरचे भाव वाढल्याने निवेशन थांबवणे इष्ट!
Thursday, May 14, 2009
गुंतवणूक करताना सावधानता आवश्यक
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment