स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Thursday, May 14, 2009

कोरडवाहू शेतीचे तंत्र गवसलेले क्षीरसागर बंधू

अँग्रोवन/१४ मे २००९
कोरडवाहू शेतीचे तंत्र गवसलेले क्षीरसागर बंधू
झोकून देण्याची मानसिकता असेल, तर कोरडवाहू शेतीसुद्धा फायद्याची होते. लातूर जिल्ह्यातील क्षीरसागर बंधूंनी सोयाबीन, हरभरा आदी पिकांच्या यशस्वी शेतीतून नेमके हेच सिद्ध केले आहे. पूर्वी कर्ज काढून शेती करणारे हे शेतकरी बंधू आज शेतीत स्वयंपूर्ण झाले आहेत, त्यामागे आहे त्यांचे जाणीवपूर्वक नियोजन, अभ्यास, सुधारित तंत्र स्वीकारण्याचा ध्यास.
राज्यातल्या वहितीखालील क्षेत्रापैकी पाच ते सात टक्के क्षेत्र बारमाही बागायतीखाली, तर नऊ ते दहा टक्के क्षेत्र हंगामी बागायतीखाली येते, उर्वरित ८० ते ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.

पाण्याची शेती झाली की भरमसाट उत्पन्न मिळते, असा एक समज आहे; मात्र वस्तुस्थिती तशी नाही. मात्र जो फायद्याची शेती करतो, त्याकडे काटेकोर व्यवस्थापन, शेतीबद्दलची श्रद्धा, आत्मविश्‍वास अन्‌ तांत्रिक ज्ञान हे गुणधर्म असणे महत्त्वाचे असते. शेतीत झोकून देण्याची मानसिकता असेल, तर कोरडवाहू शेतीसुद्धा फायद्याची होते. फक्त सात-आठ महिने काम करूनही स्वाभिमानाने राहता येते, हे लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्‍यातील हाडगे येथील श्रीराम व संतोष क्षीरसागर या अनुक्रमे बारावी व आठवी शिकलेल्या बंधूंनी सिद्ध करून दाखविले आहे.

वडिलोपार्जित हलकी-भारी मिळून त्यांची २९ एकर शेती आहे, त्यात दहा एकर हलक्‍या प्रतीची माळरान जमीन आहे. उर्वरित जमीन बऱ्यापैकी मध्यम व निचऱ्याची आहे. क्षीरसागर बंधू शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जनावरांचे संगोपन करतात, त्यांच्यासाठी पक्का गोठा बांधला आहे, सर्वांना वर्षभर हिरवा चारा मिळण्याची व्यवस्था केली आहे. मका, यशवंत गवत, लूसर्न आदींच्या कडबाकुट्टीमुळे ओला-सुका चारा वाया जाणे बंद झाले. वर्षाला तीसेक ट्रॉली शेणखत मिळायला लागले. दुसरी विशेष बाब म्हणजे शेतातून धूर निघणे (काडी लावणे) बंद केले. गवत, काडी-कचरा, धसकट, चगळ, पाचट आदी सर्व घटक गोळा करून ते कुजवले जातात. खताच्या खड्ड्यावर स्प्रिंक्‍लर लावले आहे, त्यामुळे सगळा कचरा लवकर कुजण्यास मदत होते, त्याचे खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. उन्हाळ्यात रानात जनावरे बांधल्याने दोनेक एकर रान खतावले जाते, तर शेळ्या-मेंढ्या बसवून दोन एकर रान खतावण्याची पद्धतशीर आखणी आलटून-पालटून केली जाते. दर वर्षी शेत ट्रॅक्‍टरने मार्चमध्ये नांगरून दोन-तीन महिने तापू दिले जाण्याने रोग-किडीचा पुढे होणारा प्रादुर्भाव कमी होतो, पिकांची उगवण क्षमता चांगली मिळते.

मॉन्सूनचा पहिला चांगला पाऊस झाला, की जे ५-३३५ सोयाबीन घेतले जायचे. चालू वर्षी एमएयूएस - ७१ चे बीजोत्पादन दहा एकर क्षेत्रावर घेतले. पेरतेवेळी एकरी एक पोते डीएपी दिले. अठरा इंची तिफणीने एकरी ३० किलो बियाणे लागले. संतोष पेरणीत माहीर असून, कुठल्याही पिकाचे बियाणे ठराविक अंतरावर व सरळ रेषेत ठराविक खोलीवर पेरतो, त्यामुळे एकरी रोपांची संख्या हवी तेवढी भरते, रान मोकळे राहात नाही. पेरणीनंतर विशिष्ट कालावधीच्या आत इमिझाथॅपर हे तणनाशक विशिष्ट पंपाने फवारले जाते. कोणत्याही पिकाचे अपेक्षित उत्पादन न येण्याचे कारण म्हणजे खुरपणी वेळेत न होणे, खरिपात सगळीकडे खुरपणीची एकच घाई असते. मजुरांवर अवलंबून राहिल्याने महिना किंवा त्याहीपेक्षा अधिक काळापर्यंत पहिली खुरपणी होत नाही, तिथेच काही प्रमाणात उत्पादन घटते. पिकाला दिलेली खते, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये ही तणे खातात, पिकाची वाढ खुंटते, त्यामुळे मजुरीवरील खर्च टाळून ठराविक वेळेत तणनाशकाची फवारणी करण्यावर क्षीरसागर बंधूंचा विश्‍वास आहे.

उपलब्ध मोठे क्षेत्र वेळेत फवारून व्हावे म्हणून एच.टी.पी.च्या साह्याने फवारणीची सुधारित पद्धत त्यांनी छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे तयार केली आहे. दहा फूट लांब पितळी नळीला तीन फुटांवर सहा नोझल बसवून हॅंडल व मध्यभागी पट्टा फिटिंग करून तो गळ्यात अडकविला जातो. दोघेजण पाइप ओढून देतात. एका वेळी एक हजार लिटर पाणी बसेल अशा टाकीत मिश्रण करून एका तासात आठ एकर क्षेत्र फवारले जाते. एका वेळी सहा ओळी धरून फवारता येते, सर्व क्षेत्रावर समान फवारणी होते.

पाठीवरच्या पंपाने फवारणी केल्यास एका एकरासाठी दोन मजूर व सहा तास लागतात, त्यामुळे सुधारित पद्धतीत अशी दहापट बचत होते, तसेच दर वीस दिवसांनी आलटून-पालटून गरजेनुसार कीडनाशक फवारणीही केली जाते. दोन महिन्यांत तीन फवारण्या झाल्या तर किडी- रोगांचा प्रादुर्भाव फारसा जाणवत नाही. ऑगस्ट २००८ च्या सुमारास राज्यात व लातूर जिल्ह्यात तंबाखूवरील अळीचा (स्पोडोप्टेरा अळीचा) मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने लाखो हेक्‍टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले; मात्र श्रीराम व संतोषने वीस एकरमधली एक शेंगही पोखरली जाणार नाही अशी दक्षता घेतली, त्या वर्षी काही कीटकनाशके फवारावी लागली तरी ते डगमगले नाहीत.

क्षीरसागर बंधूंचे वैशिष्ट्य म्हणजे शेतीतल्या प्रत्येक कामाची नोंद ते तारीखनिहाय आपल्या मोबाईलमध्ये करतात. पिकाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेची म्हणजे पेरणी, फवारणी, खते देणे यांची छायाचित्रे काढली जातात. सोयाबीनची तीन वेळा कोळपणी केली जाते. एखाद्या वेळी स्प्रिंक्‍लरने पाणी देऊन पीक जगविले जाते. मागील हंगामात २८ जुलैला पेरणी झाली तरी एकरी चौदा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले. सोयाबीन उशिरा म्हणजे नोव्हेंबरला निघाले.

सोयाबीनचे उत्पादन १४ क्विंटल, २५०० रुपये दराने ३५००० रुपये, हरभरा १२ क्विंटल उत्पादन, तर ३००० रुपये दराने ३६००० असे एकूण एकाहत्तर हजारांचे उत्पन्न त्यांना मिळाले. खर्च सोयाबीनसाठी बियाणे, कीडनाशके, नांगरणी, पेरणी, पाणी, मजुरी व अन्य धरून नऊ हजार, तर हरभऱ्यासाठी सात हजार असा एकरी सोळा हजार आला, तो वजा जाता पंचावन्न हजारांचे उत्पन्न त्यांना मिळाले. पाच एकर क्षेत्रात बीजोत्पादन घेतल्याने वाढीव दर मिळाला तो वेगळा, अन्य क्षेत्रात एकरी ३० हजारांचे उत्पन्न निघाले.

श्रीराम चार चांगल्या देवणी गाईंची तसेच बैलांची देखभाल अत्यंत चोख ठेवतो. प्रत्येक गाय वर्षात एक गोऱ्हा किंवा कालवड देते. पेंड, खुराक, हिरवा चारा, पाणी त्यांना वेळच्या वेळी दिले जाते. सरासरी ३० हजारांस एक याप्रमाणे वासरांची विक्री होते. वर्षाला ऐंशी हजार उत्पन्न त्यातून मिळते.

दोघा भावांपैकी एक जणही शेतात नाही असे फार क्वचित होते. प्रत्येक गोष्ट समजून उमजून करण्यावर त्यांचा भर आहे. कोरडवाहू शेतीतून आज दहा लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या क्षीरसागर बंधूंचे उत्तम घर आहे, त्यांची मुले पुण्यात इंग्रजी शाळेत शिकतात.

त्यांनी मागील दहा वर्षे ऊस शेती केली, त्यातले एक वर्ष सोडले तर उर्वरित वर्षांसाठी सावकाराचे कर्ज काढून शेती करावी लागली. उसानंतर सोयाबीन, हरभरा असे रोटेशन केले. गेली पाच वर्षे ते याच पद्धतीने उत्पादन घेतात, आता एकदाही सावकाराकडे जायची वेळ आलेली नाही.

हरभऱ्याचे व्यवस्थापन
पाण्याची एक पाळी देऊन ओल असताना दिग्विजय हरभरा सोळा इंचाच्या तिफणीने एकरी ३० किलो पेरला. पाच एकर क्षेत्रावर बियाणे प्लॉट घेतला, त्यालाही दर वीस दिवसाला फवारणी केल्या. दोन पाणी देणे शक्‍य झाले. फुले व दाणे भरण्याच्या अवस्थेत मात्र पाणी कमी पडले नसते तर उत्पादनात एकरी तीन क्विंटल वाढ झाली असती असे क्षीरसागर बंधू खेदाने म्हणतात. त्यांचे मामा शिवचरण पाटील यांनी पाण्याच्या उपलब्धतेमुळे हरभऱ्याचे एकरी १४ क्विंटल उत्पादन काढले आहे, त्यामुळे चालू वर्षी कृषी खात्याकडून क्षीरसागर बंधूंनी ३० बाय २० व तीन मीटर खोलीचे शेततळे उभारले आहे, कारण हलक्‍या रानात एखादे-दुसरे पाणी दिल्याखेरीज उत्पादन चांगले मिळत नाही. त्यांच्याकडील बोअरला जेमतेम पाणी आहे. म्हणून एकरी बारा क्विंटल हरभरा निघाला.

-रमेश चिल्ले (लेखक लातूर जिल्हा कृषी विभागांतर्गत कृषी पर्यवेक्षक आहेत.)

संपर्क - श्रीराम किशन क्षीरसागर : ९८२२००७०३६, संतोष क्षीरसागर - ९७६७३५२१७१

कोरडवाहू शेतीचे तंत्र गवसलेले क्षीरसागर बंधूSocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment