स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Sunday, January 31, 2010

धान्यापासून दारू विरोधी अभियान

जनतेचे आझाद मैदान येथे धरणे- सत्याग्रहानंतर सचिवांची भेट
हुतात्मा‍ दिन, ३० जानेवारी २०१०.

राज्यात धान्याचा तुटवडा असताना आणि महागाईचा डोंब उसळलेला असताना महाराष्ट्र शासनाने धान्यापासून दारू बनविण्याचा घाट घातलेला आहे. राज्यभरात आतापर्यंत ३६ कारखान्याना मद्यार्क बनविण्याची परवानगी मिळालेली आहे, आता या कारखान्यांची परवानगी रद्द होऊ शकत नाही कारण यात कारखानदारांनी करोडो रुपायांची गुंतवणूक केलेली आहे, असे विधान मागील आठवड्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. आता प्रश्न हा पडतो की सरकार कोणाचे- सामान्य जनातेचे की मुठभर कारखानदारांचे? या कारखान्यांसाठी वर्षाकाठी वापरण्यात येणार्याक १४ लाख टन धान्याचे काय? यामधून निर्माण होणा-या महागाईचे काय? खरंच आपल्याकडे कुजकं धान्य एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे का?



शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी आज राज्यभरातील २८ संघटनांनी ‘धान्यापासून दारू विरोधी अभियाना’ अंतर्गत एकत्र येऊन ‘हुतात्मात दिनी’ म्ह्णजे महात्मा गांधीच्या पुण्यतिथी दिवशी मुंबईतील आझाद मैदानात धरणे धरली. या धरणे कार्यक्रमात रेशनिंग कृती समिती, स्त्री मुक्ती संघटना, निर्माण, महिला मंडळ फेडरेशन, महाराष्ट्र महिला परिषद, कोरो साक्षरता समिती, विकास सहयोग प्रतिष्ठान, लोकसत्ता पार्टी, महिला राजसत्ता आंदोलन, महिला महापंचायत, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, कचरा वाहतूक कर्मचारी संघ, संघर्ष-खारघर, मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस, महाराष्ट्र युवा परिषद, अन्न अधिकार अभियान, इंडिया सेंटर फॉर ह्युमन राईट्स अँन लॉ, जाणता राजा, महिला मुक्ती मंच, प्रगती अभियान, प्रागतिक विद्यार्थी संघ, शोषित जन आंदोलन, बिल्ड, आशाकिरण, अशांकुर, अपनालय, तृप्ती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या सर्व संघटनांचे मिळून चारशे महिला पुरुष सहभागी झाले होते. 

या धान्यापासून दारू विरोधी अभियानाचा एक भाग म्हणून या सर्व संघटनांनी मिळून दि. ११ जानेवारी, २०१० रोजी धान्यापासून दारू विरोधी परिषद घेतली होती. या परिषदेत सर्वानुमते महाराष्ट्र शासनाने सर्व धान्यापासून मद्यार्क बनविणारे सर्व ३६ कारखाने बंद करावेत, महाराष्ट्राच्या दारूनीतीचे पुनर्विलोकन करावे व ते दारूबंदीच्या दिशेने जाणारे असावे आणि कोरडवाहू शेतकर्यांनना भाव मिळण्यासाठी हेच धान्य शासनाने खरेदी करून रेशन दुकानावर उपलब्ध करून द्यावे, या तीन मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या. परंतु या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी जनसामान्य आज आझाद मैदानावर एकत्रित आले होते. तसेच आज महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात त्या त्या जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरण्यात आली होती.

सुरवातीस महिलांनी दारूविरोधी गाणी म्हणून जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर उपस्थित संघटनांच्या कार्यकत्यांनी दारू विरोधी परिषदेत हाती घेण्यात आलेल्या कृती कार्यक्रमांचा आढावा घेतला. या कालावधीत महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमा, पोस्टकार्ड मोहिमा घेण्यात आल्या. तसेच २६ जानेवारी रोजी गावागावातून या धोरणाविरोधी ग्रामसभांचे ठराव पास करून घेणे, आमदारांना भेटून या धोरणाच्या विरोधातील निवेदन देणे आदि कृती कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. धरण्याेदरम्यान भीम रासकर, उल्का महाजन, गोरख आव्हाड आदि अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे विचार मांडले. 

चार तास धरणे धरूनही शासनाने याची काहीही दखल घेतली नाही. मंत्रालयातील कुणीच तुमची भेट घेण्यास व निवेदन स्वीकारण्यास तयार नाही असे पोलीस यंत्रणेमार्फत सांगण्यात आले. तेव्हा मात्र कार्यकर्त्यांनी निवेदन न स्वीकारल्यास हे आंदोलन मंत्रालयापर्यंत नेण्याचा इशारा दिला. कार्यकर्त्यां चा सत्याकग्रहाचा पवित्रा दिसताच पोलिसांनी आझाद मैदानाची नाकेबंदी केली. 

त्यानंतर आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेण्यासाठी दोन-दोनच्या रांगांमध्ये अहिंसात्मक मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलीसांनी मैदानाच्या गेटवरच रोखून धरले. कार्यकर्त्यांना घेराव घातला. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तुमच्यापैकी फक्त एकालाच मंत्रालयात निवेदन सादर करण्यासाठी जाता येईल असे सांगितले. याउपर आमचे आंदोलन २८ संघटनांचे आहे त्यामुळे आमचे पाच प्रतिनिधींचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाईल, अन्यथा आम्ही असाच सत्याग्रह चालू ठेवू, असे सुरेश सावंत यांनी पोलिसांना सांगितले. 

अर्ध्या तासानंतर गृह विभागाचे प्रधान सचिव श्री. संगीतराव यांनी धान्यापासून दारू विरोधी अभियानाचे निवेदन स्वीकारण्याची तयारी दाखवली. अभियानाच्या पाच प्रतिनिधींचे शिष्टमंडळ श्री. संगीतरावांना भेटले व त्यांना तेवीस हजार सह्यांचे निवेदन दिले. 

यानंतर देखिल जोपर्य़ंत शासन ३६ कारखाने बंद करत नाही तोपर्यंत आम्ही आमचे अभियान असेच चालू ठेवू आणि दिवसेंदिवस ते अधिक तीव्र करू असा इशारा या संघटनांनी दिला. या अभियानाच्या पुढील टप्प्याचे नियोजन करण्यासाठी सर्व संघटनांची बैठक पुढील आठवड्यात मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
आपली,
धान्‍यापासून दारुविरोधी अभियान संयोजन समिती
रेशनिंग कृती समिती, स्त्री मुक्ती संघटना, निर्माण, महिला मंडळ फेडरेशन, महाराष्ट्र महिला परिषद, कोरो साक्षरता समिती, विकास सहयोग प्रतिष्ठान, लोकसत्ता पार्टी, महिला राजसत्ता आंदोलन, महिला महापंचायत, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, कचरा वाहतूक कर्मचारी संघ, संघर्ष-खारघर, मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस, महाराष्ट्र युवा परिषद, अन्न अधिकार अभियान, इंडिया सेंटर फॉर ह्युमन राईट्स अँन लॉ, जाणता राजा, महिला मुक्ती मंच, प्रगती अभियान, प्रागतिक विद्यार्थी संघ, शोषित जन आंदोलन, बिल्ड, आशाकिरण, अशांकुर, अपनालय, तृप्ती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन
संपर्क: गोरखनाथ आव्‍हाड - +91 98692 59206

धान्यापासून दारू विरोधी अभियानSocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment