स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.
Showing posts with label अर्थ. Show all posts
Showing posts with label अर्थ. Show all posts

Monday, May 17, 2010

‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान!

-नितीन पोतदार

कॉर्पोरेट लॉयर - संपर्क : ९९३०९५४७४७


‘डेलिगेशन’ म्हणजे आपण आपलं काम सोडणं नव्हे! तर आपण करीत असलेल्या कामासाठी निर्माण केलेली ‘सपोर्ट सिस्टिम’ असं मी १९ एप्रिलच्या लेखात म्हटलं होतं. पण डेलिगेशनसाठी चांगली माणसं आणायची कुठून? आणि ती टिकवायची कशी? आज तरुणांकडे डिगऱ्या आहेत तर ज्ञान नाही, ज्ञान आहे तर अनुभव नाही. अनुभव असेल तर पगाराची अपेक्षा जास्त. जास्त पैसे देऊनसुद्धा कर्मचारी राहतील का याची खात्री नाही. अस्थिर वातावरण. आज कुठल्याही कामासाठी नेमकी माणसं मिळणं आणि ते टिकवणं हे मोठं आव्हान होऊन बसलेलं आहे.
ह्युमन रिसोर्सचा रिक्रुटमेंट ते रिमूव्हल हा प्रत्येक टप्पा एक वेगळा विषय आहे आणि आपल्याला वाटतो तितका सोपा नाही, जसं मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग आणि फायनान्सच आपलं एक शास्त्र आहे तसंच ह्युमन रिसोर्सचसुद्धा शास्त्र आहे कदाचित जास्त कठीण आहे, म्हणून ते शास्त्रोक्त पद्धतीनेच व्हायला हवा. छोटय़ा असो किंवा मोठय़ा कुठल्याही उद्योगांनी ह्युमन रिसोर्सकडे आज काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे, असं मला वाटतं. एक चांगला हुशार कर्मचारी उद्योगाचे सोनं करू शकतो! म्हणून पहिला प्रश्न असा आहे की, आपण आपल्या उद्योगात पात्रतेनुसार माणसं घेतो का? त्यांना कामासाठी लागणारं प्रशिक्षण देतो का? त्यांच्या कामाची वस्तुनिष्ठ समीक्षा करतो का? गुणवत्तेनुसार वेळीच प्रमोशन देतो का? आणि जर ती योग्य नसतील तर त्यांना आपण योग्य कारणे देऊन वेळोवेळी काढतो का? त्याचबरोबर सीनियर किंवा कोअर मॅनेजमेंटमध्ये काम करणारे आणि रोजचे रुटीन काम करणाऱ्यांमध्ये नक्कीच फरक करणं गरजेचं आहे, कारण सीनियर मॅनेजमेंटकडून मालकांच्या मुळात अपेक्षा संपूर्णपणे वेगळ्या असतात, तो एक स्वतंत्र विषय आहे.



ह्युमन रिसोर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे रिक्रुटमेंट-माणसे नियुक्त करतानाच अनेक कसोटय़ांवर पारखून जर रिक्रुटमेंट केली तर, त्या माणसाला र्रिटेन्चमेंट करावे लागणार नाही की रिमूव्हलची वेळ येणार नाही. पण प्रश्न असा आहे की, आपल्याला प्रथम या विषयाच किती सखोल ज्ञान आहे? एखाद्या उमेदवारीची निवड करण्याची एक प्रक्रिया आहे. उद्योगाला लागणारी साधी झेरॉक्स मशीनसुद्धा आपण दहा वेळा तपासून, त्याचा भाव काढून, त्याची गॅरंटी बघून मगच घेतो, पण एखादा कर्मचारी ठेवताना आपण किती तपशिलात जातो? ऑफिसमधल्या साध्या एअरकंडिशनला वर्षांतून तीन वेळा आपण सव्‍‌र्हिस करतो, पण कर्मचाऱ्यांना किती वेळा प्रशिक्षणासाठी पाठवितो?
वरील विषयाच्या खोलात जाण्याआधी ‘योग्य’ कर्मचारी म्हणजे कोण? हे समजून घेणं गरजेचं आहे. वेळेवर कामावर येणारा, निव्र्यसनी, कामात थोडा डावा असला तरी फुटकळ सबब सांगून रजा न मागणारा, दिलेल्या पगारात समाधानी असणारा, ओव्हरटाईम न मागणारा, एकूणच काय तर निमूटपणे, पडेल ते काम, मिळेल त्या मोबदल्यात करीत आयुष्यभर नोकरी करणारा कर्मचारी! म्हणजे आपल्याला कामात थोडा डावा असला तरी वरील चौकटीत काम करणारा कर्मचारी ‘योग्य’, ‘हुशार’ ‘कष्टाळू’ आणि खूपच चांगला असा आपण समजतो, आपण इथच काहीसं चुकतो, असं मला वाटतं. वेळेवर येणे, रजा न घेणे, निव्र्यसनी असणं हे चांगल्या ‘वर्तनाचं’ लक्षणं आहे, चांगल्या ‘कामाचं’ नव्हे! एखादा ड्रायव्हर अगदी वेळेवर येत असेल, निव्र्यसनी असेल पण जर त्याला नीट ड्रायव्हिंग करता येत नसेल तर तो अगदी वेळेवर येऊन काय उपयोग? त्याच्याकडून अपघातच होण्याची शक्यता जास्त असणार. आपल्याला गाडी चांगली चालविणारा ड्रायव्हर पाहिजे की घडय़ाळाच्या काटय़ावर येणारा शिपाई? हे आधी आपण ठरवलं पाहिजे! सांगायचं तात्पर्य की, ज्या कामासाठी आपण माणसं निवडतो ते काम करण्याची त्याच्याजवळ पात्रता आहे का? हे महत्त्वाचं आहे. मी इथं अस मुळीच म्हणणार नाही की कर्मचाऱ्यांचं वर्तन महत्त्वाचं नाही, तेसुद्धा तितकचं महत्त्वाचं आहे, तेसुद्धा पडताळून पाहायलाच पाहिजे, पण आधी त्याची कामात लागणारी पात्रता आणि अनुभव तपासल्यानंतर! कित्येक वेळा लांबलचक अर्ज बघून आपण माणसं नेमतो आणि नंतर त्याची अर्धी कामं आपणच करीत असतो; अशा चुकीच्या नेमणुकीमुळे उद्देगाचं दररोज नुकसान होत असतं हे आपण लक्षात घेत नाही. आपल्या उद्देशात अशा कित्येक कर्मचाऱ्यांकडून आपल्याला हवं ते काम करून मिळत नाही. त्यांना वर्षोनवर्षे आपण नुसतंच कामावर ठेवतो, पगार देतो, याचा संपूर्ण दोष आपला आहे कारण आपण त्यांना घेते वेळीच चूक केलेली असते. मग आपण रोज त्यांच्या नावाने त्यांच्या मागे खडे फोडत असतो. कामासाठी लागणारी पात्रताच जर एखाद्या उमेदवाराकडे नसेल तर तो कितीही स्वभावाने प्रेमळ व गोड बोलणारा असला तरी त्याचा उपयोग उद्योगाला होणार नाही हे लक्षात घ्या.
कित्येक वेळा आपण पैसे वाचविण्यासाठी, माणसचं नेमत नाही. पगार जास्त द्यावा लागेल म्हणून कमी शिकलेली, अनुभव नसलेली माणसं निवडतो, त्यांना योग्य प्रशिक्षण देत नाही. मग तोच कर्मचारी चांगलं काम करू शकत नाही म्हणून पगारवाढ नाही, प्रमोशन नाही आणि याचा परिणाम निकृष्ट दर्जा! उद्योगाचं न दिसणारं मोठं आणि कायमचं नुकसान!! म्हणून सर्वप्रथम निवड प्रक्रियेत कुठल्याही परिस्थितीत ‘पात्रता’ हाच निकष असायला हवा! नातेवाईक, मित्र, कुणाची चिठ्ठी असले प्रकार संपूर्णपणे बंद केल्याशिवाय चांगली टीम उभीच राहणार नाही हे लक्षात घ्या. अगदी नाईजास्तव कुणाला घ्यायची पाळी आलीच तर त्यांना प्रोबेशनवर (अप्रेण्टिस) ठेवा आणि त्यांना योग्य प्रशिक्षणासाठी पाठवा, हवा तर त्यांचा खर्चदेखील करा, प्रोबेशन पूर्ण केल्यावर त्याच्या पात्रतेनुसार नोकरीत कायम करा. पण त्याने पात्रता मिळवली नसेल तर अशा माणसांना काढायला वेळ लावू नका. हीच सगळ्यात मोठी कसोटी असते. इथं जर निर्णय घेण्यात चूक झाली तर ती कधीच भरून निघणार नाही.
लहान उद्योगांना मोठय़ा पगाराचे कर्मचारी घेताना पैशाचा मुख्य प्रश्न असतो, तरी चांगले कर्मचारी प्रत्येकालाच हवेत. अशा वेळी मला वाटतं, शिकाऊ मुलं ज्यांना आपण अप्रेंटिस म्हणून घेऊन त्यांच्या प्रशिक्षणावर खर्च करणं केव्हाही चांगलं. शिकाऊ मुलांना स्वत:ला निर्विवादपणे सिद्ध करायचं असतं म्हणून ते शिकताना आणि काम करताना एका जोमाने काम करतात. त्यांना आयुष्यात उभं केल्यामुळे त्यांची निष्ठा हमखास तुमच्या उद्योगाशी जास्त असणार आणि मुलं येतील, शिकतील आणि जातीलसुद्धा हा एक प्रवास आहे असं समजायला पाहिजे. अशा वेळी उद्योजकांनी चांगल्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन उद्योगाची भविष्यातील वाटचाल आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग काय असेल हे नीट समजावून सांगणं गरजेचं आहे.
चांगल्या कर्मचाऱ्याला वेळोवेळी योग्य प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रमोशन मिळायलाच पाहिजे. प्रशिक्षणासाठी आपण आपल्या कर्मचाऱ्यांवर किती खर्च करतो? कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण म्हणजे ‘खर्च’ हेच मला मुळी मान्य नाही. ही एक प्रकारची आपल्या उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे असं आपण का समजत नाही? आपण नवीन टेलिफोन सिस्टीम्स घेतो, पण टेलिफोन ऑपरेटरला ते वापरण्यासाठी लागणारं साधं दोन-तीन दिवसांचं प्रशिक्षण देत नाही? नवनवीन कॉम्प्युटर्स घेतो पण कर्मचाऱ्यांना सातत्याने त्याचं प्रशिक्षण देत नाही? तसंच मार्केटिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगबद्दलपण बोलता येईल. आणि समजा, प्रशिक्षण घेतल्यानंतर एखादा कर्मचारी टिकला नाही म्हणून काय बिघडलं? आपण एखादी मशीन विकत घेतो, ती बिघडते, आपण तिला दुरुस्त करतो, ती परत बिघडते, आपण कंटाळा येऊन ती टाकून देतो. आपण ती केलेली इन्व्हेस्टमेंट राईट ऑफ करतो. तशीच मानसिकता आपण ह्युमन रिसोर्सबद्दल का बाळगत नाही? अशा वेळी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यापेक्षा त्यांना वेगवेगळी कामे देऊन बघायला काय हरकत आहे? मी मुद्दाम टेलिफोन ऑपरेटर्स, ड्रायव्हर, शिपाई अशा छोटय़ा कामांना लागणाऱ्या लोकांची उदाहरणं दिली, कारण उद्योगात कुठल्याच थरात चुकीची माणसं घेऊन चालणार नाही. खास करून ज्यांचा संबंध रोज इतरांशी येणार आहे ती माणसं चांगलीच घ्यावी लागणार, कारण अशी माणसं तुमच्या उद्योगाचे एक प्रकारचे राजदूत आहेत.
शक्यतो प्रत्येक कामाचे नियम, उद्योगाचे मूळ उद्दिष्ट, एखादं ब्रीदवाक्य हे लेखी स्वरूपात असलेलं केव्हाही चांगलं; म्हणजे कर्मचाऱ्यांना रोज सांगण्याची पाळी येत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचं स्वरूप नीटपणे समजावून देणं गरजेचं आहे, शक्य झाल्यास लेखी स्वरूपात असावं. त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट करून सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेळोवेळी प्रत्येकाच्या कामाची समीक्षा होणं जरुरी आहे. अशी समीक्षा ही वस्तुनिष्ठपणे मोकळ्या वातावरणात आणि चांगल्या मनाने करणं फारच महत्त्वाचं आहे. प्रमोशन, पगारवाढ किंवा बोनस हा कर्मचाऱ्यांचा पूर्ण मान ठेवूनच दिला गेला पाहिजे. कर्मचाऱ्याला हवे असते त्याच्या कामाचे अ‍ॅप्रिसिएशन अर्थात केलेल्या चांगल्या कामाची पावती आणि पाठीवर प्रशंसेची थाप! निदान त्याबाबत तरी कसर नको. भरपूर आर्थिक मोबदला देऊन सतत अपमान केला तरीही असंतोष राहणार. तसेच फक्त प्रशंसा केली पण पैशाच्याबाबतीत कंजुषी तर तेही योग्य नाही. दोन्हींचा समतोल साधला गेला पाहिजे. पैशासाठी कर्मचारी जीव तोडून काम करतील आणि त्याचबरोबर ‘आत्मसन्मान’ दिला तर तो उद्योगासाठी जीवसुद्धा देईल! कामासंबंधीच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना सहभागी करणं चांगलं आणि त्यांना त्यांचे विचार मांडण्याची मुभा देणं हे जास्त चांगलं. अशा प्रक्रियेत अंतिम निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांना तो नव्याने समजावण्याची गरज भासत नाही आणि प्रत्येकजण तो निर्णय अमलात आणण्यासाठी झटून काम करतो. अशा प्रक्रियेतूनच उद्योगासाठी लागणारे उद्याचे नेतृत्व निर्माण होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शक्य असल्यास समीक्षा करण्याचं काम हे बाहेरच्या एखाद्या ह्युमन रिसोर्स एजन्सीला देणं उचित ठरतं. लहान उद्योगांनी ह्युमन रिसोर्ससाठी अर्धवेळ किंवा एखादा चांगला बाहेरचा कन्सल्टन्ट घेऊन काम करणं केव्हाही चांगलं, त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कुठलाही निर्णय हा स्वतंत्र वाटेल आणि जास्त वस्तुनिष्ठ असेल आणि मुख्य म्हणजे घेतलेला निर्णय कटू वाटणार नाही.
कुठल्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढताना किंवा काही कारणास्तव तो काम सोडून जाताना त्याच्याशी भांडण करण्याची चूक कुठल्याच उद्योजकांनी करू नये, तो कितीही चुकला तरी! कारण उद्या तो तुमच्या उद्योगाविषयी, तुमच्या उत्पादनाविषयी जगात तुमची नाहक बदनामी करीत फिरत राहील. कर्मचाऱ्याला कामावर घेणं जितकं कठीण आहे त्यापेक्षा त्याला कामावरून कमी करणं कठीण आहे. कर्मचाऱ्याचं कौतुक हे जगासमोर झालं पाहिजे, पण त्याची कानउघाडणी मात्र चार भिंतींच्या आतच झाली पाहिजे हा मूळ मंत्र. लोकांसमोर केलेली टीका ही केव्हाही अपमानास्पद असते. कित्येक उद्योजक नेमकं याच्या उलट वागतात. चारचौघात छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून कर्मचाऱ्यावर अनाठायी टीका करून त्याच्यावर घोर अन्याय केला जातो. आपण केलेल्या टीकेतून आपला कर्मचारी काहीतरी शिकणार आहे का? त्यात सुधारणा होणार आहे का? हे महत्त्वाचं आहे. टीकेचा अतिरेक होता कामा नये, त्याचप्रमाणे कुठलीही टीका करण्याआधी प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वत:ची बाजू मोकळेप्रमाणे मांडण्याचा अधिकार हा दिलाच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा विषय प्रतिष्ठेचा करू नये, कर्मचाऱ्याचा अहंकार न दुखावता त्याला सन्मानाने सांभाळून घेता आलं पाहिजे. कारण कर्मचाऱ्याने चूक सुधारली तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा आपल्या उद्योगाचा आहे हे विसरून चालणार नाही.
मोठमोठय़ा कंपन्यांच्या प्रगतीचा चढता आलेख हा त्यांच्या उंच इमारतींमुळे नसतो, तर तिथं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या उंच कर्तृत्वामुळे असतो, हे ज्या उद्योजकाला कळलं त्याने जग जिंकलं!!

-नितीन पोतदार - सोमवार, १७ मे २०१०
कॉर्पोरेट लॉयर - संपर्क : ९९३०९५४७४७


पुढे वाचा >>>
‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान!SocialTwist Tell-a-Friend

Monday, November 23, 2009

नोकरी आणि मराठी समाज...

साभार- श्री. नितिन पोतदार (http://nitinpotdar.blogspot.com)

एक असा समाज की त्यात प्रत्येकाला पावलागणिक आणखी एक पाऊल पुढे टाकायची जिद्द आहे; ज्याला प्रत्येक आव्हानात एक संधी दिसते, उणिवांना जो आपली ताकद बनवतो तो समाज; जे येतील त्यांना बरोबर घेऊन व जे येणार नाहीत त्यांनासुद्धा बरोबर घेऊन जाऊ, अशी मानसिकता असलेला समाज; व्यवहार आणि भावनांची गल्लत न होऊ देणारा समाज; आणि सतत नोकरी मागण्यापेक्षा, नोकरी देणारे हात तयार करणारा समाज, असे प्रतिपादन प्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी त्यांची ‘प्रोग्रेसिव्ह मराठी समाज’ची संकल्पना विषद करताना केली.

दिवाळीनिमित्त ‘दीपावली पहाट’ अशा नावाने सांस्कृतिक गाण्यांच्या कार्यक्रमाची रेलचेल असते. ‘त्रिमिती’ संस्थेने मात्र ‘स्वप्न बघा स्वप्न जगा’ हा वैचारिक खाद्य देणारा कार्यक्रम अलीकडेच घडवून आणला. त्यातही विचार- चर्चा साहित्यिक- कलाविषयक प्रश्नांवर नव्हे तर समाजोपयोगी मुद्दय़ांवर घडवून आपले वेगळेपण अधोरेखित केले. मराठी समाज मागे का, उद्योगात का नाही ही चर्चा आपल्या समाजात सतत होत असते, त्यावर सकारात्मक चर्चा घडवणारा हा कार्यक्रम. यात दोन भिन्न क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे जाण्याची प्रेरणा दिलीच, त्याबरोबर त्यासाठी मार्गदर्शन केले व विचारांचे स्फुलिंग जागवले।
कार्यक्रमाच्या प्रथमार्धात सांस्कृतिक क्षेत्रातील लोभस व्यक्तिमत्त्व, कवीवर्य प्रश्न. प्रवीण दवणे यांचे भाषण झाले. ते म्हणाले हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तर मनोअंजनाचा आहे, स्वप्नाळूपणा वेगळा व स्वप्न बघणे वेगळे. उद्याचे सत्य हे आजचे स्वप्न म्हणून कालचे स्वप्न हे आजचे सत्य. अर्थ आहे, अशी स्वप्न बघा, ते काय आहे त्यावर तुमचे उद्याचे सत्य काय ते ठरणार. आयुष्यात कुठे जायचे आहे ठरवा. हस्तरेषा बघू नका तर त्या हातामागचे मनगट बघा. महान व्यक्तीकडून आदर्श घ्या, प्रेरणा घ्या पण त्यांची नक्कल होऊ नका. कामाला लागल्यावर अडथळे येणार, प्रतिकूलता ही अनुकूलता बनवा. त्यांनी फार महत्त्वाचा सल्ला दिला, यशात गुंतून पडू नका. आंबेडकर १८-१८, २१-२१ तास काम करीत सांगून ते म्हणाले, मेहनत नसेल तर आव्हानांची भीती वाटते. अडचणी, अपमान, अपयश हे सर्व आयुष्याचा भाग आहे त्यामुळे खचून न जाता पुढे प्रयत्न करीत राहा.

यानंतर प्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी त्यांची ‘प्रश्नेग्रेसिव्ह मराठी समाज’ची संकल्पना चक्क मराठीत पॉवर पॉईंटसह सादर केली. कळेल ती भाषा मिळेल ते काम, पडेल ते कष्ट, तेव्हाच होईल ‘जय महाराष्ट्र!’ हे प्रत्येक मराठी तरुणाचे ब्रीद असायला हवे हे त्यांनी ठासून सांगितले. मराठी समाज मागे आहे म्हणजे नेमके काय, असा प्रश्न विचारून ते म्हणाले, आपल्या समाजात तरुणांना चांगले शिक्षण घेता येत नाही म्हणून नोकरी मिळत नाही म्हणुन त्यांची आर्थिक स्थिती हवी तितकी चांगली नसते, पर्यायाने त्यांना चांगले घर घेता येत नाही, आपल्याच राज्यात आपण बेघर होत चाललो आहोत! काहींना व्यवसाय करायचा आहे पण भांडवल नाही, इतर समाज आपल्याला ‘डाऊन मार्केट’ समजतो इत्यादी. म्हणजे या सर्व अवस्थांमागे प्रश्नमुख्याने एकच कारण आहे की, आपली आर्थिक स्थिती चांगली नाही. तर दुसरीकडे आपल्या मराठी समाजातले काही लोकप्रिय (!) गैरसमज त्यांनी निदर्शनास आणले ते असे; पैसा म्हणजे ‘भ्रष्टाचार’, ‘अनैतिकता’, ‘अधोगती’, ‘शंभर व्यसनं’ आणि पैसा हा गैरमार्गानेच कमवता येतो! या अशा वैचारिक संभ्रमात आपला समाज नेहमीच सापडलेला दिसतो.

पोतदार पुढे म्हणाले, आपण सगळ्या गोष्टींवर चर्चा करतो, संमेलन भरवतो, मोठमोठय़ा सभा गाजवतो. पण आपला समाज आर्थिकदृष्टय़ा सक्षम कसा करता येईल याचा साधा विचारसुद्धा करत नाही ही आपल्या समाजाची मोठी शोकांतिका आहे! तसेच मराठी माणसावरील टीकेचे स्वरूप काय असते त्याचा त्यांनी गोषवारा दिला. मराठी माणूस चाकरमानी आहे, नव्हे त्याची प्रवृत्तीच चाकरमानीपणाची आहे, उद्योग उभारण्याची त्याची इच्छा नसते! ही टीका कोण करतो असा प्रश्न विचारून या चुकीच्या व अन्यायकारक टीकेवरच त्यांनी टीका केली. ते म्हणाले, खरं तर आपणच आपल्या मराठी बांधवाना आळशी, संकुचित वृत्ती असलेला मराठीपणाविषयी आणि भाषेविषयी न्यूनगंड असलेला म्हणून हेटाळणी करत आहोत. ही टीका प्रश्नमुख्याने पुण्या-मुंबईच्या मराठी समाजाला नजरेसमोर ठेवून केलेली असते. त्यातही कुठलेही सर्वेक्षण न करता ही टीका केली जाते! याबाबत सविस्तर ऊहापोह त्यांनी केला व सप्रमाण दाखवून दिले की ही टीका का चुकीची आहे. आपल्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर देशात, परदेशात चमकत असलेल्या अनेक मराठी व्यक्तींची एक मोठी यादीच त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटासह सादर केली.
तरुणांनी सुरुवात कोठून करायची याबाबत त्यांनी सांगितले. स्वत:चा शोध घेणे गरजेचे आहे- आत्मपरीक्षण करता आले पाहिजे, चूक तर चूक पण निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजे आत्मघातकी निर्णय नव्हे व स्पर्धा ही स्वत:शीच असली पाहिजे. त्यासाठी त्यांनी तरुणांना त्रिसूत्री दिली. ‘कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट, तेव्हाच होईल ‘जय महाराष्ट्र!’ मराठी समाज मागे का हा प्रश्न आला की एक अभिनिवेश येऊन तावातावाने चर्चा होते, त्याऐवजी थंड डोक्याने चर्चा झाली पाहिजे, असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुहास कदम यांनी सर्वाचे स्वागत केले. संपदा जोगळेकर यांनी खुसखुशीत सूत्रसंचालन केले. ‘त्रिमिती’चे उल्हास कोटकर, रमाकांत पन्हाळे, विनय सराफ यांच्या प्रयत्नांतून व कल्पकतेतून हा कार्यक्रम आकाराला आला. ऐन दिवाळीत कार्यक्रम असून व १०० रुपये तिकीट असूनही या कार्यक्रमाला मात्र ‘हाऊसफुल्ल’ गर्दी होती व ते वक्त्यांच्या भाषणांना भरभरून दाद देत होते।


पुढे वाचा >>>
नोकरी आणि मराठी समाज...SocialTwist Tell-a-Friend

Tuesday, November 17, 2009

मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा!

साभार- श्री. नितिन पोतदार (काँर्पोरेट लाँयर)

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि लोकांनी हुश्श केलं! कोणत्या का होईना, मुख्य पक्षांच्या एका आघाडीला अपक्षांच्या कुबडय़ा न घेता पूर्ण बहुमत मिळालं याचं समाधान आहे. जनतेच्या रोजच्या जीवनाला भेडसावणारे अगणित प्रश्न असताना या निवडणुकीत काही पक्ष फक्त स्वत:चं अस्तित्व तयार करताना दिसले, तर कुणी कुठल्याही प्रश्नावर, कसलाही विचार न करता, तर्कशून्य भूमिका मांडत होते. गरज नसताना टोकाची भूमिका घेत होते. रोजच्या जीवनाशी निगडित समस्यांवर कुणीही पोटतिडकीने भूमिका मांडताना दिसलंच नाही. नेहमीप्रमाणे सामान्यांना गृहीत धरलं गेलं! निवडणुकीदरम्यान काही राजकीय नेत्यांनी वृत्तपत्र आणि खासगी वाहिन्यांशी अर्थपूर्ण स्पेशल कव्हरेज, प्रोफाइलिंग, पेड बातम्या देऊन मतदारांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली, याच्या सुरस कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं चक्र सुरू आहे. गेल्या ५० वर्षाच्या राजकारणाने अध:पतनाचा नीचांक गाठलेला आहे की ही त्याची नुसती सुरुवात आहे? अशा नेत्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीची आपण कसली अपेक्षा करणार? राजकीय नेत्यांना आपण अवास्तव महत्त्व देतो का? तेच आपले तारणकर्ता आहेत असे आपण का समजतो? निवडणुका होत राहतील, राजकीय समीकरणं बदलतील, मंत्री बदलतील पण महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा विकास व्हावा यासाठी आता विविध स्तरातील सामान्यांतून कल्पक विचार आणि सामाजिक नेतृत्व पुढे आलं पाहिजे, हे मांडण्यासाठी हा लेखप्रपंच.


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजयाचे एक कारण आहे, मराठीचा मुद्दा घेऊन शिवसेना व मनसे हे दोन मराठीवादी राजकीय पक्ष एकमेकांविरुद्ध लढले व मतांची फाटाफूट झाली. एकमेकांविरुद्ध त्यांनी केलेली टीका ही कुठल्याही मराठी माणसासाठी फारशी आनंदाची गोष्ट नक्कीच नव्हती. निदान मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील त्यांच्या पाठीराख्यांच्या मनात कुठेतरी अजूनही अस्वस्थता जाणवत असेल! खरे तर मराठी समाज मोठा होतो आहे, वाढत्या समस्या आणि रोज नवनवीन आव्हानांना तो सामोरा जात आहे. मार्ग वेगळे असले तरी, दोघांचाही अजेंडा जर मराठी समाज असेल, तर आपसात भांडणं असण्याचं कारण काय? खरं तर निवडणुका आता संपलेल्या आहेत आणि यापुढे मतदान कोणाला करायचं हा पाच वर्षानंतर फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे असं आपण का मानत नाही! आणि तेही चांगल्याच उमेदवाराला मतदान करायचं आहे हे एकदा ठरवल्यानंतर, मग उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो!


महाराष्ट्राच्या भविष्यकाळाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा प्रश्नमुख्याने विचार करायला पाहिजे अशा तीन गोष्टी आहेत; (१) शेती, (२) उद्योग आणि (३) शिक्षण. त्यात आजपर्यंतची वाटचाल आणि येणाऱ्या भविष्यकाळातील आव्हाने! आज कुठल्याही कुठल्याही क्षेत्राविषयी आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यकाळाविषयी जेव्हा विचार केला जातो तेव्हा सुरुवात होते ती अगदी शिवाजी महाराजांपासून ते थेट मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, महाराष्ट्रावर दिल्लीचा आकस आणि मग यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि शेवटी शरद पवार या नेत्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आणि काय करू शकले असते! थोडक्यात, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या विविध अंगांचा विचार करताना बोटावर मोजण्याइतक्या राजकीय नेतृत्वाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचाच (?) विचार केला जातो. संतांच्या आणि समाजसुधारकांच्या भूमीचे, भविष्य फक्त काही मोजक्या राजकीय पुढाऱ्यांनी वेळोवेळी त्यांची पावलं कशी टाकली याच्याशी जुळवण्याचा नुसताच प्रयत्न आपण करत नाही तर जे काही घडलं हे त्यांच्याच कर्तृत्वाचा एक भाग समजतो. आपण इतिहासात बुडून जातो आणि नको इतके भावुक होऊन आज काय करायला पाहिजे याचा प्रॅक्टिकल विचार न करता, राष्ट्रपुरुषांचे स्मारक बांधण्यावरून, एखाद्या पुलाच्या किंवा रस्त्याच्या नावावरून आंदोलनं आणि उरलंच तर कुणीही न वाचलेल्या पुस्तकामध्ये असलेल्या आक्षेपार्ह भागावरून रस्ता रोको, मारझोड, मोडतोड! विचार विचार आणि शेवटी अविचार! आपण ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला स्मरून आपल्या भविष्याचा विचार करतो, त्या आंदोलनाच्या नेत्यांना तरी हा असला महाराष्ट्र अपेक्षित होता का? कुठल्याही राज्याची किंवा एखाद्या समाजाची सर्वागीण प्रगती राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते करू शकत नाही. याला अपवाद दूरदृष्टी असलेला एखादा नेता असू शकतो. पण खरी प्रगती होते ती सर्वसामान्य जनतेच्या असामान्य कर्तृत्वामुळेच!

महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य. जर शेती या एकाच विषयावर जरी बोलायचं झालं तर आज हजारो हेक्टर पडीक जमीन आणि शेतकऱ्यांसाठी उभारलेले आजारी सहकारी कारखाने आणि तोटय़ातल्या सोसायटय़ा, हे आपले वैभव? महाराष्ट्राचं धोरण शेतीला पोषक असतं तर श्रीमंतीत लोळणारे सहकारी कारखान्यांचे संचालक आणि पिढय़ा न् पिढय़ा कर्जबाजारी शेतकरी असं चित्र आपल्याला पाहावयास मिळालं नसतं. यशवंतराव चव्हाणानंतर ‘जाणता राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाविषयी आपण भरभरून बोलतो ते तर आज देशाचे कृषीमंत्री आहेत. तरी आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या? कुणालाही दोष देण्याचा प्रश्न नाही, आपण राजकीय नेत्यांकडून फार मोठय़ा अपेक्षा ठेवतो, इथेच आपण चुकतो. शेतकऱ्यांच्या रोजच्या प्रश्नावर शरद जोशींनी मोठी चळवळ उभारली होती आणि त्यांचं मोठं योगदान आहे. आज शेतीबरोबर संपूर्ण गावाचा कायापालट करणारे हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांचे कर्तृत्व, गावागावातल्या तरुणांनी दाखवण्याची गरज आहे. शेतकरी आणि कवी असलेल्या महानोरांच्या भाषेत सांगायचं तर शेतकऱ्यांची काही हजार कोटींची कर्जे माफ करून तो तात्पुरता जगला असेल, पण अजून ‘नांदला’ नाही!

त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या उद्योगक्षेत्रात जर आपण पाहिले तर आपल्याला दिसेल की, महाराष्ट्राच्या उद्योगाची जी प्रगती दिसत आहे, ती कुठल्याही एखाद्या राजकीय नेत्याच्या किंवा मंत्र्याच्या धोरणामुळे मुळीच नाही, तर ही प्रगती आहे लहान-मोठय़ा उद्योगपतींच्या उद्यमशीलतेची, त्यांच्या अपार कष्टाची, परदेशी कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीची व इथल्या कष्टकरी जनतेने गाळलेल्या घामाची! सतत सरकारवर अवलंबून प्रगतीची अपेक्षा करण्यापेक्षा वैयक्तिक प्रयत्नातून ती होऊ शकते, अशी अनेक उद्योगपतींची उदाहरणं उभ्या महाराष्ट्रात देता येतील. वैयक्तिक प्रयत्नातून एखाद्या संपूर्ण क्षेत्रालाच कशी चालना मिळू शकते याचं उत्तम उदाहरण मराठी सिनेमाच्या वाटचालीकडे बघितल्यावर मिळते. ‘श्वास’ पूर्वी संपूर्ण मराठी सिनेमा मृत्युपंथाला लागला होता आणि मुख्य म्हणजे शासनाचे अनुदानही त्याला वाचवू शकत नव्हते. ‘श्वास’ ऑस्कपर्यंत गेला आणि मराठी सिनेमाचा श्वासोच्छवास सुरू झाला! ‘श्वास’च्या यशाने एकूणच मराठी सिनेमाला भरभराटीच्या वाटेवर नेले, त्याचेच फळ म्हणजे आज पुन्हा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सिनेमा ऑस्कपर्यंत गेला आहे. आता मराठी सिनेमाचा दरारा आंतरराष्ट्रीय सिनेमात कायमचा दिसला पाहिजे. दुसरं ज्वलंत उदाहरण म्हणजे कित्येक र्वष तोटय़ात असलेल्या सरकारी दूरदर्शनच्या एकमेव वाहिनीचे. त्या उलट शेकडो मराठी कलाकारांनी आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर मराठीत एक डझन खासगी चॅनेल्सद्वारा प्रगतीचं नवं दालन कार्यान्वित केलं आहे. आज कित्येक तरुण मल्टिलेव्हल मार्केटिंग आणि इन्टरनेटच्या ‘सोशल नेटवर्किंग’द्वारा कित्येक नवीन नवीन प्रयोग करताना दिसतात. त्यांनी जरा आऊट ऑफ द बॉक्स विचार केला आणि प्रोफेशनल दृष्टी आणली तर अनेक क्षेत्रांत त्याचा कल्पकतेने उपयोग करून मोठं यश मिळवता येऊ शकतं.

शिक्षणक्षेत्रात गेल्या काही वर्षापासून माजलेल्या गोंधळाची परिस्थिती सर्वश्रुत आहे, त्याची कारणमीमांसा करण्याची ही जागा नव्हे. साधा फळा आणि खडू नसतानाही हजारो एकशिक्षकी शाळा चालविणारे खरे महाराष्ट्रभूषण, पण त्यांच्या प्रश्नांकडे बघायला कुठल्याच शिक्षणमंत्र्यांना वेळ नाही. तर दुसरीकडे वर्षानुवर्ष पदवीधर बेकार तरूण निर्माण करणाऱ्या भट्टय़ा अजून चालू आहेत. म्हणून मराठी शिक्षणसंस्थांनी परंपरागत शिक्षण देऊन मुलांना नुसतंच साक्षर करण्यापेक्षा तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून व्यवहारी जगात जगायचा मंत्र शिकविला पाहिजे. नव्हे तसं त्याचं कर्तव्यच असलं पाहिजे आणि ज्यांना शाळेचे दरवाजेच दिसले नाहीत त्यांचं काय? आज कित्येक अशा चांगल्या मराठी संस्था मरणप्रश्नय स्थितीत जगत आहेत, तिथंसुद्धा गरज आहे नवीन विचारांची आणि नेतृत्वाची. शाळेत न गेलेल्यांसाठी टीव्हीसारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग करता येऊ शकतो, पण दुर्दैवाने आपण फक्त नवीन गायक आणि नर्तक शोधण्यात गर्क आहोत!

म्हणून महाराष्ट्रात शेती, उद्योग, शिक्षण या मूलभूत विषयांतील प्रश्न सोडवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी, समाजाच्या विविध स्तरांतून मोठय़ा प्रमाणात विचारमंथन आणि नि:स्वार्थ कृतीची गरज आहे. आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानांना कशा प्रकारे तोंड देता येईल यासाठी नव्याने विचार होणं गरजेचं आहे. सामाजिक संस्थांनी आणि तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. यात राजकीय नेत्यांचादेखील सहभाग असावा, पण त्यांच्याकडून संपूर्ण उत्तराची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. खरं तर कित्येक मोठय़ा राजकीय नेत्यांचं अस्तित्वच एखाद्या प्रश्नात दडलेलं असतं, त्याच्या उत्तरात नव्हे, हेही आपण अनुभवलेलं आहे आणि अजूनही अनुभवतो आहोत!

मराठी माणसाच्या प्रगतीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या शहरातला मराठी समाज आणि ग्रामीण भागातला मराठी समाज यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत, ते नीट समजून यापुढे वेगवेगळ्या पद्धतीने सोडवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या समाजात आपल्याच बांधवांनी आपल्याविषयी काही वर्षापूर्वी करून ठेवलेले गैरसमज कसे बाजूला करणार? मराठी माणसं ही चाकरमानीच असतात, त्यांच्या रक्तातच उद्योजकता नसते, त्यांना त्यांची मुलं ही नारळीकर, गावस्कर, लता मंगेशकर व्हावीशी वाटतात, पण धीरुभाई अंबानी नकोत, एकूणच आपण एक ‘डाऊन मार्केट’ आहोत, अशी संतापजनक विधाने आपल्याला आजही वाचायला मिळतात. खरं तर अशी टीका करणाऱ्यांचाच सर्वप्रथम मनसे निकाल लावणं गरजेचं आहे! कुठल्याही समाजाच्या रक्तात असं कुणीही सर्वेक्षण केल्याचं माझ्या ऐकिवात नाही! खरं तर रक्तात असे काही गुण असतात असे म्हणून हे लोक स्वत:च्या मनातील छुपा चातुर्वण्र्य उघड करीत असतात. असे महाभाग अजूनही १९६० च्या सालातच जगत आहेत, त्याला कोण काय करणार? त्यांना एकच विनंती- समाजाला दिशा देता येत नसेल तरी चालेल, पण कृपा करून त्यांची दिशाभूल करू नका.

येत्या ५० वर्षात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जर टिकवायचा असेल, तर मुंबईतल्या मराठी माणसांच्या हातात चांगल्या प्रमाणात आर्थिक सत्ता व अधिकार येणं महत्त्वाचं आहे, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्याला राहायला कायमस्वरूपी घर मिळणं गरजेचं आहे. नोकरभरतीत स्थानीय लोकाधिकार समितीने फार चांगलं काम केलेलं आहे, पण आता त्याच्याही पुढे जाऊन मराठी तरुणांना नोकऱ्या किंवा किरकोळ व्यवसायापेक्षा मोठय़ा प्रमाणात उद्योगात कसं आणता येईल व जे आज उद्योगात आहेत त्यांना आणखी मोठं कसं करता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. महाराष्ट्रभर असलेल्या लहानमोठय़ा मराठी उद्योजकांना चांगलं मॅनेजमेंटचं शिक्षण आणि त्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची उकल करणाऱ्या संस्था निर्माण करणं गरजेचं आहे. बँकांमध्ये मराठी नोकरभरतीइतकेच आवश्यक आहे, मराठी तरुणांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणं. सव्‍‌र्हिस सेक्टरमध्ये १० टक्के नोक ऱ्या मागणाऱ्या हातांना जरी आपण नोकऱ्या देणारे हात बनविता आले तरी उरलेल्या तरुणांना काम मिळू शकतं! हा माझा आशावाद नाही तर आत्मविश्वास आहे.

महाराष्ट्र पुढील काही वर्षात कुठल्याही एका क्षेत्रात तरी जगाच्या नकाशावर असणार आहे का? लवकरच केंद्र सरकार शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. ज्ञानेश्वरांच्या या महाराष्ट्रात पुणे-मुंबई-नाशिक हा त्रिकोण ही जागतिक ज्ञानाची पंढरी म्हणून विकसित व्हायला पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे आपल्या पदवीधर मराठी तरुणांना आणि खास करून महिलांना शिक्षणक्षेत्रात चांगलं काम करण्याची मोठी संधी मिळू शकते. त्याशिवाय कोकणाला मॉरिशसप्रमाणे पर्यटन क्षेत्र म्हणून नक्कीच पुढे आणता येईल. कोकणच एक असा प्रदेश आहे, जो संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नैसर्गिक साधनांच्या बळावर वैभवशाली बनवू शकतो. निदान शिक्षण आणि पर्यटन या दोन क्षेत्रांत महाराष्ट्र जगाच्या नकाशावर नक्कीच जाऊ शकतो!
दुकानांच्या पाटय़ांवरती मराठी अक्षरांसाठी हट्ट धरताना, पाटय़ांच्या खाली मराठी मालक असला पाहिजे, असा विचार आपण केव्हा करणार? परंपरागत व्यवसायापलीकडे जाऊन पुढच्या पिढीने यशाची नवीन क्षितिजे शोधण्याची गरज आहे, स्वत:च एक स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याची गरज आहे. विविध क्षेत्रात कित्येक उत्तुंग मराठी व्यक्ती असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या समाजाची अशी ठोस ओळख अजून होत नाही. म्हणून व्यापक हित लक्षात घेता निदान भावनात्मक मुद्दय़ांना ‘मराठीचा मुद्दा’ करून आपण इतर समाजापासून दूर जाता कामा नये. निवडणुका संपलेल्या आहेत. पोटात कितीही आग असली तरी वरील प्रश्नांचा ऊहापोह थंड डोक्यानेच करावा लागेल. त्यासाठी आज तरी कुठलाही शॉर्टकट दिसत नाही. ‘कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट.. तेव्हाच होईल जय महाराष्ट्र’ हे ब्रीद अंगीकारल्याशिवाय ते शक्य नाही. एक प्रश्नेग्रेसिव्ह मराठी समाजच प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र घडवू शकतो! जय महाराष्ट्र!

- श्री. नितिन पोतदार (काँर्पोरेट लाँयर,९९३०९५४७४७)


पुढे वाचा >>>
मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा!SocialTwist Tell-a-Friend