स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.
Showing posts with label जल साक्षरता. Show all posts
Showing posts with label जल साक्षरता. Show all posts

Sunday, September 20, 2009

कोरडवाहू शेती : समस्या आणि उपाय

साभार-लोकसत्ता/रमेश पाध्ये/विशेष लेख/१०.०९.२००९

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ग्रामीण भारतात सुखसमृद्धी वास करीत होती अशा प्रकारच्या विवेचनाने संपतराव पवारांनी लेखमाला (२६, २७ व २८ ऑगस्ट) सुरू केली. पण खरोखरच अशा प्रकारची सुखसमृद्धी भारतभरचे नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे, तर केवळ पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कऱ्हाड या जिल्ह्यांमधील ग्रामीण नागरिक तेव्हा अनुभवत होते काय? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. आधीच्या व्यवस्थेतही विषमता होतीच. गावचा पाटील, देशमुख आणि कुळकर्णी हे कदाचित आर्थिक सुबत्ता अनुभवीत असतील पण सर्वसाधारण शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर यांच्या वाटय़ाला दारिद्रय़ आणि उपासमार या व्याधी फार पुरातन काळापासून पाचवीला पुजलेल्या होत्या. दुष्काळात शेतसारा भरता न आल्यामुळे इंग्रज सरकारने सारा वसुलीसाठी बळाचा वापर सुरू केल्यावर शेतकऱ्यांनी सरकार, जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधात बंडे केल्याचा १९ व्या शतकातील इतिहास सर्वश्रुत आहे. थोडक्यात जुन्या जमान्यात सातत्याने आबादीआबाद कशी होती याचे चित्र रंगविणे म्हणजे ‘रामकाळी वानरांना वाचा होती,’ असे सांगण्यासारखे आहे.
untitled
स्वातंत्र्योत्तर काळात हजारो कोटी रुपये खर्च करून मोठी धरणे बांधली गेली, त्यामुळे महाराष्ट्रातील १८ टक्के जमीन सिंचनाखाली आली. याचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडला की नाही? उसाचे उत्पादन वाढावे म्हणून उसाची अधिक उत्पादक वाणे आणण्यात काय चूक झाली? महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने निघाले याचा पवारांनी उल्लेख केला आहे. पण या प्रक्रियेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात आर्थिक व सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया कशी सुरू राहिली या बाबीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. सहकारी साखर कारखाने निघण्यापूर्वी महाराष्ट्रात भांडवलदारांचे साखर कारखाने सुरू होते, तेव्हा भांडवलदार शेतकऱ्यांकडून कमी भावात ऊस घेऊन आणि तयार केलेली साखर जास्त भावात विकून भरमसाठ नफा कमवीत असत. या अतिरिक्त नफ्यावर शेतकऱ्यांचा हक्क प्रस्थापित होण्यामध्ये सामाजिक न्याय आहे, असे सहकारी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते प्रा. धनंजयराव गाडगीळ यांचे मत होते. त्यामुळेच महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना उभा करून तो यशस्वीपणे चालावा यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीमध्ये ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. एवढय़ा अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञाने आपला मोलाचा वेळ खर्च करून जे सहकारी चळवळीचे रोपटे लावले, जोपासले आणि पुढे ज्याचे विशाल वृक्षामध्ये रूपांतर झाले त्याची संभावना ‘प्रत्येक जिल्ह्यात विकासाची बेटे निर्माण झाली’, अशा शब्दांत करणे योग्य नाही.
१९७२च्या दुष्काळामध्ये राज्य पातळीवर ‘दुष्काळ निवारण’ समितीची स्थापना करण्यात आली. सर्व डाव्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या समितीने महाराष्ट्रभर खेडोपाडी सरकारने दुष्काळी कामे सुरू करावीत यासाठी सरकारवर दडपण आणले. मजुरांनी केलेल्या कामाचा चोख मोबदला त्यांना मिळावा आणि काही प्रमाणात मजुरी धान्याच्या रूपात मिळावी अशा मागण्या पुढे करण्यात आल्या. दुष्काळग्रस्त भागातील पशुधन कसाईखान्यात जाऊ नये यासाठी ठिकठिकाणी सरकारने गुरांसाठी छावण्या काढाव्यात व साखर कारखान्याच्या अखत्यारीतील उसाचा पाला जनावरांना हिरवा चारा म्हणून उपलब्ध करून देण्यात यावा, अशाही व्यवहार्य मागण्या करण्यात आल्या आणि काही अंशी त्या मान्यही झाल्या. या दुष्काळाच्या काळात सामाजिक आणि राजकीय पातळीवर जे वैचारिक मंथन झाले त्यामध्ये कॉम्रेड दत्ता देशमुख आणि डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे वैचारिक वारसदार वि. म. दांडेकर यांचा सिंहाचा वाटा होता. या वैचारिक मंथनातून ‘दुष्काळ निवारण समिती’चे रूपांतर ‘दुष्काळ निर्मूलन समिती’त झाले. यातूनच ग्रामीण रोजगार हमी योजना आकाराला आली. या योजनेअंतर्गत कामे काढताना ती दुष्काळी कामांप्रमाणे केवळ दगड फोडण्याची असू नयेत तर भविष्यात शेतीला लाभदायक ठरतील, अशी उत्पादक असावीत, असा विचार मांडण्यात आला. बऱ्याच प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाडय़ात अशी कामे झाली. याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना झाला.
रोजगार हमी योजना महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यात राबविली जाताना त्यात काही त्रुटी निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने देखरेखीचे काम करण्यासाठी पुढे येणे गरजेचे ठरते. अशा कार्यकर्त्यांनी ज्या त्रुटी/ भ्रष्टाचार उजेडात आणला तो निपटून काढण्याचे काम शासनाने केले पाहिजे. तसे होताना दिसत नाही. पण यामुळे जी चांगली कामे झाली ती विचारात न घेता योजनेवर आगपाखड करणे बरोबर नाही.
महाराष्ट्रात आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात कमी पाण्यावर भरपूर उत्पादन देणाऱ्या द्राक्षे, डाळिंबे यांच्या अत्याधुनिक फळबागा विकसित करण्याचे काम उद्यमशील शेतकऱ्यांनी केले तसेच पश्चिम महाराष्ट्रात बोरे, आंबा अशा कोरडवाहू फळबागाही विकसित करण्याचे काम काही शेतकऱ्यांनी यशस्वीपणे केले आहे. ही सर्व प्रक्रिया स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४० वर्षांनी का सुरू झाली? यामागचे एक कारण ग्रामीण भागात शिक्षणाचा जो प्रसार झाला त्याच्याशी जोडता येईल. स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणावर पोसला जाणारा बांडगुळांचा एक गट जसा तयार झाला त्याचप्रमाणे कष्ट करून आपले ऐहिक जीवन संपन्न करण्याची आकांक्षा असणारा सुशिक्षित शेतकऱ्यांचा एक गटही अस्तित्वात आला. अशा कल्पक तरुण शेतकऱ्यांनी बाहेरील घटक कमी वापरून, पर्यावरणाचा तोल सांभाळून शेती अधिक उत्पादक कशी करावी याचे वस्तुपाठ निर्माण केले आहेत. असे शेतकरी म्हणजे नव्या हरितक्रांतीचे अग्रदूत आहेत. मराठीमध्ये प्रसिद्ध होणारे ‘बळीराजा’ हे मासिक या नवविचारांच्या प्रक्रियेला चालना देण्याचे काम करीत आले आहे. कृषी विकासाच्या प्रक्रियेला गती प्राप्त व्हावी, असे वाटणाऱ्यांनी शेतकऱ्यांमधील कृषी-साक्षरतेला चालना देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रा. श्री. अ. दाभोळकर यांनी शेतकऱ्यांमध्ये ‘प्रयोग परिवार’ ही चळवळ उभी करण्याचा प्रयोग यासाठीच सुरू केला होता.
संपतराव पवार यांनी ‘८० च्या दशकात भांडवली शेतीच्या उदयामुळे छोटय़ा शेतकऱ्यांना शेती करणे शक्य होईना’ असे विधान करून यामुळे मुंबईच्या कापड गिरण्या आणि गोदी या धंद्यामध्ये काम करण्यासाठी छोटय़ा शेतकऱ्यांचा ओघ सुरू राहिल्याची माहिती दिली आहे. पण वास्तवात मुंबई कापड उद्योग १९८३ साली जवळपास बंद पडला व त्या उद्योगातील मराठी कामगारांचा ओघ ग्रामीण भागाकडे सुरू झाला. मुंबईच्या गोदीमध्येही याच सुमारास यांत्रिकीकरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झाल्यामुळे कामावर असलेल्या कामगारांचा रोजगार कसा टिकवायचा हा तेथील युनियनसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न बनला. याचा अर्थ ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईत स्थलांतर सुरू राहिले नाही असे नाही. ही स्थलांतराची प्रक्रिया हे एक ऐतिहासिक सत्य आहे. असे स्थलांतर किमानपक्षी गेली १५० वर्षे सुरू आहे. पन्नास वर्षांपूर्वी असे स्थलांतरित मजूर बकाल चाळीमध्ये जथ्याजथ्याने राहायचे. त्यांचा कुटुंबकबिला गावात राहायचा. आता ग्रामीण भागातून शहरांकडे येणारा मजूर येताना आपली बायको-मुले घेऊन शहरात येतो आणि निवाऱ्यासाठी झोपडपट्टी जवळ करतो हे बदललेले वास्तव आहे.
‘कोरडवाहू क्षेत्राच्या विकासासाठी म्हणून ज्या ज्या योजना केल्या, त्यातून मुळात आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यांनाच अधिक सक्षम करण्याचा दृष्टिकोन ठेवला गेल्यामुळे बहुसंख्य कोरडवाहू शेतकऱ्यांच्या वाटय़ाला गुलामीचे जगणे आले आहे’ असा हेत्वारोप करणारा सूर पवारांनी लावला आहे. आपल्या देशात लोकसंख्या वाढीचा रेटा एवढा जबरदस्त आहे की सर्व सक्षम माणसांना उपजीविकेसाठी काम मिळण्याचीच वानवा आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर सुरू होणाऱ्या ऊसतोडणीसाठी मजूर मिळणे ही येथे समस्या नाही. साखर कारखान्यांचा ऊसतोडणी हंगाम सुरू असताना ग्रामीण महाराष्ट्रातून लाखो मजूर रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी डोळे लावून वाट बघत असतात. तेव्हा ऊसतोडणीसाठी मजूर मिळावेत म्हणून कोरडवाहू क्षेत्राचा विकास केला नाही असा विचार कोत्या मनोवृत्तीचा अज्ञानी माणूसच करू धजावा.
संपतरावांनी बळीराजा धरणाचा प्रयोग विस्ताराने मांडला आहे. हा उपक्रम निश्चितच स्तुत्य होता. पण या प्रयोगाचे पुढील काळात काय झाले? पवार आणि त्यांच्या मित्रांनी जसा ‘बळीराजा’ प्रकल्प राबविला त्यापेक्षा पाणी वाटपाच्या संदर्भात नाशिकच्या बापूसाहेब उपाध्ये यांनी शेतकऱ्यांच्या सहकारी पाणी वाटप संस्था काढून सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना निश्चित केलेल्या पाण्याचा वाटा मिळण्याची व्यवस्था करून ती चोखपणे राबविली. काही प्रमाणात या यशामुळे आणि काही प्रमाणात सरकारचे धोरण बदलल्यामुळे कालव्याचे पाणी वाटप करण्याचे अधिकार शेतकऱ्यांच्या सहकारी पाणी वाटप संस्थांना मिळण्याची प्रक्रिया गेली २० वर्षे सुरू आहे. अशा चळवळीला पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांकडून सहकार्य मिळते आहे; एवढेच नव्हे तर असे काम करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणारी ‘सोपे काम’ ही सार्वजनिक संस्था गेली २० वर्षे सक्रिय आहे. संपतरावांना हे माहीत नाही काय? राळेगणसिद्धी येथील अण्णा हजारे यांनी आणि हिवरेबाजारच्या पोपटराव पवार यांनी जलसंधारण आणि पाणी वाटप या संदर्भात केलेली कामे हे कोरडवाहू शेतीच्या विकासाच्या संदर्भातील वस्तुपाठ आहेत. त्यांना या कामासाठी पैसा उपलब्ध झाला तो महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांच्या अंतर्गतच. पण संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट करू शकतील एवढय़ा संख्येने अण्णा हजारे वा पोपटराव पवार महाराष्ट्रात जन्माला आले नाहीत असे म्हणता येईल.
संपतरावांच्या एकूण विवेचनाच्या मागे कृषिविज्ञान हे घातक असल्याचा त्यांचा दृढ समज असल्याचे जाणवते. पण वास्तवातील स्थिती तशी नाही. उदाहरणार्थ ज्या हरितक्रांतीच्या नावाने त्यांनी बरीच आगपाखड केली आहे ती झाली नसती तर आज कृषी क्षेत्र ११५ कोटी लोकांचा भार पेलू शकले नसते. मग माल्थस यांच्या भाकिताप्रमाणे रोगराई, उपासमारीने दरवर्षी करोडो माणसे मरून लोकसंख्या ५०/ ५५ कोटींच्या घरात स्थिरावली असती. पण हरितक्रांतीने हे दुष्टचक्र थोपवून धरले. त्यांनी आठ एकर क्षेत्रावर ८१०० किलो शाळू आणि ४५०० पेंडी कडब्याचे उत्पादन केल्याची माहिती दिली आहे. चीनमधील कृषिवैज्ञानिकांनी विकसित केलेले मक्याचे वाण एका एकरावर १०,००० किलो मक्याचे दाणे आणि ३०,००० किलो कडब्याचे उत्पादन शक्य करते.
हरितक्रांतीचे लोण शाश्वत सिंचनाची सोय असणाऱ्या क्षेत्रापुरते मर्यादित राहिले आहे. पण याचा अर्थ कोरडवाहू हरितक्रांतीची लाट कधी येणारच नाही असे वाटत नाही. कारण हैदराबादच्या इक्रिसॅट या संशोधन करणाऱ्या संस्थेने अधिक उत्पादन देणारे तुरीचे संकरित वाण याच वर्षी बियाणांची निर्मिती करणाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. तसेच ज्वारीचा डीएनए कोड पूर्णपणे उलगडण्याचे काम त्यांनी पूर्णत्वास नेले आहे. याचा उपयोग पुढे ज्वारीची अधिक उत्पादक वाणे विकसित करण्यासाठी निश्चितच होईल. राईचे संकरित वाण सरकारकडून मान्यता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. तेव्हा कमी पाण्याची शेती वैज्ञानिकांकडून दुर्लक्षित राहिलेली नाही. सरकारने या कामाला भरपूर निधी उपलब्ध करून दिला तर या कामाला निश्चितच गती प्राप्त होईल. पण हे काम केवळ सरकारच करू शकते असे नाही. पहिल्या हरितक्रांतीच्या संशोधनाचा आर्थिक भार अमेरिकेतील रॉकफेलर आणि फोर्ड फाऊंडेशन यांनी उचलला होता. आमच्या देशात त्यांच्याएवढय़ा आर्थिक कुवतीचे उद्योगपती डझनावारी आहेत. पण त्यांच्याकडे विश्वस्त वृत्तीचा अभाव आहे. त्यामुळे भारत सरकारने आणि राज्य सरकारांनी या कृषी संशोधनाचा भार उचलावा यासाठी सामाजिक वा राजकीय चळवळ उभी करण्यावाचून शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय उपलब्ध नाही.
-रमेश पाध्ये
rameshpadhye@hotmail.com


पुढे वाचा >>>
कोरडवाहू शेती : समस्या आणि उपायSocialTwist Tell-a-Friend

Friday, September 4, 2009

कोरडवाहू शेती (३) - नियोजनानेच दुर्दशा टाळता येईल!

साभार- लोकसत्ता/विशेष/संपतराव पवार/२८.०८.२००९

सध्या जागतिकीकरणाच्या गजरात सरकार दंग आहे. त्याचा परिणाम म्हणून आज मूठभर बहुराष्ट्रीय कंपन्या संपूर्ण अन्नधान्य साखळीवर सत्ता गाजवीत आहेत आणि पर्यायी व्यवस्थांचा विध्वंस करीत आहेत. बी-बियाणे आणि अन्नधान्यव्यवस्थेवर मक्तेदारी प्रस्थापित करून स्थानिक बाजारपेठा हेतुपुरस्सर उद्ध्वस्त करीत आहेत. केवळ दहा जागतिक कंपन्यांनी ३२% बियाणांच्या व १००% जनुक अभियांत्रिकी तसेच संकरित बियाणांचा व्यापार ताब्यात घेतला आहे. त्यातच सरकारने ‘लुटा आणि पळा’ संस्कृतीला खतपाणी घालण्याचेच धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शेतकरी आता उत्पादक न राहता, या महाकाय कंपन्यांचा ग्राहक बनला आहे.
untitled
जागतिकीकरणाने जैविक बहुविधतेचा नाश करून शेती संस्कृतीतील विविध अन्नाची वैशिष्टय़े नासवून टाकली आहेत. पारंपरिक उद्योगांवर, उत्पादनप्रक्रियेवर, निसर्गनियोजन, निसर्गवापर व निसर्गरक्षणाच्या वर्षांनुवर्षे चालत आलेल्या पद्धतींवर परराष्ट्रीय कंपन्यांचा प्रभाव व दबाव वाढत आहे. यामुळे श्रमिकांच्या जगण्याच्या साधनांवर संक्रांत आली आहे. म्हणूनच कंपन्यांचा राजकीय आणि आर्थिक संघर्ष एकदम सामान्य जनजीवनाच्या दैनंदिन पातळीवर उतरला असून, झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी कर्ज काढणे आणि बुडणे या शेतकऱ्याच्या कृतीशी संलग्न झाला आहे.
आर्थिक केंद्रीकरण, स्वामित्त्व हक्क आणि जनुक अभियांत्रिकी या तीन प्रक्रियांद्वारे बी-बियाण्यांवरील कंपन्यांची मक्तेदारी घट्ट होत आहे. खरे तर बीज म्हणजे संस्कृती व इतिहास यांचे भांडार, पण बीजरक्षण आणि देवाणघेवाण ही शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची कर्तव्येच आता गुन्हा ठरली आहेत. ‘कंट्रोल ऑफ जीन एक्सप्रेशन’ या तंत्राने वांझोटे बियाणे तयार करण्याचे परवाने मिळवून, शेतीचा धंदा बनविलेल्या व्यापारीकरणाचा दृष्टिकोन शेतीच्या सुपिकतेचे रूपांतर वांझोटेपणात करत आहे.
भाजीपाल्याच्या दराची लॉटरी लागलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे झटपट पैसा मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेक शेतकरी अंधानुकरण करतात, पण इथेही उत्पादन आणि बाजारभाव या दोन्ही गोष्टी रोगाच्या फैलावानुसार नियंत्रित केल्या जातात. त्यामुळेच माणसांच्या औषधांपेक्षा शेतीसाठीच्या औषधांची दुकाने बहुसंख्य झाल्याचे चित्र दुष्काळी प्रदेशात दिसते. साहजिकच कीटकनाशके, तणनाशके यांचा बेसुमार वापर होऊन सृष्टीची बहुविधता आणि सुफलतेची लूट चालू झाली आहे.
मध्यंतरी काही प्रयोगशील कष्टाळू शेतकऱ्यांनी द्राक्षे, बोरे, डाळिंब या फळबागांचा मार्ग चोखाळून पाहिला; पण सिंचनाची नवीन तंत्रे, कीटकनाशके, खते, नैसर्गिक कोप आणि बाजारातील अनियमितपणा यामुळे त्यांचीही फसगतच झाली. परिणामी शेतकरी स्वत:चे आर्थिक नियोजन गमावून बसला आहे.
एकंदर शेतकरी शेतीतून हद्दपार होण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. अशा वेळी या व्यापारी, निर्यातप्रवण शेतीला शह देण्याची दिशा शेतकऱ्यांच्याच ठोस कृतीतून स्वीकारावी लागेल. गर्तेत पडलेल्या शेतकऱ्याला वरूनच तुकडे टाकून जगविणे उपयोगाचे नाही. निरंतरतावाद, तंत्रज्ञान, परंपरा व विकासाची सांगड घालणारा मार्ग शोधण्याची गरज आहे. पारंपरिक पद्धतीच्या भारतीय शेतीने गाठलेला सुवर्णकाळ स्मरून त्याच मार्गाने महासत्तेकडे वाटचाल करण्याची क्षमता भारतीय शेतकऱ्यांजवळ नक्कीच आहे. त्यासाठी एका प्रतिष्ठित, सुसंस्कृत, स्थिरशेती जीवनपद्धतीकडे शेतकऱ्यांची मानसिकता वळवावी लागेल, परंतु त्या अगोदर सर्वाआधी मरणाच्या दारात उभा असलेला शेतकरी आणि जगण्यासाठी स्थलांतर करणारा शेतकरी वाचवायचे झाल्यास त्यांच्या हमखास उत्पादनाचे स्रोत वाढवावे लागतील.
पशुधन हे दुष्काळी भागातील चरितार्थाचे एकमेव साधन, कारण जनावरे अन्नाबाबत माणसांशी स्पर्धा करीत नाहीत. उलट पर्यावरणीय शेतीसंस्कृतीत यंत्र, तंत्र आणि अर्थकारण हे पिके आणि पशुसंवर्धन यांतील एकात्मतेवर आधारलेलेअसते. एकाचा कचरा दुसऱ्याचे पोषक द्रव्य बनते. जनावरे सेंद्रीय खते पुरवून शेती अधिक सुपीक करतात आणि उत्पादन वाढवितात. जनावरांची कातडी, दूध, शेणखतातील ऊर्जा, पोषणद्रव्ये या सर्वाचा मूळस्रोत म्हणूनच पशुधन शेतकऱ्यांचे, शेतीसंस्कृतीचे हृदयस्पंदनच असते. पण तेच हरविल्याने शेतकऱ्यांचे रूपांतर मजुरात होते. एकीकडे २०५० सालची भूक मिटविण्याच्या भूलथापांत जनावरांचे माणशी प्रमाण झपाटय़ाने घसरत आहे. दुसरीकडे मांसनिर्यातीच्या नावाखाली कत्तलखान्यांना १००% अनुदान दिले जाते. ‘अल कबीर’ या एकाच कत्तलखान्यात वर्षांला एक लाख ८२,४०० म्हशींची कत्तल होते. बाकी ३२,००० अनधिकृत कत्तलखान्यांत लाखो जनावरांची कत्तल होतच असते आणि तिसऱ्या जगात जिथे ८०% जिराईत शेती केली जाते तिथे अवर्षण आणि अतिवृष्टी यामुळे चाराटंचाई निर्माण होऊन लक्षावधी जनावरे दरवर्षी कत्तलखान्याच्या दिशेने वळविली जातात, म्हणूनच श्रमांवर आधारित चारानिर्मिती करून दूधव्यवसायाच्या आधारे शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढविली तर ग्रामीण लोकसंख्येला कुपोषणातून सावरण्याचे कार्य साध्य होऊन, कॉर्पोरेटच्या घशात सगळी शेती जाणे टळू शकेल. चारानिर्मिती, पशुपालन या प्रत्येक घटकांत रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. जनावरांचे संगोपन व व्यवस्थापन करण्याचे ८०% कष्ट स्त्रियाच करतात. महाराष्ट्रात सात कोटी कुटुंबे गुराढोरांवर चरितार्थ चालवितात. त्यापैकी दोनतृतियांश अल्पभूधारक आणि बाकीचे भूमिहीन शेतमजूर आहेत. या साऱ्यांचा होणारा कडेलोट वाचवून त्यांना पर्यावरण शेतीसंस्कृतीकडे आकर्षित करण्यासाठी आणि अर्धशिक्षित तरुणांना व त्यांच्या साधनांना सामावून घेऊन शेतकऱ्यांच्या गोठय़ापर्यंत वैरण पोचविण्याचा महात्मा गांधींना अभिप्रेत असणारा ग्रामोद्योग येथे निर्माण करता येईल.
शेतीक्षेत्रात निर्माण झालेले आव्हान हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे, बी-बियाण्यांच्या मक्तेदारांचे तसेच जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे आहे हे उघड आहे. याला एकाकी शेतकरी प्रतिबंध करू शकत नाही. परिस्थितीला शरण जायचे की मरण स्वीकारायचे या सीमारेषेवर शेतकरी उभा आहे. या संकटातून त्याला तारून नेण्यासाठी जनावरांचीच मदत होऊ शकते ही जाणीव त्यांना असल्याने पशुधन जगविण्यासाठी लक्षावधी माणसे स्थलांतर करतात. एक प्रकारे गुलामीचे जीवन ती स्वीकारतात. जनावरे जगविण्याच्या इच्छेमुळे ही अगतिकता येते. जिरायती शेतीक्षेत्रात सर्वसाधारणपणे १०० दिवस चाराटंचाई जाणवते. अलीकडील हायब्रिड बियाणांमुळे चारा उत्पादन नि:सत्त्व आणि कमी होत गेले; परिणामी चाराटंचाई तीव्र होत गेली. या टंचाईची झळ शेतकऱ्यांना लागू नये म्हणून त्यांना घरपोच चारा पुरविण्याची व्यवस्था केली तर त्यांची चिंता मिटेल. जिरायती क्षेत्रात ऊस आणि साखर कारखानदारीपेक्षा चारानिर्मिती निश्चित लाभदायक ठरेल. पशुधनाची कत्तल थांबेल. शेतीस सेंद्रीय खतांचा पुरवठा होईल. अन्यथा रासायनिक खतांचा वापर अधिक उत्पादनासाठी वाढत राहिला तर माती मृत होण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी पावसाच्या चार ते सहा महिन्यांच्या कालावधीत धान्य व वैरणनिर्मितीचे सूत्रबद्ध नियोजन केले तर विकासाचा नवा मार्ग उदयाला येईल. वैरणनिर्मितीसाठी हंगामाची गरज नाही. औषधफवारणीचा प्रसंग नाही. उपलब्ध पाण्यात, कोणत्याही काळात आपल्या पशुधनास वर्षभर पुरेल एवढय़ा चाऱ्याचा साठा करून लुटलेली सुगी शेतकरी परत मिळवू शकेल. पर्यावरणाशी अनुरूप असे शेतीचे तत्त्व प्रत्यक्षात आणू शकेल. ही पद्धत अधिकाधिक विकसित होत जाऊन पर्यावरणशेतीत सुधारणा होत जाईल. लहान शेतीला संरक्षण मिळेल. शेतकऱ्यांचा चरितार्थ सुरक्षित राहील आणि सुरक्षित अन्नाचेही उत्पादन होईल.
कोरडवाहू क्षेत्रातील शेतीला उत्पन्नाची शाश्वती द्यायची असेल, तर दोन हजार लोकसंख्येच्या गावास केवळ दीडशे एकरांत चारानिर्मिती करण्यास प्राधान्य देऊन, त्या चाऱ्याचे सायलेज करून टंचाईकाळात तो पुरविण्याची व्यवस्था उभी करावी. ओला चारा साठवून ठेवण्याचे मूरघास तंत्रज्ञान (सायलेज) विद्यापीठ पातळीवर १९६५ साली विकसित झाले आहे. ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवावे.
पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता संपली की पाझर सुरू होतो. पाणी मुरविण्याला मर्यादा असल्यामुळे यापुढे पाणी जिरवण्याला प्राधान्य देण्याऐवजी पाणलोट क्षेत्राच्या उंचीवर पावसाळ्यातील पाणी उचलून साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी. तशी केंद्रे प्रत्येक गावात नैसर्गिक अनुकूलता लक्षात घेऊन उभी करावीत. टंचाईकाळात ते पाणी सायफनने देता यावे.
मान्सूननंतरच्या उत्तरा-हस्त नक्षत्राचा पाऊस लांबल्यास किंवा न पडल्यास पाणी उपलब्ध असूनही ते शेतीला देता येत नाही. अशी कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती असते. या काळात मोबाइल इरिगेशनची योजना राबविल्यास ही अनवस्था दूर होऊन शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान वाचविता येईल. हा प्रयोग बलवडी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने राबविण्यात आला आणि तो यशस्वी झाला. ही यंत्रणा अग्निशामक दलासारखी निकडीची समजून शासनाने गावोगावी उपलब्ध करून द्यावी.
कोणतीही आपत्ती छोटा-मोठा असा भेद करीत नसते. कर्जमाफी करताना अल्पभूधारक, छोटा व मोठा शेतकरी जमिनीच्या क्षेत्रावरून ठरविण्याची पद्धती बदलण्यात यावी. खारफुटी, अवर्षणप्रवण, औद्योगिक प्रदूषण, अतिवृष्टी यांवर आधारित झोन निश्चित करावेत. मदत करण्याचे सूत्र आर्थिक व शास्त्रीय निकषावर ठरवावे. या निकषांच्या आधारे जेव्हा व जिथे जिथे आपत्ती येईल तिथे तिथे सहाय्य करावे. अशा तरतुदींमुळे प्रादेशिक वाद न होता नेमक्या गरजूंना सहाय्य मिळेल.या उपाययोजना सरकारनेच करायला हव्यात कारण त्या शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा होणारा खर्च त्यामुळे वाचेल आणि ही व्यवस्था कायमस्वरूपी होऊ शकते.
-संपतराव पवार
(समाप्त)


पुढे वाचा >>>
कोरडवाहू शेती (३) - नियोजनानेच दुर्दशा टाळता येईल!SocialTwist Tell-a-Friend

कोरडवाहू शेती (२) विकास योजना : नवी गुलामी!

साभार- लोकसत्ता/विशेष/संपतराव पवार/२७.०८.२००९

कोरडवाहू क्षेत्राच्या विकासासाठी म्हणून ज्या ज्या योजना केल्या, त्यांतून मुळात आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यांनाच अधिक सक्षम करण्याचा दृष्टिकोन ठेवला गेल्यामुळे बहुसंख्य कोरडवाहू शेतकऱ्यांच्या वाटय़ाला गुलामीचे जगणे आले आहे. साखर हंगामामध्ये मजूर पुरविणारे ठेकेदार प्रत्येक कारखान्याकडे आहेत. पैसे अंगावर आगाऊ देऊन हे ठेकेदार ऐन दिवाळी दिवशी मजुरांना कामासाठी बाहेर काढतात. मध्ययुगातील गुलामी आता कोरडवाहू क्षेत्रात आली आहे. फरक इतकाच आहे की, या नव्या युगातील गुलामांना देशातल्या देशातच ठेवलेले आहे. कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार योजना करीत असल्याचे सांगितले जाते, पण त्यांच्या नियोजनातच त्यांना दडपू शकणारा वर्ग तेथेच निर्माण करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट दिसते.
untitled
कोरडा दुष्काळ ओल्या दुष्काळाहून भयानक असतो; परंतु खारफुटी, अतिवृष्टी, पूर, भूकंप, वादळ, जळीत इत्यादी आपत्तींच्या प्रसंगी सरकार ज्या प्रकारे मदत करते, तो न्याय अवर्षणाच्या आपत्तीत दिला जात नाही. पिके पावसाअभावी करपून जातात, विहिरीत गवत उगवलेले असते तरी वीजबिल आकारले जाते. महापुराचे पाणी घराला लागले की प्रतिमाणशी एक हजार रुपयांची मदत दिली जाते. कर्जमाफी पाच एकरांपर्यंत करण्यात आली. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने त्याचा लाभ त्यांना नाही. दुसरीकडे सधन बागायतदार नियमित कर्जफेड करतात म्हणून त्या सर्वाना वीस हजार रुपये मदत केली जाते. आता या दोन्ही योजनांच्या लाभांतून जे वंचित आहेत त्यांना कर्जपुरवठा करताना मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व सावकारांची मर्जी (ना हरकत) संपादन केल्याशिवाय पतपुरवठा केला जाणार नाही, अशा कोंडीत पकडले आहे हे आजवरच्या नीतीला अनुसरूनच सुरू आहे.
या नीतीचे प्रत्यंतर महाराष्ट्रातील कृषिभूषण पुरस्कार वितरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची जी माहिती दिली त्यावरून येते. अतिवृष्टी व महापुरासाठी २,२०१ कोटी १९ लाख, पीककीडग्रस्तांसाठी ८३२ कोटी २८ लाख, फलोद्यान नुकसानीसाठी- १७३ कोटी अशा एकूण ३१०६ कोटी ४७ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या निधीचा लाभ कोणास झाला आहे हे उघड आहे.
कोरडवाहू विभागातल्या सर्वच गावातून थेट पुणे-मुंबईला जाण्याची एस.टी.ची व्यवस्था आहे. त्यामुळे स्वखर्चाने शहराकडे स्थलांतर होऊ लागले आहे. पाच वर्षांत शहरांची लोकसंख्या दुप्पट होत आहे आणि खेडी ओस पडू लागली आहेत. स्वस्त मजुरांचा बाजार आता शहरात भरपूर आहे. ही विकासाची नांदी नसून अराजकाकडे जाण्याचा प्रारंभ आहे याचे भान ठेवून कोरडवाहू शेतीला आधारभूत ठरेल, अशा प्रामाणिक नियोजनाची गरज आहे.
शासनाची वाटचाल लक्षात घेता कोरडवाहू शेतीचा जनक निसर्ग किंवा माणूस नसून सरकारचे धोरणच असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरडवाहू विकासाचे सूत्र सांभाळताना आपली सत्ता निरंकुश कशी राहील याची दक्षता राज्यकर्त्यांनी घेतली आहे. त्याची परिणती म्हणून शेती सोडून पळून जावे इतका उद्वेग शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. एकीकडे बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या लोभाचा अतिरेक झाला आहे. जमिनीवर किती अत्याचार करावा याला त्यांनी मर्यादाच ठेवलेली नाही. जमिनीच्या क्षमतेहून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके यामुळे नैसर्गिक चक्र ढासळू लागले आहे. पीक अधिक येण्यासाठी शक्तिवर्धके निर्माण झाली आहेत. त्यांचा वापर शेतीतील नफा औषध उत्पादकांना मिळण्यासाठी होतो आणि बागायती क्षेत्रातही शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतो. निसर्ग लहरी नसतो. त्याची कार्यपद्धती निश्चित असल्यामुळेच विज्ञानाचा उदय झालो. मात्र अनैसर्गिक कृतीमुळे आणि औद्योगीकरणातील प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे पावसाचे चक्र बिघडले. या बदललेल्या स्थितीमुळे कोरडवाहू शेती करणे म्हणजे जुगार खेळणे झाले आहे. हा धोका सहन करण्याची शेतकऱ्यांची क्षमता संपली आहे.
या समस्येच्या निराकरणासाठी शासनाकडे धरणे, मोर्चे, आंदोलने यांच्या माध्यमातून दाद मागण्याचा प्रयत्न आम्ही करीत होतो; परंतु या मार्गात बदल करण्याचे कारण ठरली ती केरळ विज्ञान शास्त्र साहित्य परिषदेने महाराष्ट्रात काढलेली विज्ञानयात्रा. ही यात्रा सांगलीत आली होती. तिची सांगता ‘देव आहे की नाही, हे विज्ञानाने सांगावे’ या वादात झाली. हा प्रश्न विचारण्यापेक्षा विज्ञानाला ‘दुष्काळ का?’ हा प्रश्न विचारण्याची कल्पना मनात आली; त्याच हेतूने महाराष्ट्रातील लोकविज्ञान चळवळीच्या प्रमुखांची भेट पुण्यात घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे खानापूर तालुक्यात १९८५ साली विज्ञानयात्रा काढली. नैसर्गिक संपत्तीच्या साहाय्याने कुणाचाही विनाश न करता विकास होऊ शकतो, नदीची वाळू ही एक संपत्ती असून तिच्या वापरातून बलवडी येथे येरळा नदीवर लोकांचे श्रम आणि निसर्ग यांच्या साहाय्याने शासनाच्या मदतीशिवाय आणि कोणाकडूनही देणगी न घेता बळीराजा धरण निर्माण झाले. या निर्मितीस शासनाने विरोध केला पण समाजाच्या सहानुभूतीमुळे शासनाला माघार घेणे भाग पडले. दुष्काळी भागातील दोन गावे पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाली. महाराष्ट्रात जिथे जिथे दुष्काळी भाग आहे, तिथे तिथे वाळू या नैसर्गिक संपत्तीचा वापर करून पाणीसंचय करणे साध्य होऊ शकते; पण राज्यकर्त्यांनी या उपक्रमाकडे दुर्लक्ष केले. या धरणाच्या निर्मितीतून संरक्षक आणि समान पाणीवाटप व्यवस्था हा विचार पुढे आला.
विटे येथे डॉ. वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली २७ ऑक्टोबर १९८५ रोजी दोन दिवसांची परिषद घेतली. परिषदेपुढे खानापूर तालुक्यासाठी पर्यायी विकास आराखडा मांडला गेला. त्यामध्ये वैरणीचे कोठार प्रत्येक तालुक्याला असावे हा पर्याय होता. पठारावरील भागासाठी नियोजन काय असावे आणि प्रत्येक गावासाठी काय करता येईल त्याचे गावनिहाय पुरवणीप्रस्ताव तज्ज्ञांपुढे मांडण्यात आले. जे निर्णय झाले, त्या अनुषंगाने कामास सुरुवात केली.
त्याच दरम्यान चाराटंचाई निर्माण झाली आणि पशुधनाची वाताहत होऊ लागली. सरकारने तगाईचे धोरण स्वीकारले. त्यातील अनेक दोष पुढे आले. तगाईऐवजी साखर कारखान्याकडून बगॅस मिळावा अशी मागणी आम्ही केली. कारखान्यांनी ते नाकारले. या नकारामागच्या कारणाची चौकशी करता दिसून आले की बगॅसची विक्री करून लाकडाचा वापर इंधन म्हणून केला जात आहे. १९६० ते १९८० पर्यंत सर्वच साखर कारखान्यांनी लाकडाचा वापर इंधन म्हणून केला. लाकडाची तोड किती प्रचंड प्रमाणात झाली असेल याची कल्पना यावरून येईल.
पशुधन हे शेतीला ताकद देणारे असते. गायी, म्हशींपासून मिळणारे दूध शेतकऱ्यांच्या चरितार्थाची किमान गरज भागविणारे साधन ठरू शकते. या दृष्टिकोनातून जनावरे टिकविण्याला प्राधान्य मिळाले पाहिजे असा आग्रह आम्ही धरला. दुष्काळ आमच्यामुळे नाही, त्यामुळे दुष्काळात आमची जनावरे सरकारनेच पोसली पाहिजेत ही मागणी घेऊन टोकाचा संघर्ष करणे भाग पडले. अखेर महाराष्ट्रातील पहिली चाराछावणी पारे येथे शासनाने सुरू केली. या छावणीत शेण काढणे, वैरण घालणे ही सर्व आम्ही शेतकऱ्यांनी सरकारला करायला भाग पाडले. या टोकाच्या संघर्षांचे फलित म्हणजे तगाईचे सरकारी धोरण कायमचे हटले.
प्रत्येक तालुक्यात वैरणीचे कोठार झाले पाहिजे अशी मागणी आम्ही केली. एकतर आमची चूक दाखवा नाहीतर ही मागणी मान्य करा असा पर्याय आम्ही सरकारपुढे ठेवला. त्यासाठी जमीन देण्याची जबाबदारी बलवडीतील शेतकऱ्यांनी स्वीकारली होती. ११ मार्च ८६ रोजी महाराष्ट्र शासन आणि शेतकरी यांचा करार झाला. या कराराने दोन हजार एकर जमीन सरकारला सहा महिन्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्याप्रमाणे सातबारावर नोंद आहे. या योजनेची मालकी सरकारची, शासनाने पाणी उपलब्ध करून द्यायचे आणि मोबदल्यात शेतकऱ्यांनी एकरी वीस टन चारा सरकारला उपलब्ध करून द्यायचा. या उत्पादनासाठी बियाणे, खते, मशागत यासाठी शासनाकडून कसलीही मदत घ्यायची नाही हा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. या योजनेतून प्रतिवर्षी ४० हजार टन चारा निर्माण होऊन ४० लाख जनावरांच्या संख्येला एका वेळी तो पुरू शकतो. तरीही शासनाची उदासीनता संपली नाही. सरकार ही योजना का नाकारत आहे हे स्पष्ट होत नाही.
पशुधन जगविणे हा भूतदयेचा प्रश्न नव्हे. १९९५ साली आटपाडी तालुक्यात दुष्काळ पडला. स्वतंत्रपूर येथील चाराछावणीत जनावराचा मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्याने फोडलेल्या हंबरडय़ाचा वृत्तांत वाचल्यानंतर २५ जानेवारी १९९५ रोजी बळीराजा धरणातील पाण्यावर सुमारे ११२ एकर क्षेत्रात उपजिल्हाधिकारी श्रीधर पळसुले, रोजगार हमीचे जिल्हाधिकारी श्री. सरतापे यांच्या हस्ते प्रत्यक्ष पेरणी केली, त्यासाठी बळीराजा धरणातून पाणी घेण्यास मुक्तिसंघर्षच्या नेत्यांनी हरकत घेतली. संघर्ष नको म्हणून ही योजना त्या वर्षी फलद्रूप झाली नाही.
२००२ - ०३ या वर्षांत दुष्काळाची समस्या बिकटच झाली. सरकार दुष्काळी कालखंडात वैरणीचे दर नियंत्रित करीत नसल्याने छावणीत गुरे नेण्याचा प्रसंग लोकांवर येतो. गोठय़ातील गुरे उघडय़ा माळावर जाऊ नयेत, त्यांच्या श्रमशक्तीचा वापर गरजेप्रमाणे करता यावा, घरच्या घरी खत राहावे, छावणीतला अपरिहार्य छळ टळावा आणि जनावरांना जो एकाच प्रकारचा चारा म्हणून ऊस खावा लागतो तो टळावा म्हणून येरळेच्या पात्रातील उपलब्ध पाण्यावर पलूस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने वैरणनिर्मिती करून ती पेड, डोर्ली, आरवडे येथील चाराछावणीत मक्याच्या कणसासह प्रदान करून शासनाच्या निदर्शनास आणून दिले की, चार हजार एकर क्षेत्रात मका पीक घेऊन तो चारा छावण्यांना दिला जावा. ऊस कारखान्यांना धक्का न बसता वैरण उपलब्ध करून देण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. परंतु या प्रयोगाचीही दखल शासनाने घेतली नाही.
पुढच्या वर्षी दुष्काळ होताच. शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘मैत्र जीवांचे’ हे अभियान सुरू केले. मुलांनी ४०० ट्रक चारा कृष्णकाठातून आणि पन्हाळ्यापर्यंतच्या भागातून उपलब्ध केला आणि त्यातून बलवडी येथे ५४३ जनावरांचे अनिवासी बोर्डिग चालविले. २८ दिवसांचा खर्च फक्त ४,९३० रुपये आला. हे बोर्डिग १२ ऑगस्ट २००१ रोजी सुरू केले होते. यामधून दुष्काळात पाणी उपलब्ध असणाऱ्या भागातील केवळ शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले तरी दुष्काळावर मात करणे सहज शक्य आहे हे स्पष्ट झाले.
कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी ‘दुष्काळात मानवाची क्रयशक्ती दुष्काळ जाणवू देत नाही’ हा सिद्धांत मांडला होता. त्याची प्रचीती घेण्याचा उपक्रम १२ -ऑक्टोबर ९३ रोजी हाती घेतला. आठ एकर क्षेत्रात शाळू पीक घेतले. त्यास प्रारंभी दोन पाण्याच्या पाळ्या स्प्रिंकलरने दिल्या. एक पाणी पाटाने दिले. शंभर दिवसांत त्यातून ४५०० पेंडी कडबा व ८१ क्विंटल शाळूचे उत्पादन हाती आले. हा उपक्रम लोकसहभागातून उभा राहिला आणि झालेल्या भांडवली खर्चाचा परतावा दिला गेला. श्रमशक्तीचा वापर कसा करावा याचे सूत्र या निष्कर्षांतून पुढे आले.
गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळात लोकसहभागातून कोरडवाहू शेती व शेतकरी यांना स्वास्थ्य लाभावे यासाठी विविध पर्याय शासनावर कोणताही ताण न पडता होऊ शकतात हे सिद्ध केलेले आहे. हे शासनाच्या निदर्शनास अनेक वेळा आणले पण राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष संपत नाही, याचे कारण कोरडवाहू शेतीक्षेत्रातून स्वस्त मजुरांचा पुरवठा उद्योगधंद्यांसाठी व्हावा हा हेतू निश्चित आहे. यातून सुटका करण्यासाठी राबणाऱ्यांनाच झुंजावे लागेल.
-संपतराव पवार


पुढे वाचा >>>
कोरडवाहू शेती (२) विकास योजना : नवी गुलामी!SocialTwist Tell-a-Friend

कोरडवाहू शेती (१) ‘उत्तम शेती’ ते असहायता

साभार-लोकसत्ता/विशेष/संपतराव पवार/२६.०८.२००९

भारताच्या शेतीव्यवसायाने सुवर्णकाळ गाठला होता. पारंपरिक शेती निसर्गावर आधारित होती. देशी ऊस, हळद, खपली गहू ही पिके बागायती म्हणून केली जात. पावसाळ्यानंतर ओढय़ांना, नाल्यांना पाझराचे पाणी वाहत असे, त्यावर सामुदायिकरीत्या बांध घालून फडपद्धतीने ओढय़ाकाठच्या जमिनीस पाणी मिळे. विहिरीचे पाणी बैलाच्या मोटेने उपसून तुरळक ठिकाणी दिले जायचे. अपवाद वगळला तर बहुतांशी पाऊस नक्षत्रांप्रमाणे पडत असल्याने खात्रीने भुईमूग, ममदापुरी जोंधळा, डुकरी बाजरी, शेतगहू, हरभरा, करडई, ऊस, भात ही पिके आणि मटकी, हुलगा, उडीद ही कडधान्ये तर कारळे, राळे, पंदे अशा विविध प्रकारची पिके होत असत. पशुधन विपुल असल्याने बैलांच्या साहाय्याने जमिनीची मशागत होत होती. दुधाची विक्रीव्यवस्था नसल्यामुळे दही, दूध, तूप यांचा आहारात समावेश असावयाचा. त्यामुळे माणसे निरोगी, सशक्त होती. पाण्याची जागा पाहून गावे वसली असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई नव्हती. नदी, नाले, ओढे नैसर्गिकरीत्या वाहत होते. एक समृद्ध जीवन छोटय़ा-मोठय़ा गावांना लाभलेले असल्यामुळे ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ अशी धारणा होती. बागायती शेती, कोरडवाहू शेती अशी फारकत शेतीव्यवसायात नव्हती. ही स्थिती केवळ तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीची.. पण हे वास्तव होते याची कल्पनादेखील आपण आज करू शकत नाही!
untitled
स्वातंत्र्यानंतर मोठी धरणे बांधण्याच्या योजना आल्या आणि धरणांतील पाणी बहुतांशी नदीकाठच्या परिसरास देण्यात आले. सिंचनव्यवस्थेसाठी कोटय़वधी रुपये खर्च होऊनही केवळ १८ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले. देशी उसाच्या पिकाऐवजी विदेशी उसाच्या सुधारित जातींची लागवड मोठय़ा प्रमाणात झाली. ऊसउत्पादन वाढल्याने १९६० नंतर सहकारी साखरउद्योग उभारणीसाठी ८०% भागभांडवल सरकारने पुरविले. सिंचनव्यवस्था आणि तिच्यावर आधारित उद्योगधंद्यांसाठी भांडवलाचा ओघ मर्यादित क्षेत्रात केंद्रित झाला. धडकसिंचन योजना आणि विद्युतपुरवठा प्राधान्याने देण्यात आल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात विकासाची बेटे निर्माण झाली.
या कालखंडात केवळ पावसावर आधारित असलेल्या शेतीक्षेत्रातून मानवी श्रमाचा ओघ साखर कारखान्यांकडे सुरू झाला. कारखान्यांभोवती झोपडपट्टीच निर्माण झाली. साखर उद्योग चालविणारे आर्थिकदृष्टय़ा प्रबळ झाल्याने तसेच त्यांच्या हितसंबंधांतून संघटित समूह निर्माण झाला. हाच राज्यात सत्ता राबवू लागला व प्रगत आणि अप्रगत अशी विभागणी १९७० सालापर्यंत पूर्णत्वास गेली.
महाराष्ट्रातील ८० तालुके अवर्षणप्रवण म्हणून घोषित आहेत. यातील काही भागांत नैऋत्य मोसमी पाऊस पडतो तर काही भागात ईशान्य मोसमी पाऊस येतो. खरीप आणि रब्बी हंगामानुसार वेगवेगळी पिके घेतली जात. १९७२ साली हे दोन्ही हंगाम कोरडे गेले. जनावरांचे अतोनात हाल झाले. गावेच्या गावे दुष्काळी कामावर २ ते २।। रुपये मजुरीने वर्षभर जगत राहिले. काहींनी शहराकडे धाव घेतली; काही वेगवेगळ्या व्यवसायात देशभर गेले; त्यांचे बरे झाले. पण जे गावी राहून शेती करीत राहिले ते सतत संकटात सापडले. यातून मार्ग काढण्याची त्यांची धडपड सुरू होती. याच दरम्यान हरितक्रांतीचा नारा सुरू होता. कृष्णाकाठची शेती पाहून ‘कुसळातून मुसळासारखा ऊस’ या घोषणेची भुरळ त्यांना पडली. शेतीमध्ये प्रगती करण्याची साधने म्हणून इंजीन, वीजपंप, पाइपलाइन या तंत्रज्ञानाची निर्मिती झाली होती. हे तंत्र उपलब्ध करण्यासाठी भूविकास बँकेच्या वतीने कर्जे देण्यात आली. कर्जे देताना खर्चाच्या ७५% मजुरी देण्याच्या बँकांच्या धोरणामुळे योजना यशस्वी झाल्या नाहीत. होते नव्हते ते सारे लोक गमावून बसले. कर्जफेडीसाठी जमिनी विकाव्या लागल्या, काहींचे लिलाव झाले. आत्महत्येचे प्रकारसुद्धा या प्रकरणात घडले कारण शेती बागायती करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. शेती अप्रगत राहिल्यामुळे जो भाग पावसावर अवलंबून असे त्या क्षेत्रास कोरडवाहू क्षेत्र असे मानले जाऊ लागले.
दरम्यान सुधारित बियाणे, खते आदी तंत्रांचा झंझावात सुरू झाला. १९७२ ते ८२ या कालखंडात पारंपरिक बियाणांचा वापर संपुष्टात आला. पेरणी करताना बियाण्याच्या दुकानाकडे धाव घेण्याची पाळी आली. या सुधारित बियाणासाठी पाणीपुरवठय़ाचा आधार हवा होता. याच काळात शासनाने पाणी उपलब्ध करण्यासाठी गावतळी, पाझरतलाव, इरिगेशन तलाव, बंडिंग, नालाबंडिंग, वळणबंधारे, भूमिगत बंधारे इत्यादी योजना या कोरडवाहू भागात आखल्या. ही कामे कंत्राटदारांकडून करून घेण्यात आली. कंत्राटदारांत काम मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा टाळावी म्हणून मजूरसोसायटीची संकल्पना अस्तित्वात आली.
मजुरांच्या क्षमता निर्माण करणारी ही चांगली योजना होती पण या मजूर सोसायटीचे चेअरमन बहुतेक पुढारीच नियमबाह्य मालक बनले आणि उपलब्ध कामे वाटून घेण्यासाठी त्यांनी मजूर सोसायटय़ांची फेडरेशन बनविली. त्याद्वारे वाटून घेतलेले काम कमिशनवर कंत्राटदारांच्या हाती जाई. कामाचे बिल चेअरमनच्या नावे निघत असल्याने कंत्राटदारांना त्यांच्या आश्रयाखाली वागायला आणि जगायला लावले. कोरडवाहू क्षेत्रात कंत्राटदार, पुढाऱ्यांचा आश्रितवर्ग म्हणून उदयाला आला.
पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था जिथे झाली त्या क्षेत्रात फलोद्यान योजना राबविण्यात आल्या. डाळिंबाचाच सहभाग त्यामध्ये प्रामुख्याने आढळून आला. काही अंशी बोर आणि द्राक्षे ही पिकेही घेतली गेली. या फलोद्यानासाठी मोठय़ा प्रमाणात सबसिडी देण्याचे धोरण ठरले. या तरतुदीचा लाभ घेण्यासाठी राज्यकर्त्यांचा आश्रय आवश्यक बनला. आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेले लाभार्थी सत्तेमध्ये जे असतील त्यांचा अनुयायी- कार्यकर्ता बनला. सर्वसामान्य किंवा मध्यम-गरीब शेतकरी या लाभापासून वंचित राहिला अशी स्थिती आहे.
१९७२ ते १९८० पर्यंत पाणी उचलण्याची प्रक्रिया आणि पाणी अडविणे साठविणे यांचे प्रमाण समांतर राहत गेले. मात्र त्यानंतर पाणी उपसा वाढत चालला. १९८३-८४-८५ या वर्षी सलग दुष्काळ पडला. पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण असणाऱ्या गावांनाही टँकरद्वारे पाणी पुरविण्याचा उपाय पहिल्यांदा योजावा लागला. पुढे सलग टँकर्सची संख्या वाढतच गेली. त्यानंतर बोअर मारणे हा एक उपक्रम मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आला. टँकर सुरू करणे आणि बोअर मारणे हाही फायदेशीर व्यवसाय सुरू झाला आणि त्यात बरेच राजकीय कार्यकर्ते उतरले. यातील गैरव्यवहार उघड होऊ लागले तेव्हा ‘टँकरमुक्त महाराष्ट्र’ अशी घोषणा करण्यात आली. पाणी देण्यासाठी छोटय़ा छोटय़ा पाणीपुरवठा योजना आखल्या, पण त्या पूर्ण होण्यापूर्वीच पाण्याचे स्रोत संपलेले असायचे. त्यामुळे प्रत्येक गावात तीन-चारपेक्षा अधिक योजना फसल्या. त्यावर उपाय म्हणून जलस्वराज्य योजना आखण्यात आली. या योजनेच्या मंजुरीसाठी १० टक्के रक्कम लोकांनी भरली पाहिजे अशी अट होती. ही लोकवर्गणी कंत्राटदार गावाची वर्गणी म्हणून भरू लागले आणि योजनेचे काम मिळवू लागले. असाच प्रकार यशवंत ग्राम समृद्धी सडक योजनेमध्येही अवलंबण्यात आला. याबाबतचा तपशील संबंधित सर्वाना माहीत असूनही त्याकडे कानाडोळा करण्यात आला. त्याची परिणती म्हणून त्या योजना निकृष्ट काम आणि भ्रष्टाचार यांच्या घोटाळ्यात अडकल्या. सरकारच्या या टंचाई निवारण उपक्रमांतून कंत्राटदारवर्गाची एक जबरदस्त साखळी निर्माण झाली. त्याचे प्रत्यंतर वर्तमानपत्रांतून नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा प्रसिद्ध होतात, त्यावरून येईल. या सगळ्या कालखंडात शेतीसाठी पाणीपुरवठा हा विचारच सोडून देण्यात आला आणि याच वेळी नव्या खर्चिक-भांडवली सुधारित शेतीची उभारणी करण्याच्या मोहजालात कोरडवाहू शेतकरी अडकला. त्यामुळे तो आणखीच केविलवाणा होत गेला. त्याच्या असहायतेतूनच कोरडवाहू शेतीक्षेत्रात धनवान सावकारांचा वर्ग वेगाने फोफावला.
भांडवली शेतीच्या उदयामुळे छोटय़ा शेतकऱ्यांना शेती करणे शक्य होईना. साहजिकच मोठय़ा प्रमाणात शहरांकडे स्थलांतर सुरू झाले. मुंबईच्या गोदीत, कापडगिरण्यांत काम करण्यासाठी खोलीत सामान ठेवतात त्याप्रमाणे बराकी करून पाळीपाळीने एका दहा बाय दहाच्या खोलीत २५-३० लोक राहत होते. तेथे काम करून मिळेल तो पैसा गावाकडे शेती करण्यासाठी पाठवत राहिले, पण १९८३ साली गिरणीकामगारांचा संप सुरू झाला आणि गोदीमध्ये यांत्रिकीकरण आले. त्यामुळे बहुसंख्य कामगारांना गावाकडे परतावे लागले. गावाकडे तर दुष्काळच. त्यामुळे कुटुंबेदेखील त्यांना कामगारांकडून पैसे मिळत नाही म्हणून त्यांना आश्रय देईनाशी झाली. यातून सारा कौटुंबिक जिव्हाळा संपून गेला. मग ही मंडळी रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊ लागली. मुंबईतील कामगार चळवळीचा अनुभव असल्यामुळे रोजगार हमी कामावरील मजूर संघटित होऊन झगडू लागले. त्यामुळे थोडय़ाफार सोयी त्यांना पुरविण्यात आल्या.
१९८५-८६ या साली निसर्गाने थोडा हात दिल्यामुळे ही वर्षे थोडी बरी गेली; परंतु लगेच १९८७-८८ साली पुन्हा दुष्काळाचा फेरा आला. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जगण्याचे एकमेव साधन पशुधन होते. दुष्काळाच्या काळात इंग्रजांनी घालून दिलेली वैरणतगाई कर्ज देण्याचे धोरण शासनाने राबविले; परंतु रोख पैसे विश्वासाने शेतकऱ्यांना देण्याऐवजी खरेदी-विक्री संघांनी कडबा खरेदी करून द्यायचा आणि त्या पैशाची आकारणी सातबारावर तगाई म्हणून नोंद करावयाची अशी पद्धत स्वीकारली गेली. यातून खरेदी-विक्री संघांना म्हणजे त्याच्या चालकांना संधी मिळाली. काही सोसायटय़ाही ही संधी साधण्यासाठी सरसावल्या होत्या. अगदी अलीकडे शेततळी करण्याचे धोरण शासनाने घेतले. ४० हजार रुपये खर्च एका शेततळ्यासाठी मंजूर होई. रोजगार हमीतून ही कामे व्हावीत अशी अपेक्षा होती; परंतु ती जेसीबीच्या साह्याने पूर्ण करण्यात आली. त्यांचा उपयोग किती याचा अभ्यास आढावा काहीही झालेले नाही. त्यातून पुढे चार लाख ६० हजार रुपये खर्चाचा सामुदायिक मोठय़ा तळ्यांचा प्रयोग पुढे आला. कागदोपत्री सामुदायिक तळे दाखवून त्याच्या नावाखाली सक्षम व्यक्तीलाच त्याची मदत मिळे.
या सगळ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी ज्यांनी अवजड यंत्रसामग्री खरेदी केली होती त्यांच्या मशिनरीला काम देण्याची समस्या गंभीर होती. त्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभूसारखी हजार कोटींच्या योजना आखून त्यांना काम मिळण्याची व्यवस्था केली. या योजनांसाठी सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत एक हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या कालव्यांची खुदाई झाली. खुदाई तुटक तुटक करून या योजनेचे पाणी आपल्याला येईल अशी आशा कोरडवाहू शेतीक्षेत्रातील लोकांच्या मनात निर्माण करण्याची चलाखीही साधली गेली.
या कामाचा आराखडा सादर करावा, अशी मागणी कोणत्याही पाणी चळवळीने कधीच केलेली नाही. या योजनांना निधी द्या एवढाच आग्रह त्यांनी धरला. त्यामुळे गेली २५-३० वर्षे त्यांना काम आणि पैसे मिळण्यात जेव्हा अडचणी निर्माण होतात तेव्हा त्यांचे निराकरण करण्यासाठी चळवळी तयार होतात आणि या चळवळींचा लाभ मोठे कंत्राटदार घेतात. प्रत्यक्षात या योजनांची तांत्रिक व आर्थिक बाजू, पीकपद्धती यांचा एकत्रित विचार केला तर त्या योजना सफल होऊ शकत नाहीत. विज्ञानाने कदाचित हे शक्य आहे, पण हे अर्थकारणाला पेलणारे नाही.
-संपतराव पवार



पुढे वाचा >>>
कोरडवाहू शेती (१) ‘उत्तम शेती’ ते असहायताSocialTwist Tell-a-Friend

Thursday, August 20, 2009

पाणी नेमके कोठे अडते, कोठे जिरते?

साभार- प्रा. एच. एम. देसरडा/लोकसत्ता/विशेष लेख/१९.०८.२००९


अवर्षण हा पर्जन्यचक्राचा अविभाज्य भाग असला तरी त्याला अस्मानी संकट मानणे चुकीचे आहे. अवर्षणाचे पर्यवसान दुष्काळात होते तेव्हा मुख्य कारण शेती, औद्योगिक उत्पादन पद्धती तसेच सुखवस्तू लोकांची जीवनशैली हेच असते.पाणीटंचाई व दुष्काळाचे कारण पावसाने ‘दगा’ दिला हे नाही. १०० वर्षांची आकडेवारी हे स्पष्ट सांगते की, पर्जन्यमानाची दीर्घकालीन सरासरी कायम आहे. मान्सूनचे आगमन उशिरा होणे, कमी-अधिक पडणे, मोठा खंड पडणे याचा पिकांवर अनुकूल-प्रतिकूल परिणाम होतो. काही वेळा अवर्षणाची वर्षे लागोपाठ येतात व प्रश्न उग्र बनतो. हा ‘मान्सून’ अगर मोसमी पाऊस आहे, हे विसरून चालणार नाही. तो थोडी फार हुलकावणी देणारच.
अवर्षणाचे तीन प्रकार आहेत. पर्जन्यजन्य, शेतीजन्य व जलजन्य. पाऊसमान कमी-अधिक झाले, तरी पिकबुडी होणे अपरिहार्य नाही. म्हणजेच पर्जन्यजन्य अवर्षणामुळे शेतीजन्य अवर्षण होतेच अथवा अटळ आहे, असे म्हणणे सयुक्तिक नाही. महत्त्वपूर्ण बाब ही की, पर्जन्यजन्य व शेतीजन्य अवर्षण झाले तरी जलजन्य अवर्षण होऊ नये. कारण भूगर्भातील व भूपृष्ठावरील जलसाठे एक-दोन वर्षांच्या अवर्षण व अल्प पावसामुळे संपुष्टात येत नाही, यावयास नको. आल्यास ती धोक्याची स्पष्ट सूचना होय. पिण्याच्या पाण्याच्या वाढत्या टंचाईचे मुख्य कारण, पाऊसमानातील कमतरता हे नसून पाणी वापर व विनियोगाची चुकीची पद्धत होय.
untitled
पाणी वापरविषयक धोरणांत व नियोजन पद्धतीत आमूलाग्र बदल केल्याखेरीज केवळ धरणे बांधून, कालवे काढून, नद्या जोडून अथवा भूगर्भातून अर्निबध पाणी उपसून या प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक होणे शक्य नाही. राज्यकर्त्यांचे व अभिजन महाजन वर्गाचे सर्व लक्ष शास्त्रशुद्ध नियोजनाला तिलांजली देऊन अब्जाधीश होण्यावर केंद्रित झालेले आहे. विकासाच्या गोंडस नावाने, मागास भागाचा अगर दुष्काळी तालुक्यांचा अनुशेष भरून काढण्याच्या नावाने आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी चालवलेला हा पैसा-उपसा राजकीय महाउद्योग आहे. जेवढा प्रकल्प खर्च जास्त तेवढी त्यातून बोकडकमाई जास्त! प्रचंड भांडवली खर्च करून येनकेनप्रकारेण पुरवठय़ाचा वाढविस्तार करणारी प्रचलित पाणी नियोजन व प्रकल्प उभारणी पद्धती हेच आजच्या जलसंकटाचे मूळ व मुख्य कारण आहे, हे स्वीकारले जात नाही, तोवर पाणी प्रश्नाची लोकाभिमुख समतावादी व चिरस्थायी सोडवणूक शक्य नाही.
भारत सरकारच्या महालेखापालांच्या देश व राज्य पातळीवरच्या समित्या व आयोग तसेच स्वतंत्र संशोधन अध्ययनात हेच जाणवले की, महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था देशात सर्वाधिक आजारी व अकार्यक्षम आहे. देशातील ४० टक्के धरणे एकटय़ा महाराष्ट्रात असून पाटपाण्याने राज्यातील फक्त पाच टक्के क्षेत्र सिंचित होते. सिंचनासाठी भूजलाचा बेछूट वेगाने उपसा होत असून भूजल पातळी वेगाने घसरत आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य व टंचाई वाढत आहे.
१९७२ च्या दुष्काळात पाण्याची समस्या बिकट नव्हती. त्यावेळी भूगर्भात पाणी होते. सन २००४ पासून भूजलाची स्थिती विदारक बनली असून, तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती अधिक बिकट होईल. या संदर्भात तात्काळ सिंचनासाठी विंधन विहिरी घेण्यावर बंदी घालण्याची आवश्यकता आहे. केळी, ऊस, द्राक्षे यासारखी पिके तसेच अमाप पाणी लागणारे उद्योग यांच्यावर र्निबध घातले जावेत.
काँग्रेसप्रणीत ‘लोकशाही आघाडी सरकार’ असो की भाजप-सेनाप्रणीत युतीचे सरकार, या सर्वाची भूमिका पाटबंधारे व अन्य पाणी प्रकल्पांसाठी अधिकाधिक पैसे मागण्याची आहे. कृष्णा खोरे व अन्य खोरे विकास योजनांची काय वासलात लागली व सिंचन प्रकल्पांवर ४० हजार कोटी रुपये खर्ची पडले ते गेले कुठे? कुणाची तुंबडी व खिसे भरले या सिंचन प्रकल्पांनी? आता अर्थसंकल्पात सिंचन प्रकल्प असो की, अन्य विकास प्रकल्प त्यासाठी अजिबात पैसा नाही. मग शक्कल लढवून अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज रोखे काढून या नदी खोरे योजनेसाठी पैसे उभारले. त्यामुळे राज्य दिवाळखोर बनले. युती व आघाडीच्या नेत्यांमध्ये त्याबाबत जो कलगीतुरा होतो त्याला थोडी करमणूक होण्यापलीकडे काही अर्थ नाही! पाच-सहा वर्षांपूर्वी शरद पवार यांनी नदी जोड प्रकल्पासंदर्भात भव्यदिव्य बैठक घेतली. त्यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. या सर्व बडय़ा नेत्यांचा सर्व भर फक्त भव्यदिव्य प्रकल्प उभारण्यावर आहे आणि ज्या योजनांद्वारे दोन वर्षांत हमखास पाणी मिळू शकते, त्यात या पुढाऱ्यांना रस नाही.
देशातील सर्वाधिक मोठी धरणे महाराष्ट्रात असताना पाटपाण्याने ओलित होणारे क्षेत्र पाच टक्के एवढेच आहे. उत्तरोत्तर पाटबंधारे प्रकल्पातील पाणी उद्योगांना व शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी राखून ठेवले जाते. राष्ट्रीय पाणी धोरणात पिण्याच्या पाण्यानंतर अग्रक्रम सिंचनाला आहे. महाराष्ट्राने यात बदल करून सिंचनाऐवजी उद्योगधंद्याला अग्रक्रम दिला आहे. आता तर पाटबंधारे खाते याचे उघडपणे समर्थन करते की यातून खात्याला पाचशे कोटी रुपयांची पाणीपट्टी मिळते! मागास भागाचा विकास, अनुशेष, शेती विकास या नावाने पाटबंधारे प्रकल्पांसाठी निधी मागायचा, धरणे बांधायची. धरणातले पाणी मात्र अग्रक्रमाने द्यायचे कारखानदारीला, पंचतारांकित हॉटेल, जलक्रीडा, शहरातील बागबगिचे यांना! महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प व पाणी धोरणात लोकाभिमुख बदल होणे आवश्यक आहे.
या सर्व प्रशासकीय व राजकीय गर्तेतून बाहेर पडून गावपातळीवर लघु-पाणलोट क्षेत्र विकासाचे नियोजन व अंमलबजावणी केल्याखेरीज महाराष्ट्रातील पाणी व रोजगाराच्या प्रश्नाची सोडवणूक होणे शक्य नाही. सुदैवाने केंद्र सरकारपुरस्कृत राष्ट्रीय रोजगार हमी योजना आता राज्यातील सर्व जिल्ह्य़ांत लागू आहे. राज्यात ३० वर्षांपूर्वी सुरू झालेली रोजगार हमी योजना अस्तित्वात आहे. त्यासाठी निधीची स्वतंत्र तरतूद असून वर्षांकाठी व्यवसाय कर व सरकारला त्यात टाकायची बरोबरीची भर मिळून सात-आठ वर्षे तीन हजार कोटी रुपये यासाठी रीतसर उपलब्ध होत असत. गतवर्षी विधानसभेत कायद्यात अनाठायी बदल करून या योजनेचे खर्च न केलेले दहा हजार कोटी रुपये सरकारने दुसरीकडे वळवले! खरे तर या निधीचा वापर करून पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम निर्धाराने राबविणे गरजेचे होते.
काही वर्षे मी सातत्याने रोहयोच्या कामाची पाहणी व अभ्यास करीत आहे. चालू वर्षीही टंचाईसदृश स्थिती घोषित जिल्ह्य़ात व तालुक्यात पाहणी केली. बहुसंख्य ठिकाणी पाहणीच्या दिवशी मजूर ‘गायब’ असतात. मजुरांऐवजी यंत्राद्वारे, कंत्राटदारामार्फत कामे करून ती मजुरांनी केली, असे सर्रास दर्शविले जाते. आक्षेपार्ह बाब म्हणजे कामे तदर्थ पद्धतीने, विखुरलेल्या व सुटय़ा स्वरूपात केली जातात. त्यात सातत्य, शास्त्रशुद्ध क्रम व सुसंगतता नसते. यामुळे स्थायी स्वरूपाची मत्ता निर्माण होत नाही, जे रोजगार हमीचे मुख्य अधिष्ठान आहे. केवळ टंचाई व दुष्काळी परिस्थितीत लोकांना जगविण्यासाठी थातुरमातूर काम देणे हे या योजनेचे उद्दिष्ट नाही. श्रमशक्तीचा उत्पादकीय वापर करून कायमस्वरूपी दुष्काळ व दारिद्रय़ निर्मूलन हे मुख्य उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र मुख्यत: तापी (१७ टक्के), गोदावरी (५० टक्के), कृष्णा (२३ टक्के) या नदीखोऱ्यांत तसेच कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यात (१० टक्के) व अगदी थोडा भाग (०.३४ टक्के) नर्मदा खोऱ्यात विभागले आहे. भूजल यंत्रणेने त्याची विभागणी १५०५ पाणलोट क्षेत्रात केली आहे. लघुपाणलोट क्षेत्राची संख्या साठ हजार एवढी आहे. आजवर विविध पाणलोट विकास योजनेंतर्गत ३३,७६२ लघुपाणलोट कामासाठी निवडले गेले. प्रत्यक्षात २९,९८५ लघुपाणलोटात काम सुरू झाले. २००७ अखेर १०,८१४ पाणलोटांचे काम पूर्ण करण्यात आले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मृद व जलसंधारणाचे, वनीकरणाचे काम जारी आहे. १९८३ पासून र्सवकष पाणलोट क्षेत्र विकासाची संकल्पना अवलंबण्यात आली. रोहयोअंतर्गत होणाऱ्या या कामांत ७० टक्के कामे जलसंधारणाची आहेत. रोहयोद्वारे आजतागायत १४ हजार कोटी रुपये खर्ची पडले. ५०० कोटी मनुष्य दिवसांचे काम झाले, असे सरकारी आकडेवारी दर्शविते. एवढे काम झाले व दहा हजारांहून अधिक पाणलोट विकासाचे काम पूर्णत्वास गेले तर मग किमान त्या दहा हजार पाणलोटाच्या कक्षेतील गावांमध्ये अवर्षणाचा मुकाबला करण्याचे सामथ्र्य निर्माण व्हावयास हवे. प्रत्यक्षात हे का झाले नाही? याचे उत्तर हे की, ही कामे शास्त्रशुद्धपणे, काटेकोरपणे केली गेली नाहीत अथवा जमिनीवर पुरी करण्याऐवजी फक्त ‘फाइलीत’ पुरी केली गेली!
अख्ख्या महाराष्ट्रात २०-२५ वर्षे आधी राळेगणसिद्धी व अलीकडे हिवरेबाजारएवढीच जपमाळ राहिली नसती! आमदाराला जो ‘स्थानिक विकास फंड’ मिळतो त्यातूनदेखील बरीच गावे हिवरेबाजारसारखी ‘पाणी टंचाईमुक्त’ झाली असती. किमानपक्षी, जुलै-ऑगस्टपर्यंत जाणवलेल्या भीषण परिस्थितीत तरी याकडे लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा होती. वर्ष-दोन वर्षांत केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय ग्रामविकास मंत्री, केंद्रीय जलसंसाधन मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री, खासदार,आमदार हे सर्व हिवरेबाजारला येऊन पाणलोट विकासाचे काम बघून तोंडभर कौतुक करून गेले. शेती-पाणी नियोजनाच्या चुकीच्या प्रचलित धोरणात मात्र तसूभर बदल करायला तयार नाहीत. याचा अर्थ काय? नेमके पाणी (वाचा, पैसा) कोठे अडते व जिरते?
रोजगार हमीचा अनुभव लक्षात घेऊन यापुढील कामे सुटीसुटी न करता एकात्म व शास्त्रशुद्ध पद्धतीने पाणलोट क्षेत्रविकासाची कामे केली जावीत. माथ्यापासून पायथ्यापर्यंत वनीकरण, कुरण विकास, मृद व जलसंधारणाचे काम केले तर पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर किमान एक पिकाची आणि शेतकरी-शेतमजुरांना वर्षभर रोजगाराची हमी पाणलोट क्षेत्रविकासाद्वारे सार्वत्रिक स्वरूपात उपलब्ध करून देणे शक्य आहे. हे नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, पळवे व अन्य काही गावांत झालेल्या पाणलोट क्षेत्र व धुळे जिल्ह्य़ातील लामकिनी गावातील वनीकरण व कुरण विकासाने सिद्ध केले आहे. लोकप्रतिनिधी व पुढारी याबाबत का उदासीन आहेत? का नाही ते हे काम करवून घेत आपल्या शिवारात व तालुक्यात, जसे गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यात केले आहे? बडय़ा प्रकल्पांच्या नादी लागलेल्या बडय़ा नेत्यांच्या गळी हे उतरवणे शक्य नाही. सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य व स्थानिक कार्यकर्ते, विशेषत: दलित-श्रमिक स्त्रिया यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे.
या प्रथितयश प्रकल्पाचे रूपांतर लोकचळवळीत करून राज्यभर काही वर्षांपूर्वी सरकारने घोषित केलेल्या महात्मा फुले भूमी व जल अभियानाद्वारे पाणलोट विकासासाठी कार्यकर्त्यांचा संच उभा करणे हे तातडीचे आव्हान आहे. यासाठी साधनसाक्षरता, जलसाक्षरता मोहीम हाती घेणे उपयुक्त ठरेल. पाणी व रोजगार हे राज्यासमोरील अव्वल क्रमांकाचे प्रश्न असून त्यासाठी पैसा, यंत्रणा, श्रमशक्ती व योजना सर्व काही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. प्रत्यक्षात गरज आहे ती दृढ राजकीय संकल्पाची, लोकसहभाग व सामाजिक निर्धाराची. हा निर्धार आपण केव्हा करणार? नैसर्गिक व मानवी संसाधने व विज्ञान-तंत्रज्ञान तसेच निधीची उपलब्धता लक्षात घेता हे नक्कीच शक्य आहे. प्रश्न काळ्या आईशी इमान राखून हे काम इमानेइतबारे करण्याचा आहे.
- प्रा. एच. एम. देसरडा
(लेखक महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य असून सध्या महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष आहेत.)


पुढे वाचा >>>
पाणी नेमके कोठे अडते, कोठे जिरते?SocialTwist Tell-a-Friend

जनांच्या कोरडय़ा गप्पा

साभार- लोकसत्ता/संपादकीय/१९.०८.२००९


‘पानी बचाओ यह राष्ट्रीय नारा बनना चाहिए.’ पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ६२व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना अशी घोषणा केली. सध्याच्या काळात पाण्याचे वाढते महत्त्व आणि या वर्षी देशातील दुष्काळी स्थिती या पाश्र्वभूमीवर ही समर्पक वाटते.
देशाच्या मर्यादित जलस्रोताचा पूर्ण क्षमतेने वापर करून घेण्यासाठी पाणी वाचवायला पाहिजे, असे मनमोहनसिंग यांनी सांगितलेच. त्यासोबतच ‘हवामानबदला’सारख्या पर्यावरणाच्या प्रश्नाकडे पाहिले नाही तर हिमनद्या वितळतील आणि (सुरुवातीच्या काळात पूर येतील) मग अनेक नद्या आटतील, असा इशारा देऊन नव्या घोषणेचे महत्त्व विशद केले. घोषणा म्हणून ‘पानी बचाओ’ ही संकल्पना चांगली वाटणारी व दिलासा देणारी आहे. पण देशातील सध्याचा पाण्याचा वापर आणि एकूणच या नैसर्गिक स्रोताबद्दल लोकांची बेफिकिरी पाहता ही घोषणा प्रत्यक्षात उतरविणे, हे तितकेच कठीण आव्हान आहे. त्यामुळेच या दृष्टीने नेमकी काय पावले उचलली जातात, यावरच त्याचे भवितव्य अवलंबून असेल.

untitled

पंतप्रधानांनी भारतातील जलसंपत्तीसाठी ‘मर्यादित’ असा शब्दप्रयोग केला असला (आणि तो तांत्रिकदृष्टय़ा योग्य असला) तरी भारत हा पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने भाग्यवान आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात वर्षांला सरासरी ८९० मिलिमीटर पाऊस पडतो. (राष्ट्रीय जल आयोगाकडून हा आकडा ११०० मिलिमीटरहून अधिक असल्याचे सांगितले जाते.) प्रत्यक्ष हिशेबच केला तर भारताच्या एकूण भूभागावर पाऊस व हिमवर्षांव याद्वारे वर्षांला सुमारे ४००० घनकिलोमीटर इतके पाणी पडते. त्यात राजस्थानच्या शुष्क वाळवंटापासून चेरापुंजीच्या अतिवृष्टीपर्यंत आणि हिमालयातील हिमवर्षांवापासून ते भारताच्या दक्षिण टोकापर्यंत पडणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. देशात इतके पाणी पडत असले तरी सर्वच्या सर्व पाणी उपलब्ध नसते. निम्म्याहून कमी म्हणजे १८६९ घनकिलोमीटर इतकेच पाणी उपलब्ध होऊ शकते. तथापि हेसुद्धा सर्वच पाणी प्रत्यक्षात वापरणे शक्य नाही. त्यामुळे आताचे तंत्रज्ञान व अभियांत्रिकी विकसित असताना त्यापैकी केवळ ११२३ घनकिलोमीटर इतकेच पाणी वेगवेगळय़ा माध्यमांतून वापरणे शक्य आहे. याचा अर्थ भारतात पडणाऱ्या पाण्यापैकी प्रयत्न करूनही केवळ २८ टक्के पाणीच आपण प्रत्यक्षात वापरू शकतो. शिवाय देशाच्या विविध प्रदेशांत पावसाच्या बाबतीत मोठी विषमता आहे. एकीकडे मेघालयात वर्षांला सरासरी ११००० मिलिमीटर पाऊस कोसळतो, तर दुसरीकडे राजस्थानच्या वाळवंटात इन मीन १०० मिलिमीटर पाऊस पडतो. दुसरी विषमता म्हणजे हा पाऊस संपूर्ण वर्षभर न पडता केवळ चारच महिने पडतो. नेमकेपणाने सांगायचे तर बहुतांश पाऊस वर्षांतील केवळ १०० तासांतच पडतो. त्यामुळेच या पाण्याचे व्यवस्थापन करणे व ते वापरणे अधिक जिकिरीचे बनते. याशिवाय पाण्याचा वापर करण्याचे तंत्र व त्यासाठी लागणारा पैसा यांची स्थिती पाहता प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा आकडा ६३४ घनकिलोमीटपर्यंत घसरतो. याचा अर्थ पाणी पुरेसे आहे, पण ते वापरण्याचे तंत्र, प्रयत्न किंवा इच्छाशक्ती कमी पडत असल्याने, एकूण जलसंपत्तीच्या केवळ १५ टक्के इतकेच पाणी वापरण्यापर्यंत आपली झेप जाते. त्यामुळेच पाणी नाही अशी ओरड होते, तेव्हा त्याला पाऊस किंवा निसर्ग नव्हे तर आपणच मुख्यत: जबाबदार असतो, हे वेगळे सांगायला नको! पाण्याच्या कौशल्यपूर्ण वापरासंदर्भात आपल्याकडे इस्रायलचे दाखले इतक्या वेळा दिले जातात, की ही उदाहरणे ऐकून सपक झाली आहेत. तरीसुद्धा त्यातून आपण कोणताही बोध घेतलेला नाही, हे वास्तव आहे. अगदी राजकारणी, नोकरशहासुद्धा याबाबत आवेशात बोलतात, पण असे प्रयोग आपल्याकडे करण्याची वेळ आली, की हा आवेश गळून पडतो. नुसती बोलाचीच कढी! या स्थितीत पंतप्रधानांची ‘पानी बचाओ’ची घोषणा आशादायक वाटली तरी प्रत्यक्षात दिलासा देणार का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. पाणी मिळेपर्यंत ओरडायचे आणि मिळाले की वाया घालवायचे, याची उदाहरणे महाराष्ट्रासह देशभर पाहायला मिळतात. आपल्या हक्कांबाबत एरवी तावातावाने बोलणारे अनेक पुणेकर पिण्याचे स्वच्छ पाणी गाडय़ा धुण्यासाठी वापरतात आणि ठाणे-नाशिकचे पाणी ओढणारे मुंबईकर शुद्ध पाणी ‘फ्लश’वाटे नासवतात. गावेसुद्धा बेफिकीर आहेत, इतकी की पाण्याच्या जास्त वापरामुळे आपल्या जमिनी खराब झाल्या तरी आम्हाला पाणी जपून वापरण्याचे भान येत नाही. शेतीसाठी वापरले जाणारे विजेचे मीटर हटविण्याचा निर्णय १९७०च्या दशकात झाला. मग फुकटात वीज (व पाणीसुद्धा) मिळाली की भूजलाचा उपसा वाट्टेल तसा वाढला. अशीच उदाहरणे राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि देशाच्या इतर भागांतही ठळकपणे आढळतात. राजस्थानच्या वाळवंटात इतिहासकाळापासून कमी पाण्यात व्यवस्थित जगण्याची जीवनशैली विकसित झाली आहे. जैसलमेरच्या खेडय़ांमध्ये एक लोटा पाण्यात अंघोळ व्हायची. अंघोळीचे पाणी जमा करून कपडे धुण्यासाठी आणि ते पुन्हा घर सारवण्यासाठी वापरात यायचे. पण त्याच वाळवंटात इंदिरा गांधी कालव्याद्वारे भाक्रा-नांगलचे पाणी पोहोचले आणि अनेक भाग पाणथळ बनले. जैसलमेर, जोधपूर, बिकानेरमध्ये वाया घालविले जाणारे पाणी पाहून हा वाळवंटी प्रदेश आहे का, असा प्रश्न पडतो. पंजाब-हरयाणात नद्या-कालव्यांचे जाळे असूनही भूजलाची पातळी चिंता वाटावी इतक्या वेगाने खाली जात आहे. ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. देशाच्या सर्वच प्रदेशांत असेच चित्र आहे. देशातील महानगरांबाबत एक वास्तव म्हणजे सर्वच महानगरे पाण्याच्या दृष्टीने परावलंबी आहेत- मग ती दिल्ली असो, मुंबई असो, चेन्नई किंवा बंगलोर! त्यांची पाण्याची प्रचंड वाढलेली गरज पाहता त्यांच्या क्षेत्रातील सर्व जलस्रोत एकत्र केले तरी ही गरज पाच टक्केसुद्धा पूर्ण करू शकणार नाहीत. असे असूनही चेन्नईसारखा एखादा अपवाद वगळता इतरत्र पाण्याचा वापर अंदाधुंद पद्धतीनेच होत आहे. याबाबत भारतीयांच्या आजच्या जीवनशैलीतून ठायी ठायी दांभिकतेचे दर्शन होते. ते पाण्याला जीवन आणि देवतेसमान मानतात, पण त्याला सर्व प्रकारांनी दूषित करतात आणि वाट्टेल तसे वायासुद्धा घालवतात. त्यामुळे पाण्याबाबत सर्वावरच नव्याने संस्कार करण्याची वेळ आली आहे. पण त्यावर पंतप्रधानांची घोषणा कशी मात्रा ठरणार? पंतप्रधानांनी अशी घोषणा केली खरी, पण देशातील जलस्रोतांची कशी निगा राखली जाते, ही माहिती त्यांच्याकडे असेलच. बहुतांश नद्या व तलावांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी गाठली आहे. काश्मीरमधील दल सरोवरापासून ते थेट केरळमधील वेम्बनाड तलावापर्यंत (व्हाया महाराष्ट्रातील उजनी-जायकवाडी जलाशय!) हेच चित्र दिसते. शहरी भागात जास्तीत जास्त प्रदेशावरील भूजलसुद्धा दूषित होत आहे. नद्या तर सुधारणेच्या पलीकडे बिघडल्या आहेत. नुसते गंगेला ‘राष्ट्रीय नदी’ जाहीर करून काही फरक पडत नाही, ती प्रत्यक्ष सुधारून दाखवावी लागते. १९८५चा ‘गंगा कृती आराखडा’ आणि १९९३ पासूनचा ‘यमुना कृती आराखडा’ यावर एकूण २१०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करूनही या नद्या जास्तच नासल्या आहेत. अशी ही सरकारची कामगिरी! मग या नव्या घोषणेने असा काय फरक पडणार? केंद्रात सरकार स्थापल्यानंतर पंतप्रधानांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला. आता पाणी वाचविण्याची घोषणा म्हणजे पुढच्या शंभर दिवसांसाठीची घोषणा ठरू नये. कारण ही घोषणा प्रत्यक्षात आली तर भविष्यात आतासारख्या दुष्काळी वर्षांतही देशातील नागरिक समृद्ध जीवन जगू शकतील. इस्रायल, अमेरिका, युरोपीय देश आणि अगदी भारतातही राजस्थानात अलवर, महाराष्ट्रात हिवरेबाजार, लामकानी, राळेगण अशा काही गावांनी हे करून दाखवले आहे. पण हा आशावाद प्रत्यक्षात उतरण्यासाठी केवळ घोषणा करून किंवा उंटावरून शेळय़ा हाकून जमत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष पाण्यात उतरावे लागते. तसे घडले तरच ‘पानी बचाओ’च्या घोषणेचा उपयोग आहे, अन्यथा ही घोषणाच पाण्यात जायला फारसा वेळ लागणार नाही!!!


पुढे वाचा >>>
जनांच्या कोरडय़ा गप्पाSocialTwist Tell-a-Friend

Friday, July 24, 2009

रुजावी जलसंचय संस्कृती

साभार-लोकसत्ता/विशेष-२३.०७.२००९/अस्मिता निकम

जलनियोजन आणि जलव्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचे असाधारण महत्त्व वरील मथळ्यांमुळे कुणाच्याही लक्षात यावे. मोसमी पावसाची अनिश्चितता, इलेक्ट्रिक पंपांचा वापर करून खोल भूगर्भातून मोठय़ा प्रमाणावर होत असलेला पाण्याचा उपसा आणि जमिनीतील व अनुषंगाने पाण्यातील वाढणारे क्षारांचे वाढते प्रमाण हे प्रश्न महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर सर्व विकसित देशांना आज भेडसावत आहेत. या संदर्भात पावसाच्या पाण्याचा साठा करणे, जमिनीतील नैसर्गिक स्रोतांची जपणूक करणे आणि सर्वसाधारणपणे जलसंवर्धन करणे ही आजची गरज आहे. या संदर्भात मोठे खर्चिक प्रकल्प किंवा धरणे हीच उपयोगी ठरतील हा प्रचलित गैरसमज आहे. छोटय़ा बंधाऱ्यातून अडवलेल्या पाण्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सारख्या साध्या छोटय़ा प्रकल्पातून तसेच तळी किंवा नद्या यातील पाण्याचे साठे एकमेकांना जोडण्यासारखे अभिनव उपक्रम हेही याबाबतीत खूप प्रभावी ठरू शकतात. गुजरात आणि राजस्थानात अंबुजा सिमेंट फाऊंडेशनने राबविलेले काही प्रकल्प भूजल संवर्धनाच्या दृष्टीने खूप यशस्वी आणि म्हणूनच लक्षणीय ठरतात. त्यांची माहिती सर्वानाच उद्बोधक ठरावी.
पश्चिम गुजरातमध्ये मूलद्वारका येथे शिंगोडा नदी अरबी समुद्राला मिळते. जमिनीच्या उतारामुळे या ठिकाणी नदीच्या पाण्याला तीव्र वेग असतो. त्या पाण्याचा निचरा झपाटय़ाने होतो. याखेरीज वेगाने वाहणाऱ्या पाण्याला रोखून धरण्याकरिता बंधारा बांधण्याची कल्पना तज्ज्ञांना योग्य वाटत नव्हती. अशा स्थितीत, फाऊंडेशनच्या तज्ज्ञांनी एक अभिनव प्रयोग केला. या प्रयोगांतर्गत त्यांना जमिनीखालून पाइप टाकून नदीचे पाणी वळवून घेऊन एका कृत्रिम बंधाऱ्यापर्यंत आणायचे होते. याकरिता ९९ मिमी. व्यासाची जवळजवळ पाऊण किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकायचे ठरले. परंतु ही जलवाहिनी खासगी जमिनीतून नेणे आवश्यक होते. या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी गावकऱ्यांचे सहकार्य आणि सहभाग या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत हे लक्षात घेऊन चार गावातील सर्व जनतेला कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतले. या योजनेमुळे त्यांना होणारे फायदे समजावून सांगितले. या प्रक्रियेला काही महिन्यांचा कालावधी लागला जरूर, परंतु हळूहळू सर्वसामान्यांचा प्रकल्पाला पाठिंबा वाढू लागला. भूधारकांनी त्यांची शेते खणून तिथे ही जलवाहिनी टाकायला होकार दिला. जमीन खणून त्यात पाइप टाकण्यात आले आणि पुन्हा जमीन पूर्ववत करण्यात आली.
या प्रकल्पामुळे २००६ च्या पावसाळ्यात प्रथमच ४.४६ दशलक्ष घनमीटर पाणी बंधाऱ्यात साठवले गेले. या पाण्याचा शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच दैनंदिन वापरासाठी मोठा उपयोग आजही होत आहे. या बंधाऱ्याचा आणखी एक मोठा लाभ झाला. जलसंचयाभोवती सुमारे २०० शेतविहिरींमधील पाण्याचा स्तर १२ मीटरहून अधिक उंचावला. साहजिकच, या भागातील शेतकरी आता वर्षांतून दोन किंवा तीन पिके घेऊ शकतात.
दुसरा प्रकल्पही पश्चिम गुजरात येथीलच आहे. कोडीनार या समुद्रालगत वसलेल्या गावातील गोडय़ा पाण्यातील क्षारांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले होते. समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी जमिनीवर येऊन आणि झिरपून ही समस्या निर्माण होत होती. या वाढत्या क्षारांच्या समस्येमुळे कोडीनारमधील जनतेला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्याच्या कार्यवाहीने कोडीनारमधील क्षारयुक्त पाण्याची समस्या कायमची दूर झाली असून गोडय़ा पाण्याच्या वाढत्या मुबलकतेमुळे तेथील शेतकऱ्यांना आता दरसाल तीन पिके घेणेही शक्य होत आहे.

या प्रकल्पाची रूपरेषा सांगणे योग्य ठरेल.

कोडीनार गावातून ‘गोमा’ नदी अरबी समुद्राला मिळते. जमिनीच्या नैसर्गिक उतारामुळे गोमा नदीचा प्रवाह तीव्र वेगाने समुद्राला भिडतो. त्यामुळे नदीचे पाणी साठविणे किंवा त्यांचा अन्यत्र संचय करणे अशक्यप्राय होते. त्याचबरोबर, कोडीनारच्या परिसरात मितिझ, देवळी, कडोदर, दमली आणि पिवली ही पाच तळी आहेत. जमिनीतील अतिरिक्त क्षारांमुळे या तळ्यातील पाणीही पिण्याकरिता किंवा शेतीकरिता कमअस्सल बनू लागले होते. गावात वाहती नदी असून आणि पाच तळ्यांचा सहवास लाभूनही कोडीनारचे रहिवासी क्षारयुक्त पाण्यामुळे त्रासले होते.
अंबुजा फाऊंडेशनने ही समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तज्ज्ञांचे म्हणणे पडले की, समुद्रानजिक गोडय़ा पाण्याचा साठा निर्माण करून त्या पाण्याचा धन भार समुद्राच्या पाण्यापेक्षा अधिक केला तर जमिनीत झिरपणारे समुद्राचे क्षारयुक्त पाणी कमी होईल. या प्रकल्पांतर्गत सर्वप्रथम पाचही तळ्यांची कालव्यांद्वारे जोडणी करण्यात आली. प्रत्येक तळ्यातील गाळ काढून पाण्याच्या स्तंभाची उंची पद्धतशीरपणे वाढविण्यात आली, हा पहिला टप्पा झाला.
दुसऱ्या टप्प्यात गोमा नदीतून एक कालवा काढून सर्वाधिक उंचीच्या तळ्याशी जोडला. परिणामत: पावसाळ्यात गोमा नदीचे पाणी जेव्हा एका विशिष्ट पातळीच्या वर जाऊ लागले तेव्हा ते नैसर्गिक दाबामुळे कालव्यातून सर्वाधिक उंचीच्या पहिल्या तळ्यात आपोआप येऊन पडू लागले. पहिले तळे पाण्याने भरल्यानंतर अतिरिक्त पाणी गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे दुसऱ्या कालव्यात जाऊ लागले. गोमा नदीच्या गोडय़ा पाण्याने पाचही तळी पुरेपूर भरली. काही वर्षांत स्वाभाविकच पाण्यातील क्षारांचे प्रमाण खूप कमी झाले. या परिसरातील शेतकरी आता वर्षांतून तीन पिके घेतात. या परिसरात आता १२१ नव्या फळबागा विकसित झाल्या असून त्यांचे आर्थिक लाभ १९७ हेक्टर जमिनीवरील १८२ शेतकरी घेत आहेत.
दर वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा ग्रामीण तसेच नागरी भागातील जनतेला बसतात. पिण्याच्या पाण्याची टंचाई हा काही केवळ भारतीयांना भेडसावणारा प्रश्न नाही. पूर्ण जगालाच गोडय़ा पाण्याची कमतरता तीव्र स्वरूपात जाणवत आहे.
एकूण भूजलातील ७६ टक्के पाणी शेतीसाठी १२ टक्के उद्योगासाठी तर उर्वरित अन्य घरगुती कारणांसाठी वापरले जाते. निसर्गदत्त साधनसंपत्तीचा दुरुपयोग, विकसित तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि निसर्ग तसेच पर्यावरणाप्रती जनसामान्यांची उदासीनता यामुळेच ही समस्या उद्भवलेली आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. तरीही राजस्थानसारख्या भूभागाला प्राचीन काळापासून पाण्याची समस्या भेडसावत आली आहे. आपल्याला हजारो किलोमीटर लांबीच्या किनाराही लाभलेला आहे. समुद्राच्या पाण्यामुळे किनाऱ्यानजिक जमिनीत तसेच भूगर्भातील पाण्यात क्षारांचे प्रमाण चिंताजनक प्रमाणात वाढले आहे. क्षारयुक्त पाण्याने आरोग्याचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच त्यामुळे जमीनही नापीक होते. या प्रश्नांचे स्वरूप अधिक गंभीर होण्यासाठी काही अन्य घटकही कारणीभूत आहेत.
"निर्माण-३" मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा... "निर्माण-३" शिबिरासाठीचा प्रवेश अर्ज येथून डाउनलोड करा. देशाची वाढती लोकसंख्या, ऊस, नारळअशा नगदी परंतु अधिक पाणी शोषणाऱ्या पिकांचे वाढीव उत्पादन, खोल भूगर्भातील पाणी खेचून काढण्यासाठी डिझेल तसेच इलेक्ट्रिक पंपाचा होणारा वापर आणि पाण्याचा गैरवापर यामुळे भूगर्भातील गोडय़ा पाण्याचे साठे कमी होत आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन असे प्रकल्प स्थानिक रहिवाशांच्या मदतीने उभे केल्यास समस्या चिंताजनक राहणार नाही.

- अस्मिता निकम


पुढे वाचा >>>
रुजावी जलसंचय संस्कृतीSocialTwist Tell-a-Friend